काझीरंगा अभयारण्य

आसाम हे ईशान्य भारतातल्या राज्यांना जोडणारं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. हा संपूर्ण प्रदेश सपाट भूभाग असून नद्या आणि जंगलं यांनी समृद्ध आहे. यामुळे हा प्रदेश प्राण्यांसाठी नंदनवनच ठरतं आणि त्यामुळे या भागात देशातील एक मोठं काझीरंगा अभयारण्य आहे.एकशिंगी गेंडे हे या अभयारण्याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्याशिवाय हत्ती, रानरेडे, सांबार, हरीणं आणि वाघ यांच्यासारखे वनचर प्राणी तसेच हजारो जातींचे पक्षीसुद्धा इथं पाहायला मिळतात. या पार्कमध्ये फिरण्यासाठी निघणाऱ्या हत्तींच्या फेऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबरोबरच जीप आणि मिनी बसमधूनही हिंडता येऊ शकते. या अभयारण्याखेरीज मानस अभयारण्य, ब्रह्मपुत्रा नदी, चित्रचक टेकडीवरील नवग्रह मंदिर आणि नीलाचल टेकडीवरील कामाख्या मंदिरासारखी ठिकाणंही बघण्यासारखी आहेत. काझीरंगाला जाण्यासाठी जोरहाट आणि गुवाहाटीला विमानतळ आहेत. फर्केटिंग हे रेल्वे स्टेशन काझीरंगाला जवळून जोडण्याचं काम करतं. आपल्याकडून जाण्यासाठी मुंबई-गुवाहाटी एक्‍स्प्रेस उत्तम. खासगी बस आणि टॅक्‍सींचा पर्याय वापरता येतो. इथं पर्यटकांच्या सोयीसाठी प्रामुख्यानं जंगलातच कॅम्प, लॉज आणि रिसॉर्टची व्यवस्था केली जाते. नोव्हेंबर मध्यापासून ते एप्रिलपर्यंतचा काळ येथे जाण्यासाठी उत्तम. गुवाहाटीत रेशमी कपडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात; तर काझीरंगा कलात्मक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे.

No comments: