दांडेली अभयारण्य

गोव्यातील सांगे तालुक्‍यात असलेले हे अभयारण्य जंगल सफारीसाठी प्रसिद्ध आहे. येथे जंगली खार, काळे चित्ते, वाघ, काळविटे आणि माकडे आणि ठिकठिकाणी किंग कोब्रासारखे अनेक प्रकारचे सर्प पाहावयास मिळतात.

खोतीगाव अभयारण्य

गोव्यातील काणकोण तालुक्‍यातील मुख्यालयापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. जंगली भागातील लोकांचे आयुष्य अनुभवण्याबरोबरच येथे हरणे आणि सरपटणारे प्राणी पाहावयास मिळतात. येथे अनेक वनस्पतींच्या जातींचे संवर्धन केले आहे.

साळावली धरण

पणजीपासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर सांगे तालुक्‍यात आहे. गोव्यातील हे सर्वांत मोठे धरण आहे. येथे पर्यटन खात्याने राहण्याचीही खास सोय केली आहे. याच धरणाजवळ गणपतीचे मंदिरही आहे. धरणामुळे विस्थापित झालेले हे मंदिर सरकारने पूर्वीच्याच साहित्यातून जसेच्या तसे पुन्हा उभारले आहे. हा प्राचीन वारसा पाहताना गोव्यातील पूर्वीचे जीवन किती समृद्ध होते, याचा अनुभव घेता येतो. याच परिसरात राज्य सरकार उभारत असलेले बोटॅनिकल गार्डनही पाहावयास मिळते.

डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य

प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्यावरून नाव मिळालेल्या हे अभयारण्य मांडवी नदीजवळील चोराव बेटावर आहे. पणजीहून बस किंवा टॅक्‍सी पकडून रायबंदर फेअरी डॉकवर यायचे आणि बोटीतून मांडवी नदी ओलांडून चोराव बेटावर उतरायचे. ऑक्‍टोबर ते मार्च हा काळ इथे पक्षी निरीक्षणासाठी चांगला मानला जातो. यात अनेक प्रकारचे पक्षी पाहता येतात. चोडण बेटावरील हे अभयारण्य पक्षी निरीक्षकांना नेहमीच आकर्षित करत राहिले आहे. येथे खारफुटीचे जंगल आहे. यामुळेच या बेटाला अनेक "फ्लाइंग वंडर्स'नी आपले घर केले आहे. मगरी, कोल्हे आणि लांडगे हे प्राणीही या बेटावर पाहायला मिळतात.