कोकणची पंचनदी

पंचनदी या गावाच्या जेवढा गोडवा आहे तेवढेच हे गाव देखणेही आहे. चारी बाजूंनी हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या बेचक्‍यात वसलेल्या हे शांत, निरागस गाव आपल्याला थेट गो. नी. दांडेकरांच्या, मधू मंगेश कर्णिकांच्या कादंबऱ्यांच्या जगात घेऊन जाते. इथे "अय्या', "इश्‍श' म्हणत झक्क लाजणाऱ्या बायका अजून अस्तित्वात आहेत. बोलण्याच्या ओघात मध्ये मध्ये अस्सल कोकणी भाषा बोलणारे टिपिकल पुरुष आहेत. कॉम्प्युटर, टीव्ही, असल्या वस्तूंचे फारसे कौतुक कोणालाच नाही. इथे दिवेलागणीच्या वेळी अजूनही देवघरातून निरांजने लागतात. मग घरोघरी "शुभंकरोति' खणखणीत आवाजात म्हटले जाते. भजन, कीर्तन, पारावरच्या गप्पा ही अजूनही विरंगुळ्याची साधने आहेत. गावचे प्रशस्त, रमणीय सप्तेश्वराचे मंदिर हे इथले जणू सांस्कृतिक केंद्र आहे. प्रत्येक दिवशी सायंकाळी तिथे सनई लावली जाते. त्याचे मंगल सूर ऐकताना अलौकिक शांतीचा अनुभव येतो. स्वप्नवत वाटते ना हे सारे? पण हे खरे आहे. ज्यांनी नुकतीच पन्नाशी-साठी पार पाडली आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी इथले वास्तव्य हा एक छानसा नॉस्टॉलजिक अनुभव देऊन जाईल आणि मुला-बाळांसाठी हे बनेल एक मामाचे गाव- ज्याची संकल्पनाच हल्ली मोडीत निघाली आहे. पण त्यातली मजा, त्यातला आनंद तुम्ही तुमच्या मुला-नातवंडांसकट येथे अनुभवू शकाल. इथून जेमतेम दोन किलोमीटर अंतरावर कोळथऱ्याचा स्वच्छ, शांत समुद्रकिनारा आहे. अगदी चालत जायचे ठरवले तरी थकवा येणार नाही. कारण गावातले सर्वच रस्ते झाडीचे आहेत. तेही नको असेल तर इथल्या नारळ, सुपारीच्या दाट वाड्यांमध्ये फिरावे, पाटाच्या पाण्याशी खेळावे. त्यातही मज्जा आहे. संध्याकाळी डोंगरावरील झाडीत जाऊन मनसोक्त काळी करवंदे खावीत; काजू, जांभळे, कैऱ्या हा रानमेवाही लुटावा आणि धरणाची वाट धरावी. हे धरणही प्रेक्षणीयच आहे. या धरणाच्या पाण्यामुळे गाव अधिकाधिक सुजलाम्‌ सुफलाम्‌ बनलेले आहे. त्यामुळे भाज्यांचे मळेही नेहमीप्रमाणे तरारले असतात. उन्हाळ्यातही या गावाला भरपूर पाणी असते. या गावच्या नदीचे नावही पंचनदी असेच आहे. कधी या नदीत जाऊन मनसोक्त डुबक्‍या माराव्यात. सर्व हिलस्टेशनवर असलेल्या गर्दीचाच एक भाग बनून तिथल्या वेगवेगळ्या पॉईंट्‌सवर झुंबड उडवणे, वातानुकूलित हॉटेलात लोळत टीव्ही पाहणे आणि त्याच त्याच तेलकट पदार्थांवर ताव मारणे, या नेहमीच्या सुट्टी घालविण्याच्या सरळधोपट कार्यक्रमांना कंटाळला असाल, तर जरूर या गावाला भेट द्या. तेथे श्री. पद्माकर (भाऊ) वैशंपायन यांचा "प्रियश्री अभ्यागताश्रम' आहे. इथे टीव्ही, ए.सी. नाहीत, पण नैसर्गिक गारवा आणि निवांतपणा आहे. इथल्या प्रसन्न वातावरणात भरपूर आराम करून इथला रसरसलेला निसर्ग अनुभवावा. अजूनही इथल्या माणसांमध्ये असलेली घट्ट नात्यांची वीण, त्यातला उबदारपणा तुम्हाला नक्कीच सुखावून जाईल. "प्रियश्री'मध्ये शुद्ध शाकाहारी रुचकर जेवणाची उत्कृष्ट सोय आहे. उकडीचे मोदक, पानग्या, डाळिंब्याची उसळ, केळफुलाची, फणसाची भाजी असले अस्सल कोकणी पदार्थ येथे उदंड; तर बटाटेवडे, कांदा भजी असले झणझणीत पदार्थही मिळतात. तुम्ही फक्त फर्माईश करायची, तुमच्या जिभेचे चोचले इथे तत्परतेने पुरविले जातील. इथून जवळच दाभोळ हे ऐतिहासिक बंदर आहे. गुहेमधील चंडिकामंदिर, दाट सुरूचे बन आणि स्वच्छ समुद्रकिनारा ही येथली वैशिष्ट्ये आहेत. डॉ. भाई मोकल यांनी या बंदरावर सुरू केलेल्या फेरीबोटीच्या फेरीमुळे वेळणेश्‍वर, हेदवी, गुहागर ही ठिकाणेसुद्धा तुम्ही एका दिवसात बघून येऊ शकता. याच बंदरावर डॉ. मोकल यांच्यातर्फे भाड्याने खासगी लॉंच दिली जाते. त्यामुळे समुद्रसफरीचा रोमांचक अनुभवही इथे तुम्हाला मिळू शकतो. इथे घालविलेली आगळीवेगळी सुट्टी तुमच्या नेहमीच आठवणीत राहील. पंचनदी हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्‍यात आहे. दापोलीला आल्यावर दापोली-दाभोळमार्गे जाता येते किंवा दापोली-बुरोडी- पंचनदी या मार्गेही जाता येते. दोन्ही बाजूंनी एसटीच्या गाड्या दर दोन तासांनी आहेत.
डॉ. वैशाली उमेश वैशंपायन दापोली, जि. रत्नागिरी
(साभार ः सकाळ)