दिल्ली

दिल्ली शहराला स्वत:चा असा मोठा इतिहास आहे. पूर्वी त्याच्या तख्तावर बसून राज्य करणं हा राजघराण्यांचा बहुमान समजला जाई. आज त्याला आपल्या देशाच्या राजधानीचा दर्जा प्रदान करण्यात आला. जगभरातल्या पर्यटकांचं ते प्रमुख आकर्षणस्थळ ठरतं.दिल्ली शहराला राजकीय, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटनांचं प्रतीक मानलं जातं. तिथं मुघल, राजपूत आणि अफगाणी साम्राज्याच्या खुणा जागोजागी पाहायला मिळतात. लाल किल्ला, जामा मशीद, हुमायूनची कबर, कुतुबमिनार आणि जंतरमंतर ही तिथली मुख्य ठिकाणं. इतर प्रेक्षणीय स्थळांमध्ये पुरातत्त्व विभाग आणि हवाई दलाचं वस्तुसंग्रहालय, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि बिर्ला मंदिर, अक्षरधाम मंदिर, बांगला साहिब गुरुद्वार ही ठिकाणे बघता येतील. त्याशिवाय राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटही पर्यटकांची आकर्षणस्थळं ठरतात. दिल्ली राजधानीचं ठिकाण असल्यामुळे ते देश तसेच जगभरातल्या सगळ्याच प्रमुख शहरांशी जोडण्यात आलं आहे. दिल्ली विमानतळावरून सतत मोठ्या प्रमाणावर फ्लाईट्‌स सुटतात. रेल्वेने जायचं असल्यास राजधानी एक्‍स्प्रेसच्या राजेशाही प्रवासाचा अनुभव घ्यायला हवा. पर्यटकांच्या वास्तव्यासाठी बजेट हॉटेलपासून ते डिलक्‍स हॉटेलपर्यंत निरनिराळ्या स्वरूपातील पर्याय उपलब्ध आहेत. पुढील प्रवासाकरिता मुक्कामासाठी (ट्रान्झिस्ट हॉल्ट) रेल भवन आणि महाराष्ट्रीय लोकांसाठी बृहन्महाराष्ट्र भवन उपलब्ध होतं. या शहराची व्यापारपरंपरा मोठी असून दागदागिने आणि मौल्यवान खडे, कार्पेट, सिल्क आणि सिल्व्हर वेअर प्रसिद्ध आहे. कनॉट प्लेस, चांदनी चौक आणि करोल बाग या मुख्य बाजारपेठा. पण तिथं जाऊन खरेदी करण्यापूर्वी घासाघीस करण्याची कला मात्र शिकून घ्यावी.

काझीरंगा अभयारण्य

आसाम हे ईशान्य भारतातल्या राज्यांना जोडणारं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. हा संपूर्ण प्रदेश सपाट भूभाग असून नद्या आणि जंगलं यांनी समृद्ध आहे. यामुळे हा प्रदेश प्राण्यांसाठी नंदनवनच ठरतं आणि त्यामुळे या भागात देशातील एक मोठं काझीरंगा अभयारण्य आहे.एकशिंगी गेंडे हे या अभयारण्याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्याशिवाय हत्ती, रानरेडे, सांबार, हरीणं आणि वाघ यांच्यासारखे वनचर प्राणी तसेच हजारो जातींचे पक्षीसुद्धा इथं पाहायला मिळतात. या पार्कमध्ये फिरण्यासाठी निघणाऱ्या हत्तींच्या फेऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबरोबरच जीप आणि मिनी बसमधूनही हिंडता येऊ शकते. या अभयारण्याखेरीज मानस अभयारण्य, ब्रह्मपुत्रा नदी, चित्रचक टेकडीवरील नवग्रह मंदिर आणि नीलाचल टेकडीवरील कामाख्या मंदिरासारखी ठिकाणंही बघण्यासारखी आहेत. काझीरंगाला जाण्यासाठी जोरहाट आणि गुवाहाटीला विमानतळ आहेत. फर्केटिंग हे रेल्वे स्टेशन काझीरंगाला जवळून जोडण्याचं काम करतं. आपल्याकडून जाण्यासाठी मुंबई-गुवाहाटी एक्‍स्प्रेस उत्तम. खासगी बस आणि टॅक्‍सींचा पर्याय वापरता येतो. इथं पर्यटकांच्या सोयीसाठी प्रामुख्यानं जंगलातच कॅम्प, लॉज आणि रिसॉर्टची व्यवस्था केली जाते. नोव्हेंबर मध्यापासून ते एप्रिलपर्यंतचा काळ येथे जाण्यासाठी उत्तम. गुवाहाटीत रेशमी कपडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात; तर काझीरंगा कलात्मक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे.

दार्जिलिंग

"क्वीन ऑफ दि हिल्स'. भारतात हिमालय पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या थंड हवेच्या ठिकाणांमधील महत्त्वाचं "हिल स्टेशन' म्हणजे दार्जिलिंग! हे ठिकाण पश्‍चिम बंगालमध्ये असून, पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचं श्रेय इंग्रजांकडे जातं. त्याला "क्वीन ऑफ दि हिल्स' या नावानंही संबोधतात. दार्जिलिंग प्रामुख्यानं चहाचे मळे आणि दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेकरिता प्रसिद्ध असून, "युनेस्को'नं त्याला जागतिक वारशाचा दर्जा प्रदान केला आहे. ते समुद्रसपाटीपासून 2,134 मीटर उंचीवर आहे. टायगर हिल्स हा त्या परिसरातील सगळ्यात उंच भाग म्हणून ओळखण्यात येतो.मार्च ते सप्टेंबर हा येथील मुख्य हंगाम असतो. तिथं पाहण्याजोगी अनेक ठिकाणं आहेत. उदा. जपानी पॅगोडा, लॉईड बॉटनिकल गार्डन, कांचनगंगा, टाऊन ऑफ घूम, हिमालयीन माऊंटेनियरिंग इन्स्टिट्यूट, पद्मजा नायडू हिमालयीन झुऑलॉजिल पार्क, धीरधाम मंदिर.दार्जिलिंगला जाण्यासाठी बागदोगरा हा प्रमुख विमानतळ असून, त्याला अनेक शहरांतील विमानसेवांनी थेट जोडण्यात आलं आहे. रेल्वेनं जायचं असल्यास न्यू जलपायगुडी स्थानकावर उतरावं लागतं. पुढ प्रसिद्ध टॉय ट्रेननंही प्रवास करता येतो. कोलकत्ता आणि अन्य ठिकाणांहून सरकारी तसेच खासगी बससेवा आणि टॅक्‍सी सेवा उपलब्ध आहे. इथं येऊन खास हिमालयीन प्रदेशात मिळणारी औषधं आणि औषधी वनस्पतींची खरेदी करणं महत्त्वाचं ठरतं. त्याखेरीज येथील कपडे, दागिने आणि मूर्तीही प्रसिद्ध आहेत.


रेल्वे - दार्जिलिंगला सर्वात जवळ असलेले रेल्वेस्थानक म्हणजे न्यु जलपायगुडी (88 कि.मी.). मुंबई, कोलकाता, दिल्ली, गुवाहाटी, वाराणसी, बंगळूर, चेन्नई आदी ठिकाणांहून येथे जाता येते.


बस-टॅक्‍सी - एकदा का जलपायगुडीला तुम्ही उतरलात की, तुम्हाला दार्जिलिंगला जाण्यासाठी टॅक्‍सी, ऑटो रिक्षा उपलब्ध होतात.

ताजमहाल

भारत दर्शन करायला निघालं, तर आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम येतो ताजमहाल, जगातल्या सात आश्‍चर्यांपैकी एक म्हणून गणला जाणारा...राजा शहाजहान याने आपली पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधलेली वास्तू म्हणून ताजमहाल ओळखला जातो. त्यातून इंडो-पर्शियन कलाकुसरीचे उत्तम दर्शन घडते. त्याची प्रमाणबद्ध रचना, नाजूक नक्षीकाम व अप्रतिम सौंदर्य नजरेत भरण्याजोगंच आहे. प्रेमाचं प्रतीक बनलेल्या या ताजमहालाची मनमोहक रूपे वेगवेगळ्या वेळी पर्यटकांना पाहता येतात. ताजमहालाखेरीज लाल किल्ला, जहांगीर पॅलेस, इतमद्‌-उद-दाऊला कबर, राधाओसामी समाधी, अकबराची समाधी ही इतर काही प्रेक्षणीय स्थळंही या शहरात बघता येतात. आगऱ्यापर्यंत पोचण्यासाठी सहा किमी अंतरावर खेरिया हा मुख्य विमानतळ आहे. बाहेरून येणाऱ्या फास्ट आणि सुपरफास्ट ट्रेन आग्रा रेल्वे स्थानकावरच थांबतात. पर्यटकांसाठी सर्वसामान्य हॉटेलांपासून ते पंचतारांकित डिलक्‍सपर्यंत अनेक प्रकारची हॉटेलं उपलब्ध आहेत. इथं मिळणाऱ्या मोगलाई डिशेसही खवय्यांचं खास आकर्षण ठरतात. आगऱ्याला येऊन खरेदी करणं हाही एक महत्त्वाचा भाग असतो. त्यासाठी सदर बाजार, ताज गंज, किनारी बाजार व प्रताप पुरा यांसारखी ठिकाणं प्रसिद्ध आहेत. तिथं प्रामुख्यानं हस्तनिर्मित आणि कलाकुसरीच्या वस्तू विकत मिळतात.

कसे जायचे -

ट्रेन - दिल्लीहून आग्रा हे शहर रेल्वेने चांगल्याप्रकारे जोडले गेले आहे. शताब्दी एक्‍सप्रेस-दोन तास, ताज एक्‍सप्रेस-अडीच तास आणि इंटरसिटी एक्‍सप्रेस-तीन तास.

बस - दिल्ली, जयपूर, लखनो, ग्वालियर या ठिकाणाहून बससेवा मिळू शकते.