महर्षी कर्वे यांचे मुरूड

मुरूड समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनस्थळांचा विचार करताना अगदी अलिबागपासून गोव्यापर्यंत मन भरारी मारून येतं. यातच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीपासन नऊ किलोमीटर अंतरावरील मुरूडचा रम्य किनारा मनाला विशेष मोहून टाकणारा आहे. स्वच्छ किनाऱ्यावर भटकणे, शांत समुद्रामध्ये मनसोक्त डुंबणे व कोकणी पदार्थांचा आस्वाद घेणे, यासाठी मुरूड हे गाव पर्यटकांच्या खास लक्षात राहण्यासारखेच आहे. पुण्याहून 200 किलोमीटर दापोली आणि दापोलीपासून नऊ किलोमीटरवर मुरूड हे महर्षी कर्वे यांचे जन्मगाव. नारळ-पोफळीच्या बागा, कौलारू घरे, सारवलेली अंगणे पाहत पाहत आपण सरळ समुद्रावरच पोचतो व तो विशाल सागर आपल्याला खिळवूनच ठेवतो. याच सागराच्या सान्निध्यात व अगदी नारळाच्या बागेत एक साधे पण सुंदर रिसॉर्ट आहे... श्री. सुरेश बाळ यांचे "मुरूड बीच रिसॉर्ट'. येथे गरमागरम उकडीचे मोदक, आंबोळी, थालीपीठ यासारखे कोकणी पदार्थ आधी कळवल्यास आधी पर्यटकांसाठी बनवतात. तसेच त्यांच्याकडे पोहा पापड, आमसुले, आंबापोळी, फणसपोळी इ. पदार्थ मागणीनुसार उपलब्ध असतात. शिवाय त्यांच्या बागेत जायफळ, लवंगा, काळी मिरी इत्यादी झाडेही पाहायला मिळतात. मुरूडच्या किनाऱ्यावरून सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग व हर्णैचा दीपस्तंभही दिसून येतो. मुरूड गावात दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या खांबांवर नक्षीकाम केलेले आहे, तर पुढील बाजूस नगारखाना व दगडी दीपमाळ आहे. मुरूडपासून चार-पाच किलोमीटर अंतरावर आंजर्ले गाव वसलेले आहे. तेथील गर्द झाडी असणाऱ्या टेकडीवर सुंदर गणेश मंदिर आहे. दापोली-दाभोळ रस्त्यावर असलेली पन्हाळेकाजी लेणी हेही पर्यटकांना पाहण्यासारखे स्थान आहे. दाभोळहून जेटीने किंवा फेरीबोटीने खाडी पार करून गुहागर, हेदवी व वेळणेश्‍वर अशा पर्यटनस्थानांची ओळख करून घेता येते. ही फेरीबोट दुचाकी, चारचाकी वाहने व माणसे यांना वाहून नेते व ही सेवा वाजवी दरात सतत उपलब्ध असते. तसेच मुरूडच्या किनाऱ्यावर राहून पर्यटक रायगड किल्ला, चिपळूणजवळील परशराम मंदिर, दिवेआगर येथील सोन्याचा गणपती इत्यादी ठिकाणे पाहून परत येऊ शकतो.

वाईची हिरवाई

पुण्याहून महाबळेश्‍वर,पाचगणीला जाण्याऐवजी वाईला गेल्यावर कृष्णाकाठी घाटावर पुरातन मंदिरे आहेत. त्यात एक ढोल्या गणपती मंदिर (दहा फुटी गणपती मूर्ती आहे. मंदिर सुंदर आहे) आहे. जवळच श्री शंकराचे कोरीव कामाचे सुंदर मंदिर आहे. मंदिर, नदी, शिवलिंग फारच सुंदर आहे. ते पाहून वाईतून धोम गाव व धरणाकडे एक रस्ता जातो. रस्त्याच्या कडेने दाट झाडी आहे व हिरवीगार शेते. बाराही महिने हा परिसर हिरवागार असतो. मन प्रसन्न होते. शुद्ध हवा, मनाला भुरळ घालणारा आसमंत. पुढे या रस्त्याने पाच-सहा मैलांवर कृष्णाकाठचे मेणवली गाव लागते. गाव पेशवेकालीन आहे. येथे जुने वाडे आहेत. नाना फडणवीस यांचा वाडा आहे. वाड्याची रचना वेगळी व कल्पक आहे. नैसर्गिक रंगाची भिंतीचित्रे आहेत. नानांचा शिसमचा मोठा पलंग आहे. वाडा बराच पडझड झालेला आहे. आता तेथे नोकरचाकर राहतात. वाड्याचा बराच भाग बंदिस्त आहे. तेथेच कृष्णाकाठी चंद्रकोराकृती सुंदर घाट आहे. पुरातन मंदिरे आहेत. संथ वाहणारी कृष्णा नदी, आजूबाजूस दाट झाडी, त्यामुळे परिसर फारच निवांत, रमणीय आहे. पुढे त्याच रस्त्याने सात मैलांवर धोम गाव आहे. डाव्या बाजूस धोम धरण, गाव, कृष्णा नदी, सुंदर घाट, नृसिंह मंदिर व अप्रतिम शिल्पकलेचे काळ्या पाषाणातील शिवालय व यापुढील अनोखे नंदी मंदिर व छोटी किल्लेवजा गढी आणि सर्वत्र निसर्गरम्य परिसर. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनाला भुरळ घालणारी नीरव शांतता. आपल्याला गडबड-गोंगाटाची सवय, पण येथे वेगळाच अनुभव... जसे काय ऋषिमुनींचे तपस्यास्थान असावे. वाईस गेल्यावर मंदिरापासून जवळ, गावात बंडा जोशी यांची खाणावळ आहे. घरगुती सुग्रास जेवण मिळते. जेवणात वरण-भात, गरम घडीची पोळी, उसळ, आमटी, चटणी, कोशिंबीर, ताक असा जेवणाचा बेत असतो. जेवणाचे दरही स्वस्त आहेत. मन तृप्त होते. तेथून पुढे उजव्या बाजूच्या रस्त्याने बलकवडी धरण व धोम धरणाचा परिसर लागतो. धरणाच्या पाण्यात नौकानयन करून पुढे बलकवडी धरणासाठी जाता येते. धरणाचे काम अर्धवट आहे, पण परिसर निसर्गरम्य आहे. एक-दोन पुरातन मंदिरे आहेत. ते पाहून आपण त्याच रस्त्याने परत वाईस येऊन पुण्यास आठ वाजेपर्यंत सहज पोचू शकतो. सर्व प्रवास 130 किलोमीटरचा होतो. जर दोन दिवस अवधी असेल तर वाईस बऱ्यापैकी लॉज आहेत. आनंदवनसारखे मेणवली रस्त्यावर राहण्याचे, निसर्गाच्या सान्निध्यात, तेही स्वस्तात सोय असलेले ठिकाण आहे. दुसऱ्या दिवशी पाचगणीस जाऊन पाचगणी स्थळदर्शन करून आपण संध्याकाळी पुण्यास आरामात येऊ शकतो.
- सुभद्रा गोसावी

शिरसाड

शिरसाड एक दुर्लक्षित पर्यटन स्थळ. मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगाव या तालुक्‍याच्या ठिकाणापासून पूर्वेला 15 किलोमीटर अंतरावर बोरवाडी हे गाव सह्याद्रीच्या उंच शिखरांच्या पायथ्याशी वसले आहे. या परिसरामध्ये शिवकालात बऱ्याच लढाया झालेल्या असल्याने या परिसराला "शिरछाट'चा अपभ्रंश होऊन "शिरसाड' टप्पा, असे म्हटले जाते. या परिसरातील "बोरवाडी' (बारा वाड्यांचे प्रमुख आश्रयस्थान) या पायखस्त होत चाललेल्या गावातील शहरी भागात गेलेल्या लोकांनी एकत्र येऊन तेथील मंदिरांच्या परिसरात शासकीय मदतीशिवाय वृद्ध, रुग्णाइतांची सोय व्हावी या उद्देशाने "माऊली वृद्धाश्रम' चालविला आहे. सुमारे तेवीस लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक सोईंनी युक्त असलेल्या या आनंदाश्रमामध्ये तीस वृद्ध राहत आहेत. हा वृद्धाश्रम विठ्ठल-रखुमाई देवस्थान ट्रस्टमार्फत सशुल्क चालवला जातो. हा आश्रम पाहण्यासारखा आहेच, परंतु तेथे आलेल्यांची निवास व भोजनाची (शाकाहारी) अवस्था अत्यल्प दरामध्ये केली जाते. याच परिसरात किल्ले रायगड, मानगड, गांगवली (छ. शाहूमहाराजांचे जन्मस्थान) एक प्रचंड देवराई, ही ऐतिहासिक ठिकाणे आहेतच, त्याचबरोबर कुंभे (नियोजित जलविद्युत प्रकल्पस्थान) जोर, केळगण ही थंड हवेची ठिकाणे आहेत. तेथील खेडूत राहण्या-जेवणाचीही सोय करतात. मध्यमवर्गीयांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी ही ठिकाणे आहेत. त्याचबरोबर वृद्धाश्रमातील वृद्धांबरोबर गप्पा मारताना, तसेच "आपणाला कोणीतरी भेटायला आले आहे,' याचा त्या वृद्धांना होणारा आनंद होतो खासच आनंददायी अनुभव असतो. भ्रमंतीच?या आनंदाबरोबरच सामाजिक जाणिवेचा आनंदही या निमित्ताने मिळू शकतो. गटाने सहलींच्या दृष्टीनेही हा परिसर चांगला आहेच, गिर्यारोहण व निसर्गभ्रमण करणाऱ्यांना तर ही पर्वणीच ठरेल, असा हा परिसर आहे.
- साभार ः सकाळ