भीमाशंकर तव शरणम्‌

पावसाळा सुरू झाला की आषाढ संपून श्रावण कधी येतो ते कळतसुद्धा नाही. श्रावणात सह्याद्री पावसात न्हाऊन तृप्त झालेला असतो. त्याच्या अंगाखांद्यावरून पाण्याचे ओहोळ खळाळत असतात. रानहळदीची फुलं फुललेली असतात. अशाच एखाद्या श्रावणातल्या रविवारी पायथ्याच्या खांडस गावातून भीमाशंकरचा डोंगर चढायचा. संध्याकाळी भीमाशंकरला पोहोचले की वरती मुक्काम करायचा. दुसऱ्या दिवशी असतो श्रावणी सोमवार. भीमाशंकराचं पहाटे दर्शन करायचं. गुप्त भीमाच्या धबधब्याखाली भिजायचं. पुढच्या वर्षी पुन्हा येईन सांगून देवाचा निरोप घ्यायचा. कित्येक वर्षं श्रावणातला पहिला सोमवार मी चुकवला नव्हता. त्याच्या आठवणी अजूनही मन ताजंतवानं करतात. मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकापासून रिक्षाने खांडस गाव गाठायचं. खांडस गावाला सह्याद्रीची मुख्य रांग लागूनच आहे. खांडस गावातून भीमाशंकराची चढाई दोन टप्प्यांत करायची. त्यातला पहिला टप्पा चढण्यासाठी गणपती घाट व शिडी घाट असे दोन मार्ग आहेत. गणपती घाटात घाटाचं रक्षण करणाऱ्या देवतेचं, गणपतीचं मंदिर आहे. गणपती घाट तुलनेने चढायला सोपा आणि निसर्गरम्य आहे. गणपती घाटाने चढताना पदरगडाचं अतिशय सुंदर दर्शन होतं. घाट चढताना लागणारे ओहोळ व धबधबे प्रवासाचा शीण अजिबात येऊ देत नाहीत. गणपती घाटाने पहिला टप्पा चढायला चार तास लागतात. पहिला टप्पा चढायची अधिक जोखमीची वाट म्हणजे शिडीची वाट. ही वाट अधिक उभ्या चढणीची असून वाटेत तीन ठिकाणी शिड्या लावल्या आहेत. त्याशिवाय एका ठिकाणी वाट इतकी अरुंद आहे की दरीकडे पाठ करून कातळात केलेल्या खोबणीत दोन्ही हाताची बोटं रुतवून ती पार करावी लागते. शिडीने पहिला टप्पा चढायला तीन तास पुरेत. पहिला टप्पा संपून चढायचा दुसरा टप्पा सुरू होताना पठार लागतं. त्या पठारावर खांडस गावातून चढून येणाऱ्या शिडीची वाट व गणपती घाट या दोन्ही वाटा एकत्र येतात. येथून पुढे झिगझॅग चढणारी वाट दमछाक करायला लावते. दोनेक तासांच्या चढाईनंतर शेवटच्या टप्प्यात वाट दरीला समांतर होते, चढ कमी होतो. पावसाळ्यात आलात तर दरी धुक्‍याने भरलेली असते. पायाखालची वाटही दूरवर दिसत नाही. आपण स्वर्गात आहोत आणि थेट ढगात चालतो आहोत, असा भास होतो. अर्ध्या तासाच्या चालीनंतर आपण भीमाशंकराच्या पठारावर प्रवेश करतो. इथे धुकं असतंच, पण सोबतीला गार बोचरा वारासुद्धा असतो. पाचेक मिनिटं चालल्यावर धुक्‍यातूनच अंधुक गाड्यांचे हेडलाईट दिसायला लागतात आणि आपण भानावर येतो. अरे, या जादुई दुनियेत या गाड्या कुठून आल्या? गाडीतळापासून मंदिरापर्यंत उतरत्या पायऱ्यांची वाट आहे. तिथल्याच एखाद्या घरात आपली पथारी पसरायची. भीमाशंकरची उंची आहे 3250 फूट. श्रावणात पठारावर पाऊस सतत भुरभुरत असतो. भीमाशंकराच्या मंदिराचा कळस धुक्‍यात हरवून गेलेला असतो. भीमाशंकर मंदिराची बांधणी नागर किंवा उत्तर भारतीय पद्धतीची आहे. मंदिराशेजारीच मोक्षकुंड आहे. शंकराचं दर्शन झालं की जंगलात जाणाऱ्या वाटेने गुप्त भीमाशंकराकडे निघायचं. भीमा नदीच्या पात्रात तीन टप्प्यांत असणारा धबधबा आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याची उंची आहे सात फूट. तिथे कातळावर छोटी शिवलिंगं कोरली आहेत. मोठ्या कुंडात उगम पावलेली भीमा गुप्त भीमाशंकरला पुन्हा प्रगट होते असं म्हणतात. गुप्त भीमाशंकर पाहून परत येताना धबधब्याच्या आधी नदी ओलांडायची आणि वेगळ्या वाटेने मंदिराकडे परतायचं. या वाटेवरसुद्धा एक फोटोजिनिक धबधबा आहे. नाना फडणविसांनी मंदिराचा जीर्णोधार केला होता. वसई विजयाचं चिन्ह असणारी एक मोठी घंटा या मंदिर परिसरात आहे. भगवान शंकरांनी इथे त्रिपुरासुराचा वध केला होता. त्रिपुरारी पौर्णिमेला इथे मोठा उत्सव असतो. भीमाशंकर ते गुप्त भीमा दरम्यानच्या जंगलात तुम्हाला शेकरू दिसू शकतो. ही असते उडणारी खार. तपकिरी रंगाचा हा प्राणी त्याच्या पांढऱ्या झुबकेदार शेपटीसह सुंदर दिसतो. पावसाळा संपताना शेकरू त्याच्या झाडावरच्या घरट्याजवळ दिसू शकतो. गुप्त भीमाशंकराहून पुढे गेल्यावर अर्ध्या तासात रस्ता एका तिठ्यावर येतो. नदीच्या बाजूने जाणारा रस्ता जातो भोरगिरी किल्ल्यावर आणि नदी ओलांडून जाणारा रस्ता जातो वांद्रेवाडीला. वांद्रेवाडी-भीमाशंकर हा ट्रेकसुद्धा करण्यासारखा आहे. मुंबईहून कर्जतला जाताना भिवपुरी रोडहून वांद्रेवाडीची खिंड आपल्याला दिसते. भिवपुरी-वांद्रेवाडी-भीमाशंकर रस्ता कित्येक वर्षं फायलीमध्ये पडून आहे. भीमाशंकराच्या उत्तरेला असणाऱ्या अहुपे घाटातूनसुद्धा भीमाशंकर ट्रेक करता येतो. त्याशिवाय लोणावळा, तुंगार्ली, वळवण, मांजरसुंभा, कोंडेश्‍वर, कुसूर, सावळ, वांद्रेवाडी असा ट्रेकही करता येतो. भीमाशंकरला रस्त्याने यायचं, वर चाकण अथवा जुन्नर करत खेड मंचरला यायचं. इथून दोन तासांच्या घाट रस्त्यानंतर भीमाशंकरला पोहोचता येतं. राहण्या-जेवण्याच्या घरगुती स्वरूपाच्या सोयी इथे आहेत. हॉटेलं मात्र नाहीत. ज्योतिर्लिंग असल्याने देशभरातून भाविक इथे येत असतात. पण स्वच्छता, पाणी इत्यादी मूलभूत सुविधा इथे आढळत नाहीत. त्या लवकरच होतील अशी आशा. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात तुम्ही इथे याल तेव्हा किमान अपेक्षा ठेवून या. आंबेगाव व खेड तालुक्‍याच्या वादात या देवस्थानाचा विकास होईल तेव्हा होईल, ट्रेकर्सचं मात्र इथे स्वागत आहे. ओम शिव ओम शिव परात्वराशिव, ओंकाराशिव तव शरणम्‌! हे शिवशंकर भवानीशंकर, उमामहेश्‍वर तव शरणम्‌।
- मधुकरी धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट

युनिटyhai_malad@rediffmail.com">mailto:युनिटyhai_malad@rediffmail.com
साभार ः सकाळ

ट्रेक सह्याद्री...

ट्रेक सह्याद्री...

"राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा...' असं महाराष्ट्राचं वर्णन कुसुमाग्रजांनी करून ठेवलंय, ते खरंच आहे। हा दगडांचा देश आहे, पण या दगडांतूनही सौंदर्याच्या खाणी पसरल्या आहेत आणि त्यांचा अनुभव घ्यायला जावं लागतं सह्याद्रीच्या कुशीत...

पहिल्या दिवशीचा मुक्‍काम असेल कर्जत येथील बेस कॅम्पला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या खऱ्या पदभ्रमणाला सुरुवात होईल. कोंदिवडे गावातून आपण निघू राजमाचीच्या रोखाने. संपूर्ण चढाईचा दिवस. मात्र ही चढाई नुसती चढाई नाही. या वाटेवर आपण पाहणार आहोत "कोंढाणा लेणी'. या लेण्यांना "कोंढाणा लेणी' म्हटलं जातं ते या लेण्यांच्या पायालगत असलेल्या कोंढाणा या गावाच्या नावावरून; मात्र या गावातून येणारा रस्ता जास्त खडतर असल्यानं आपण कोंदिवडे गावातून या लेण्यांकडे येणार आहोत. ज्या वाटेनं आपण चालणार, तो कोणे एके काळी राजमार्ग असावा. कारण या वाटेवर असणारी कोंढाणा लेणी आणि डोंगरांच्या माथ्यावर असणारा राजमाची किल्ला. लेण्यांची निर्मिती ही नेहमीच राजसत्तेच्या संरक्षणाखाली आर्थिक मदतीने करण्यात आलेली आहे. अत्यंत नाजूक कलाकुसरीने नटलेली ही लेणी ख्रिस्त जन्मापूर्वी सुमारे 200 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली असावीत, असं म्हटलं जातं. ही अती प्राचीन लेणी पाहून आपण दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेऊन राजमाचीकडे प्रस्थान करतो. संध्याकाळी पोहोचतो. मोहिमेचा तिसरा दिवस आपण राजमाची किल्ल्याच्या प्रदेशात घालविणार आहोत. मनरंजन व श्रीवर्धन ही किल्ल्यांची जोडगोळी म्हणजेच "राजमाची किल्ला'. थेट ख्रिस्तपूर्ण 200 वर्षे जुना. राजमाची वळलाय तो कुसूर घाटाच्या तोंडावर आणि जोडला गेलाय 300 मी. लांब सह्याद्रीच्या रांगेशी. संपूर्ण परिसर घनदाट अरण्यानं वेढलेला, विविध प्रकारच्या वन्य श्‍वापदांनी संपन्न. पूर्वेच्या बाजूला श्रीवर्धन, तर पश्‍चिमेस मनरंजन हे दोन बालेकिल्ले. त्यांच्या मधल्या खिंडीत वसलंय भैरोबाचं मंदिर. याच परिसरात राजमाचीच्या दक्षिणेस दूरवर आपणास दिसतो ड्यूक्‍स नोज, तर नैऋत्येस ढाक भैरी. 1648 मध्ये हा किल्ला हिंदवी स्वराज्यात आला आणि त्यानंतर शेवटी 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. ट्रेकच्या चौथ्या दिवशी आपण राजमाचीहून कार्ला लेण्यांकडे निघणार आहोत. वाटेत लागणारं शिरोड धरण, त्याचा जलाशय पाहणार आहोत. महाराष्ट्रात जी अत्यंत महत्त्वाची अशी लेणी आहेत, त्यातील एक "कार्ला लेणी.' इंद्रायणी नदीच्या विस्तीर्ण प्रदेशात उंच डोंगरात खोदलेली. कार्ले हे गाव दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध. एकवीरा मातेचं मंदिर आणि लेणी. एकवीरा हे कोळी बांधवांचं आराध्य दैवत. याच मंदिराच्या मागच्या बाजूस लांबलचक डोंगरात खोदली गेलीत बौद्धकालीन लेणी. या लेण्यांची निर्मिती अदमासे ख्रिस्तपूर्व 100 वर्षे इतकी जुनी आहे. मुख्य लेण्यातील स्तूप हा "स्तूप' या शब्दाची व्युत्पत्ती समजाविणारा सध्या अस्तित्वात असलेला एकमेव स्तूप आहे. सकाळी उठून आपण निघणार आहोत आपल्या शेवटच्या मुक्कामाच्या दिशेने, अर्थात लोहगडाकडे. वाटेत मळवली रेल्वेस्थानक लागतं. हा परिसर पक्षी निरीक्षणासाठी अगदी योग्य आहे. विविध प्रकारचे पक्षी आपल्याला या परिसरात पहाटेच्या वेळी पाहायला मिळतात. भाजे गावाकडे आपण कूच करतो. या गावाच्या पूर्वेस असलेल्या डोंगरातील लेण्यांकडे जाणारी पायऱ्यांची वाट आपल्याला भाजे लेण्यांकडे घेऊन जाते. महाराष्ट्रातील "सर्वात प्रथम खोदली गेलेली लेणी' असा भाजे लेण्यांचा उल्लेख केला जातो. ख्रिस्तपूर्व 240 वर्षे खोदलेली ही लेणी. या ठिकाणी एकंदर 20 गुहा असून त्यामध्ये दोन चैत्य, अशी रचना आहे। ख्रिस्तपूर्व 270 वर्षं सुरू झालेलं या लेण्यांचं खोदकाम इ.स. 1200 पर्यंत अखंड चालू होतं. या लेण्यांतील स्तूप हा दगडात कोरलेला आहे. ही लेणी पाहून आपण विसापूर किल्ल्यावर येतो. येथील तटबंदी, तोफ फिरविण्याची जागा इत्यादी गोष्टी पाहून आपण दक्षिणेतील घळीतून खाली उतरतो. ही उतरणसुद्धा थोडी जोखमीचीच, पण मजेशीर, एक वेगळा अनुभव देणारी. संध्याकाळ झालेली असते. सूर्य मावळतीकडे झुकलेला असतो. लोहगडाची सावली विसापूरचं चुंबन घेत असते आणि आपण लोहगडाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतो... आजचा मुक्काम लोहगडावरच! .... सकाळ. आज ट्रेकचा शेवटचा दिवस. मनात परतीचे वेध लागलेले असतात. आज आपण लोहगड पाहणार आहोत. शिवकालात सुरतेची लूट येथेच ठेवून महाराज राजगडाकडे प्रस्थान करते झाले. सातवाहन - बहामनी - निजामशहा - आदिलशहा - मराठे - मुघल - मराठे - मुघल - कान्होजी आंग्रे - पेशवाई अशी राजवटींची श्रृंखला अनुभवलेला हा किल्ला अखेर तोफेचा एकही गोळा न फेकता निमूटपणे इंग्रजांच्या हवाली झाला. या गडावरील लोमेश ऋषींची गुहा, चार दरवाजे, विंचू काटा या काही उल्लेखनीय वास्तू. असा हा लोहगड पाहून आपण लोणावळ्याच्या दिशेने निघतो.
- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट।
yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

रामसेज, वाघेरा, खैराई

रामसेज, वाघेरा, खैराई

नाशिक पेठ रस्त्यावरच्या जकात नाक्‍यापुढे आशेवाडी गाव आहे. आतिथ्यशील गावकऱ्यांच्या आशेवाडीत मारुतीचं प्रशस्त मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारून छोटेखानी रामसेज किल्ल्यावर चढाई करता येते. आशेवाडीच्या दिशेला दिसणारा रामसेजचा बुधला डावीकडे ठेवत पुढे गेल्यावर रामसेज किल्ल्यावर चढणाऱ्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांनी वर चढून आल्यावर गडावर प्रवेश करण्यापूर्वी रामाचं मंदिर आणि थंडगार पाण्याची टाकी आहे. मारुती ते राम, हे अंतर आहे फक्‍त एका तासाचं! रामसेज गडमाथ्यावर कोरडी पाण्याची टाकी, पडक्‍या जोत्याचे अवशेष आहेत. माथ्यावर सुस्थितीत असलेलं मंदिर आहे. त्यात वा रामाच्या मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते. आशेवाडीकडला बुधला व त्याजवळच ध्वजस्तंभ ही गडफेरीत करण्याची इतर ठिकाणं. रामसेजवरून समोर प्रशस्त भोरगड दिसतो. संरक्षण यंत्रणांची रडार सिस्टिम असल्याने भोरगडावर मात्र आपल्याला प्रवेश नाही. दिसायला छोटा असणाऱ्या रामसेजवर मोठा इतिहास घडलेला आहे. मुघलांविरुद्ध तब्बल पाच वर्षं या किल्ल्याने टिकाव धरला होता. एकेक किल्ला असा पाच वर्षं लढवण्याच्या क्षमतेतच स्वराज्याचं सामर्थ्य दडलं होतं. रामसेजवरून पुन्हा नासिककडे येताना म्हसरूळनजीक जैन चांभारलेणी आहेत. वेळ असल्यास ती जरूर पाहून घ्यावीत. म्हसरूळकडून एक रस्ता थेट वाघेऱ्यापर्यंत जातो. वाघेरा घाटमाथ्यावरचं गाव आहे. गावाच्या समोरच एक मोठा बंधारा व जलाशय आहे. जलाशयाच्या पाठी उभा आहे उंच वाघेरा. वाघेऱ्याचे कडे थेट घाटाखाली उतरलेले आहेत. धरणाच्या पाण्यावर व सुपीक जमिनीवर शेती करणाऱ्या गावकऱ्यांना वाघेरा किल्ल्याचा रस्ता विचारायचा. वाघेरा जलाशयाचा बांध उजवीकडे जिथे वाघेऱ्याच्या सोंडेला चिकटलेला वाटतो, त्या डोंगरधारेवरून गडावर चढाई करायची. घाटाखाली उतरलेल्या गडाच्या उंचच उंच कातळभिंती उजवीकडे ठेवत गडाची माची गाठायची. पाठीवर सामान नसल्यास माची गाठायला एक तास पुरे. माचीवरून वाघेऱ्याचा उंच सुळकेवजा उंचवटा, गडमाथा दिसतो. दहा-एक मिनिटांच्या सोंडेवरील सपाट चालीनंतर गडाच्या सुळकेवजा गडमाथ्याला भिडायचं. इथे पाण्याची कोरडी टाकी आहेत. इथून गडमाथा गाठायला दोन वाटा आहेत. गडमाथा डावीकडे ठेवत वळसा घालून चढणारी निसरडी वाट अथवा सोपं 10 फुटांचं प्रस्तरारोहण करून सरळ वर चढणारी कातळाची वाट. कोणत्याही वाटेने गडाचा सुळकेवजा माथा गाठायचा. तिथे उघड्यावर शिवलिंग आहे. फडकणाऱ्या भगव्या झेंड्याबरोबर गड सर झाल्याबद्दल ग्रुप फोटो काढायचा. अंजनेरी, ब्रह्मगिरी आणि आजुबाजूच्या परिसरावर नजर फिरवायची आणि परतीला लागायचं. वाघेरा गावातून गडमाथा गाठायला आणि स्थलदर्शनासाठी दोन तास पुरे. गडावर पाणी नसल्याने वा सावलीसाठी झाड नसल्याने सोबत आणलेलं पाणी प्यायचं आणि आल्या वाटेने गड उतरायचा. वाघेऱ्यातून घाट उतरून हरसूल गाठायचं. हरसूवरून ओझरखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाणापाडा आहे. ठाणापाड्याला आश्रमशाळेसमोरून खैराई किल्ल्यावर चढाई करायची. निघताना टॉर्च घ्यायला मात्र विसरायचं नाही. खैराई किल्ला फारसा प्रसिद्ध नसलेला, दुर्लक्षित. ट्रेकिंगसंबंधीच्या पुस्तकात त्याचा उल्लेख नाही. नासिकचे हेमंत पोखरणकर यांनी त्याबद्दल माहिती पुरवली म्हणून आम्ही हा किल्ला करू शकलो. आश्रमशाळेसमोरून खैराई माचीवरचा माचीपाडा गाठायला पाऊण तास पुरे. माचीपाड्यातल्या गावकऱ्यांचं आतिथ्य स्वीकारून गड चढायला लागायचं. माचीवर पोहोचल्यावर डौलदार, बहरलेलं शेत आपलं स्वागत करतं. संध्याकाळी ते पिवळं शेत सोनेरी दिसू लागतं. माचीच्या टोकाला गडाजवळ दुतर्फा घरं आहेत. लुसलुशीत कोकरांबरोबर फोटो काढून झाले की गड चढायचा. गडाला बऱ्यापैकी तटबंदी आहे. माचीपाड्याकडला बुरुज नाक्‍यासमोर ठेवून चढत राहायचा. अर्ध्या तासाने आपण एका टेपावर येऊन पोहोचतो. इथून बुरुजाकडे तुटलेल्या तटावरून गडावर प्रवेश करता येतो. अथवा बुरूज व गडमाथा उजव्या अंगाला ठेवून गडमाथ्याला वळसा घालून गडाच्या पश्‍चिमेकडून गडावर सोप्या वाटेने प्रवेश करायचा. खैराईचा गडमाथा छोटेखानीच आहे. पण मनाला प्रसन्न वाटतं. गडावर पाण्याची टाकी आहेत. त्यातलं पाणी पावसाळ्यात पिण्यास हरकत नाही. गडाच्या तटावरून गड-प्रदक्षिणा करता येते. गडावर उघड्या मंदिराकडे दोन लहान तोफा पडलेल्या आहेत. मावळतीच्या रंगात गड फारच सुंदर भासतो. मावळणाऱ्या सूर्याला दंडवत घालून अंधार पडण्यापूर्वी माचीपाडा गाठायचा. माचीपाड्यावरून सोप्या वाटेने आल्याप्रमाणे ठाणापाडा गाठायचं. स्वतःची गाडी सोबत असेल व चालणारे भिडू असतील तर एका दिवसात हे तिन्ही किल्ले पाहून मुक्कामाला त्र्यंबकेश्‍वर वा अंजनेरी गाठता येतं. वाघेरा घाटाच्या खालचा खैराई तांत्रिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यात असला तरी भौगोलिकदृष्ट्या तो ठाणे जिल्ह्यात वाटतो. नाशिक त्र्यंबकेश्‍वरच्या आसपासच्या या किल्ल्यांची सफर आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते.
- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट
yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

सहा दिवसांत सह्याद्री सर!

सहा दिवसांत सह्याद्री सर!

सह्याद्री म्हटलं की आपल्याला आठवतात घाट आणि खंडाळा-लोणावळा म्हटलं की आठवतात पावसाळी सहली। पण यापलीकडे सह्याद्री आणि खंडाळा-लोणावळा आहेतच की! मुळात खंडाळा-लोणावळा आहेत ते सह्याद्रीच्या कुशीतच... तिथलेच हे सहा दिवस...

पहिला दिवस लोणावळ्याजवळचं कार्ला गाव. एकवीरा आईचा डोंगर व त्यापाठी कोरलेली हिनयान पंथाची सर्वोत्कृष्ट लेणी. लेण्यासमोर सोळा कोनांचा स्तंभ उभा आहे. लेण्यातली हत्तीची शिल्पं नजर लागण्याइतकी जिवंत आहेत. लेण्यामधील चैत्यावर दोन हजार वर्षांपूर्वीची लाकडी छात्रावली आहे. एकवीराला बेसकॅम्प असणार आहे. रिपोर्टिंगनंतर नवीन वातावरण रुळण्यासाठी ट्रेकर्स कार्ला लेणी, एकवीरा मंदिर व कार्ला टॉप, जेथून शिरोटा लेकचं सुंदर दर्शन होतं, तिथवर एक छोटा ट्रेक करतील.
दुसरा दिवस कार्ल्यापासून पाच किमी अंतरावर भाजे लेणी आहेत. इस पूर्व 250 मधली ही लेणी महाराष्ट्रातली आद्य लेणी आहेत. ऐरावतावरील इंद्र व चार घोड्यांच्या रथावरील सूर्य यांच्या प्रतिमा लेण्यात कोरल्या आहेत. भाजे लेणी पाहून आपण जाणार आहोत ते विसापूर किल्ल्यावर. प्रचंड विस्तार असणारा हा किल्ला आहे. लांबलचक तटबंदी व तटावर जागोजागी कोरलेले संरक्षक मारुती हे या गडाचं वैशिष्ट्य. गडावर जमिनीवर बांधलेला गोलाकार बुरुज आहे. विसापूर उतरून आपण लोहगडवाडीत येणार. तेथून पायऱ्यांच्या वाटेने गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा व शेवटी महादरवाजा असं करत आपण गडावर येऊन पोहोचू. लोहगडाचं मुख्य आकर्षण आहे ते विंचूकाटा. दुहेरी तटबंदी असणारी ही माची. दोन्ही बाजूस गर्द झाडी असणारी. गडावरील लोमेश ऋषीच्या गुहेत आपण मुक्काम करणार आहोत.
तिसरा दिवस आज आपण लोहगड उतरायचा. पवना धरण पाहून लोणावळ्यात यायचं. तेथून पुढे खंडाळ्याची वाघदरी पाहायची आणि कुणे गावात यायचं. कुणे गाव दरीच्या तोंडावर वसलं आहे. तेथून खंडाळा घाट आपल्याला सतत खुणावत राहतो. आजचा मुक्काम कुणे गावात खंडाळ्याच्या कुशीत.
चौथा दिवस कुणे गावातून पाच तासांचा ट्रेक करून आपण पोहोचतो राजमाचीला. राजमाचीला दोन बालेकिल्ले आहेत. पूर्वेकडला श्रीवर्धन, तर पश्‍चिमेकडला मनरंजन. ते आपण उद्या पाहणार आहोत. आज आराम करायचा. संध्याकाळी राजमाचीच्या तळ्यावरील मंदिराकडून सूर्यास्त पाहायचा. हे मंदिर अलीकडेच गावकऱ्यांनी उत्खनन करून शोधून काढलं आहे. आजचा मुक्काम राजमाचीकरांच्या घरात.
पाचवा दिवस श्रीवर्धन व मनरंजन आणि त्यामधोमध आहे बहिरोबाचं मंदिर. उठेवाडीतून सोप्या वाटेने मनरंजनवर चढायचं. इथे पाण्याची टाकी, जोत्यांचे अवशेष दिसतात. इथून कर्नाळा, प्रबळगड, इर्शाल, ठाक हे किल्ले दिसतात. मनरंजन पाहून बहिरोबाच्या मंदिराकडून श्रीवर्धन चढायचा. याची उंची मनरंजनपेक्षा जास्त आहे. शाबूत असणारी तटबंदी. टोकांकडले दुहेरी तट असणारे चिलखती बुरुज व पाण्याची असंख्य टाकी. राजमाची पाहून झाला की संध्याकाळी पुन्हा तलावाकडे यायचं ते ट्रेझर हंटसाठी. आजचा मुक्काम राजमाचीवरच.
सहावा दिवस आज सकाळीच राजमाची उतरायला लागायचं ते उल्हास व्हॅलीच्या बाजूला. खाली दिसणारी उल्हास, नदीसमोर दुसऱ्या अंगाला खंडाळा घाटातलं ठाकूरवाडी स्टेशन. तीन तासांत आपण पोहचतो ते कोंडाणा लेण्यांकडे. आठ चैत्यविहार असणारी कोंडाणे लेणी इतकी सुबक आहेत की लाकडात कोरीव काम केल्याप्रमाणे भासतात. पिंपळपानाच्या आकाराची लेण्याची कमान खूपच सुंदर आहे. लेण्यांकडून तासाभरात कोंदीवडे गावात पोहचायचं. तिथे आपला पदभ्रमणाचा कार्यक्रम संपतो. तिथून रिक्षाने कर्जत स्टेशन गाठायचं
मधुकर धुरी, YHAI मालाड युनिट
yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

महाराष्ट्रातील आद्य लेणी

महाराष्ट्रातील आद्य लेणी

लोणावळ्याच्या पुढच्या स्टेशनावर, मळवलीला उतरलात, तर एक वेगळाच ट्रेक अनुभवायला मिळतो... हा आहे लोहगड-विसापूर-कार्ले-भाजे ट्रेक... मळवलीच्या एका अंगाला आहेत कार्ल्याची लेणी, तर दुसऱ्या अंगाला भाज्याची लेणी आणि लोहगड-विसापूरची जोडगोळी...

मुंबईहून पुण्याला आपण अनेक वेळा जातो. लोणावळा हे तर पावसाळ्यातलं आपलं आवडतं ठिकाण असतं. पण लोणावळ्याच्या पुढच्या स्टेशनावर, मळवलीला उतरलात, तर एक वेगळाच ट्रेक अनुभवायला मिळतो... हा आहे लोहगड-विसापूर-कार्ले-भाजे ट्रेक... मळवलीच्या एका अंगाला आहेत कार्ल्याची लेणी, तर दुसऱ्या अंगाला भाज्याची लेणी आणि लोहगड-विसापूरची जोडगोळी. हिनयान पंथाची सर्वोत्कृष्ट लेणी म्हणून कार्ल्याच्या लेण्यांचा उल्लेख करावा लागेल. या लेण्यांमध्ये मुळात चैत्यगृहाच्या समोर दोन सोळा कोनांचे स्तंभ होते. त्यापैकी एक स्तंभ संपूर्ण तुटला आहे, नाहीसा झाला आहे. हे दोन्ही स्तंभ सारखे होते. जो एक स्तंभ आता तिथे शिल्लक आहे, त्या स्तंभाच्या वर चार सिंहांचं शिल्प आहे. लेण्यांमध्ये जिवंत वाटतील अशी हत्तींची पूर्णाकृती शिल्पं आहेत. अनेक दानशूर, युगुलांची शिल्पं लेण्यात कोरली आहेत. चैत्यावर दोन हजार वर्षांपूर्वीची लाकडाची छत्रावली आहे. लेण्यात प्रवेश करण्यापूर्वी प्रसिद्ध एकवीरा देवीचं मंदिर आहे. नवस करण्यासाठी व फेडण्यासाठी आगरी-कोळ्यांची व भक्तांची तिथे सतत रीघ लागलेली असते. कार्ले लेण्याच्या समोर विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी भाज्याची लेणी आहेत. ही लेणीसुद्धा हिनयान पंथी आहेत. महाराष्ट्रातली आद्य लेणी म्हणून भाज्याच्या लेण्यांचा गौरव होतो. इसवीसनापूर्वी 240मध्ये ही लेणी खोदली असावीत. चैत्यगृहाचे कलते खांब व लाकडी फासळ्या येथे पहावयास मिळतात. ऐरावतावरील इंद्र व चार घोड्यांच्या रथावरील सूर्य यांच्या प्रतिमा लेण्यात कोरल्या आहेत. लेण्याजवळ व लेण्याला जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात अनेक धबधबे असतात. पुणेरी पर्यटक या धबधब्यांवर गर्दी करतात. भाजे गावातून गाय खिंडीपर्यंत चढावाची बैलगाडीची वाट आहे. गायखिंडीतून उजवीकडे लोहगड, तर डावीकडे विसापूर किल्ल्यावर जाता येतं. डावीकडच्या वाटेने पंधरा मिनिटं चाललं की सरळ जाणारी मोठी वाट सोडून द्यायची. सरळ वाट बोडसे लेण्याकडे जाते. वरती डावीकडे विसापूरची तटबंदी दिसत असते. वाहणाऱ्या पाण्यातून पुढे सरकणारी घसरड्या दगडांची ही वाट वर चढते. चढायला साधारण अर्धा तास पुरे... विसापूरच्या माथ्यावर प्रचंड, विस्तीर्ण पठार आहे. लांबच लांब सरळ गेलेली तटबंदी, जागोजागी तटावर कोरलेले संरक्षक मारुती हे या गडाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. गडावर एक गोलाकार बुरुज आहे. त्यावर पूर्वी तोफ असावी. वर उल्लेख केलेल्या वाटेव्यतिरिक्त मळवलीकडून दोन वाटा गडावर चढून येतात. आल्या वाटेने विसापूर उतरून लोहगड वाडीत यायचं. लोहगडपर्यंत अलीकडे डांबरी सडक आली आहे. लोहगडवाडीतून पायऱ्यांच्या वाटेने लोहगड चढू लागलो की गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि शेवटी महादरवाजा असे आखीव-रेखीव दरवाजे आपल्याला लागतात. गडाचं मुख्य आकर्षण त्याचा विंचुकाटा आहे. दुहेरी तटबंदी असलेली ही माची उतरत जाते. माचीच्या टोकाकडल्या बुरुजाकडून विहंगम दृश्‍य दिसतं. माचीच्या तटावरून चालताना खालची दाट झाडी आपली साथ करते. सुरतेच्या पहिल्या लुटेच्या वेळी आणलेला खजिना लोहगडावरील लक्ष्मी कोठीत आला होता. इथल्या लोमेश ऋषींच्या गुहेत मुक्काम करण्याची मजा काही औरच आहे. कोकणावर विजय मिळवू इच्छिणाऱ्या मुघलांच्या सैन्याला, कारतलबखानाला लोहगडापाशी उंबरखिंडीत गाठून महाराजांनी खानाचा सपशेल पराभव केला होता. मळवलीहून लोहगडाच्या बाजूने मोठ्या मिजाशीने खानाचं सैन्य गेलं होतं कोकण जिंकायला. चारीमुंड्या चीत होऊन नामुष्कीचा पराभव कारतलबखानाच्या नशिबी आला. या पराक्रमाची गाथा कल्पनेत अनुभवण्यासाठी हा ट्रेक करायला हवा.
- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल, मालाड युनिट
yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

नाच रे मोरा...!!

नाच रे मोरा...!!
"नाचरे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच!' लहानपणापासून कित्येक वेळा आपण हे गाणं ऐकलेलं असतं। मग कधीमधी राणीच्या बागेत आपण त्याला प्रत्यक्ष पाहिलेलं असतं. तेव्हापासून मोर आपल्या मनामध्ये घर करून बसलेला असतो. पूर्वी गावागावांत माळरानावर हमखास दिसणारा मोर अलीकडे मात्र सहज दिसेनासा झाला. गावाकडे मोराला हमखास बघायचं असेल, तर तुम्हाला यावं लागेल ते पुणे जिल्ह्यातल्या मोराच्या चिंचोलीला. पुण्याच्या ईशान्येला 50 कि.मी. अंतरावर एक अनोखं गाव वसलंय, ज्याचं नाव आहे मोराची चिंचोली. पुणे-नाशिक रस्त्याच्या राजगुरुनगर वा पुणे-नगर रस्त्यावरच्या शिक्रापूर इथून मोराच्या चिंचोलीला जाता येतं. मोराचं संरक्षण व संवर्धन करण्याचं काम या परिसरातल्या गावकऱ्यांनी मनापासून केलं. त्यामुळे या परिसरात मोरांची संख्या एवढी वाढली, की एका माणसामागे एक मोर, अशी परिस्थिती झाली. शेकडोने मोर पाहायला मिळत असल्याने पर्यटनाच्या नकाशावर मोराची चिंचोली प्रसिद्ध पावते आहे. चिंचोलीमध्ये चिंचेची भरपूर झाडं आहेत. सकाळी जरा उजाडलं, काळोख सरून दिसायला लागलं, की झाडांच्या शेंड्यावरून मोर खाली उतरतात. सकाळी सहा ते आठ हा मोर बघायला सर्वोत्तम काळ. शिवारात जिथे नजर टाकाल तिथे मोर आणि लांडोर दिसतात. पर्यटकांच्या सोयीसाठी "जय मल्हार कृषी विकास प्रतिष्ठान' यांनी विशेष सोय केली आहे. एका मोठ्या चौथऱ्यावर मोरांसाठी दाणे टाकलेले असतात. तिथे एकाच जागेवर अनेक मोर आपल्याला पाहायला मिळतात. शिवारात सर्वत्र मोर फिरत असतात; मात्र त्यांच्या फार जवळ जाता कामा नये, नाहीतर ते पळून जातात. साधारण 40 ते 50 फुटांवरून तुम्ही त्यांचं निरीक्षण करू शकता. एवढ्या अंतरावरून फोटो काढण्यासाठीचा कॅमेरा तुमच्याकडे हवा. उन्हं वर चढू लागली, की मोर पुन्हा दिसेनासे होतात. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी मोराच्या चिंचोलीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये ग्रामीण जीवनाचा अनुभव शहरी पर्यटकांना घेता यावा यादृष्टीने विविध देखावे आणि वस्तू मांडल्या आहेत. चिंचोलीच्या ओढ्याकाठच्या उद्यानात झोपाळ्यावर तुम्ही उंचच उंच झोके घेऊ शकता. बमी ब्रीजवर चालू शकता, बैलगाडीतून रपेट मारू शकता. पुन्हा संध्याकाळी चिंचोलीतल्या तळ्यावर मोरांच्या पाठी हिंडू शकता. मोराच्या चिंचोलीहून परत आल्यावर मात्र इतर चार लोकांना त्याबाबत सांगा, त्यामुळे इथल्या पर्यटनाला चालना मिळेल. मोराच्या चिंचोलीइतकंच अनोखं अजून एक अप्रूप इथून जवळच आहे. कुकडी नदीच्या पात्रातील रांजणकुंड. कुकडी नदी ही पुणे व नगर जिल्ह्याची सीमा आहे. नगर जिल्ह्यांत निघोज व पुणे जिल्ह्यातलं टाकळीहाजी या नदीच्या तीरावरील गावांदरम्यान नदी पात्रात अनेक रांजणकुंडं निर्माण झाली आहेत. नदीच्या पाण्याबरोबर गोल गोल फिरून छोटे छोटे दगड मोठ-मोठ्या रांजणाच्या आकाराचे खळगे तयार करतात. त्यात पाणी घुसळून घुसळून त्याचा आकार मोठा होत जातो. मग दोन बाजूबाजूचे रांजण खड्डे एकमेकांना छेदतात व मोठा रांजण तयार होतो. त्यातून वाहणारं निळंशार पाणी व किनाऱ्यावरील मंदिर आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातं. मुद्दाम पाहावं असं हे ठिकाण आहे. मोराची चिंचोली व रांजणकुंडं बघून झाली, की रांजणगावचा गणपती जवळच आहे. गणरायाचं दर्शन करायचं आणि सरत्या दिवसाच्या स्मृती जागवत आपापल्या गावी प्रस्थान करायचं.
- मधुकर धुरी युथ हॉस्टेल मालाड yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

मालवण

मालवण
माझा जन्म कुडाळचा. त्यामुळे कोकणाबद्दल, त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल मला विशेष प्रेम. युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या गोवा राज्य शाखेने आयोजित केलेल्या फॅमिली कॅम्पिंगसाठी चार दिवस गोव्यात होतो. येताना चार दिवस मालवणला मुक्काम केला. मालवणात राहून पाहता येतील अशा ठिकाणांची ही तुमच्यासाठी ओळख...
मालवणची भौगोलिक रचना खास आहे. पश्‍चिमेला अथांग अरबी समुद्र. पूर्वेला कासारटाक्‍याची घाटी. उत्तरेला गड नदीची खाडी, तर दक्षिणेला कर्ली नदीची खाडी. या दोन्ही नद्या समुद्राला मिळण्याआधी समुद्राला समांतर वाहतात. त्यातून जमिनीची एक चिंचोळी पट्टी तयार झाली आहे. शंभरएक मीटर रुंदीची. या चिंचोळ्या पट्टीच्या पश्‍चिमेला आहे समुद्रकिनारा, तर पूर्वेला नदी किनारा. एका बाजूला समुद्राची गाज, तर दुसऱ्या बाजूला माडांच्या बनातून वाहणारी शांत नदी. कर्ली नदीच्या चिंचोळ्या पट्टीत तारकर्ली वसलंय. नदीच्या मुखाजवळ आहे देवबाग, तर समोरच्या किनाऱ्यावर आहे भोगवे. गडनदीच्या पट्टीतलं गाव तोंडवळी, मुखाजवळ आहे तळाशील आणि दुसऱ्या किनाऱ्यावर वसलंय रेवंडी. मालवणच्या दक्षिणेला सात किलोमीटरवर आहे तारकर्ली. लांबच लांब विस्तीर्ण समुद्रकिनारा तारकर्लीला लाभलेला आहे. एमआयडीसीने तारकर्लीला प्रसिद्धी मिळवून देण्यात विशेष हातभार लावलाय. तारकर्लीपासून पाच किलोमीटर दक्षिणेला असणाऱ्या देवबागपर्यंत कर्ली नदी समुद्राला भेटायला वाहत येते. तारकर्ली ते देवबाग गाडीरस्ता उपलब्ध आहे. देवबागला बोटीत बसायचं आणि कर्ली नदी समुद्राला मिळते त्याच्या दुसऱ्या किनाऱ्यावर असणाऱ्या भोगवे बीचवर उतरायचं. देवबाग भोगवे सफरीदरम्यान शेकडो सीगल पक्षी तुम्हाला पाहायला मिळतात. भोगवे किनारा पाहून झाला, की पुन्हा बोटीत बसायचं, निघायचं निवतीकडे. समुद्रकिनारी टेकडीवर निवतीचा किल्ला आहे बीचला लागूनच. निवती, भोगवे दोन्ही समुद्रकिनारे अतिशय रमणीय व सुंदर आहेत. देवबागहून बोटीने या किनाऱ्यांना भेट देण्यात विशेष मजा आहे. या बोट सफरीचं अजून एक आकर्षण आहे, ते म्हणजे डॉल्फिन. निवतीजवळच्या समुद्रात डॉल्फिन हमखास बघायला मिळतात आणि देवबागचे बोटवाले तुम्हाला डॉल्फिन दाखविल्याशिवाय हार मानत नाहीत. मात्र तुम्ही नेमकी वेळ गाठायला हवी आणि थोडीफार नशिबाने साथ द्यायला हवी. तीन-चार तासांच्या या सफरीचं 10 जणांचं मिळून 800 रु. भाडं आहे. तुमचे स्वतःचे 10 जण नसतील, तर मात्र दरडोई अधिक खर्च सोसायची तयारी हवी. देवबाग, तारकर्ली करीत कर्ली नदीतून लक्ष्मीनारायणाचं सुप्रसिद्ध मंदिर असणाऱ्या वालावलपर्यंत जर तुम्हाला बोटिंग करण्याची संधी मिळाली, तर मात्र सोन्याहून पिवळं; पण त्यासाठी योग्य ती किंमत मोजायची तयारी हवी. देवबागची नदी व समुद्रकिनारा दृष्ट लागण्याइतका स्वच्छ व नितळ पाण्याचा आहे. देवबाग कर्ली नदीइतकाच सुंदर किनारा आहे तळाशील गड नदीचा. गड नदी समुद्राला भेटायला येते ती तोंडवलीपासून. तळाशीलपर्यंत समुद्राला समांतर वाहते. मालवण, हडी, तोंडवली, तळाशील असा गाडीरस्ता उपलब्ध आहे. नदीच्या एका बाजूला तोंडवली, तळाशील, तर दुसऱ्या बाजूला ओझर, रेवंडी, कोळंब आहे. ओझरची ब्रह्मानंद स्वामींची असणारी गुहा व पाण्याचा झरा बघण्यासारखा आहे. ओझरजवळ आहे रेवंडी. मालवणचा सुपुत्र "वस्त्रहरण'कार मच्छिंद्र कांबळींचं गाव. गावात भद्रकालीचं मंदिर आहे. रेवंडीतल्या तरीवरून तळाशीलला बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तळाशीलची मच्छिमारांची वस्ती संपली, की बांद्याच्या पुढे ओसाड बेट आहे. त्यावरून गड नदीच्या मुखाचं सुंदर दर्शन होतं. रेवंडीतूनसुद्धा गड नदी समुद्राला मिळते ती जागा बघण्यासारखी आहे. तोंडवळीचा सुरूचा किनारा, तळाशीलचा माडांच्या चिंचोळ्या पट्टीचा किनारा खास बघण्यासारखा. खुद्द मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्याबरोबरच बघण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. तिथला मासळीबाजार, अनेक मंदिरं, रॉक गार्डन, चिवळा आणि त्याला लागून असलेला कोळंबचा समुद्रकिनारा अशा ठिकाणी सहज जाता येतं. महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेलं मालवण गाव. इथे येऊन सिंधुदुर्ग किल्ला न पाहिला तर काय पाहिलं? मालवणच्या जेटीवरून किल्ल्यात जायला बोटी उपलब्ध आहेत. राजाराम महाराजांनी स्थापन केलेलं महाराजांचं मंदिर, फांदी असणारं माडाचं झाड, दुधबाव, दहीबाव, महाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा, राणीची वेळा इत्यादी पाहताना वेळ कसा पटकन निघून जातो. मालवणला रेल्वे स्टेशन नाही. रेल्वे पकडण्यासाठी कुडाळला जावं लागतं. मालवणहून कुडाळला जाताना रस्त्यात धामापूर लागतं. धामापूरचा तलाव मन प्रसन्न करणारा आहे. तलावात बोटिंगची सोय आहे. झाडीभरला हा तलाव नुसत्या दर्शनानेच तुम्हाला ताजतवानं करतो. आठवडाभराची सुट्टी असेल, तर मालवणनंतरचा मुक्काम करायचा सावंतवाडी अथवा वेंगुर्ल्याला. त्याशिवाय देवगड अथवा कणकवली असासुद्धा पर्याय आहे. आठवड्याची सुट्टी नसली, तर कोकण रेल्वे आहेच तुम्हाला झटपट मालवणला पोहोचायला. मगे येतालास ना? येवा, कोकण आपलाच आसा!
- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल, मालाड युनिट. yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

"राना'तली "सई'

"राना'तली "सई'
मुंबईच्या जवळ असणाऱ्या उरणला पाणी कोठून येतं ठाऊक आहे? उत्तर आहे रानसई. पण पोहोचायचे कसे तिथे...? मुंबई-पनवेल मार्गे सकाळीच कर्नाळ्याच्या अभयारण्यात यायचं. इथल्या फॉरेस्ट चौकीवर प्रवेश फी भरून रानसईला जाणारी वाट विचारून घ्यायची आणि पुढे चालायचं. अभयारण्याच्या बसस्टॉपवर कर्नाळा किल्ल्याच्या विरुद्ध दिशेला रस्ता ओलांडायचा. तिथल्या वननिवासाजवळच्या विहिरीशेजारून एक वाट जाताना दिसते. पाचेक मिनिटांत ओढा पार करून ही वाट पठारावर चढू लागते. पठारावर पोहोचल्यावर गोवा हायवेला समांतर चालत राहायचं. अर्ध्या तासाने उजवीकडे रानसई गावाकडे जाणारी वाट पकडायची. कर्नाळ्याहून दोनेक तासात आपण रानसई गावात पोहोचतो. गावातल्या घरात जेवण बनवून देण्याची विनंती करायची आणि निघायचं धरणाकडे. या छोटेखानी धरणाच्या दोन्ही तिन्ही काठांवर पडवळाची व्यापारी पद्धतीने शेती केलेली आढळते. बघावं तिकडे नुसते पडवळाचे मळेच मळे. वाकडे वाटणारे पडवळ सुतळीने दगड बांधून सरळ करायला ठेवलेले दिसतात. शेतकरी होड्या भरून भरून पडवळ धरणाच्या भिंतीकडे घेऊन जात असतात. तिथून ते मुंबई, पनवेलच्या बाजारात जातात. तलावाच्या काठाशी पोहोचल्यावर पोहणे, गळ टाकून तासन तास मासे पकडणे असे उद्योग आपण करू शकतो. दोनेक तासांनी परत जेवण सांगितलेल्या घरात जायचं. सपाटून भूक लागलेली असते. चमचमीत जेवणावर आडवा हात मारायचा. डबे आणले असतील तर संपवून टाकायचे. हलक्‍याशा वामकुक्षीनंतर परतीच्या प्रवासाला निघायचं. कर्नाळा स्टॉपच्या पुढे गोवा हायवेवर कल्हे नावाचं गाव आहे. या कल्ह्यातून रानसईपर्यंत चांगली वाट आहे. थोडासा चढ उतार आणि बहुतांशी पठारावरून जाणारी ही वाट दमछाक करणारी अजिबात नाही. कर्नाळा अभयारण्याची शांतता. एकाकी अनपेक्षित रानसई धरण. चोहोबाजूचे पडवळाचे मळे. रानसई धरणाच्या बॅकड्रॉपवर दिसणारा कर्नाळ्याचा सुळका. कल्ल्याच्या पठारावरची वाट. वन डे आऊटिंगसाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे रानसई. कल्हे रानसई वाटेवरून आम्ही बाइक घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. पाऊण रस्ता आम्ही गेलो सुद्धा. पण ते एक दिव्य आहे आणि ते करण्यास मी तुम्हाला सांगणार नाही. पनवेल-उरण रस्त्यावरच्या जासईकडून चिरनेर दिघोडे आणि तिथून रानसई असा प्रवाससुद्धा करता येतो. तर अशी ही रानातली सई, जरूर भेट द्यावी अशी...
- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट।
(साभार ः सकाळ)

गंगाद्वारावरचा "ब्रह्मगिरी'

गंगाद्वारावरचा "ब्रह्मगिरी'
अंजनेरी, ब्रह्मगिरी पर्वतरांग दोन मोठ्या नद्यांना जन्म देते... वैतरणा आणि गोदावरी. कोकणात वाहत जाणारी वैतरणा नळाद्वारे मुंबईतल्या घराघरापर्यंत पोचते. पवित्र गोदावरी तर दक्षिणेतील फार प्रसिद्ध नदी. नाशिक, पैठण, नांदेड यांसारखी अनेक पुण्यक्षेत्रं तिच्या काठावर वसली आहेत. पहाटे लवकर त्र्यंबकेश्‍वरला यायचं. त्र्यंबकेश्‍वरला यायला नाशिक आणि जव्हारकडून उत्तम रस्ता आहे. कुंभमेळा लागणाऱ्या त्र्यंबकेश्‍वराच्या पवित्र कुशावर्त तीर्थात स्नान करायचं. ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्‍वर महादेवाचं दर्शन करायचं आणि गावापाठी उभ्या असणाऱ्या ब्रह्मगिरीकडे कूच करायची. त्र्यबंकेश्‍वराहून ब्रह्मगिरीकडे जायला प्रशस्त वाट आहे. रस्त्यात मध्येमध्ये लिंबू सरबतवाल्यांची दुकानं आहेत. ब्रह्मगिरीचा शेवटचा कातळ चढण्यासाठी रेलिंग लावलेल्या पायऱ्या आहेत. चढताना माकडांना खायला न दिलेलंच बरं, नाही तर माकडं तुम्हाला चढताना अक्षरशः खिंडीत गाठतात. तुमची झडती घेऊन खाण्याच्या वस्तू लंपास करतात. एखादी काठी सोबत ठेवलेली बरी. ब्रह्मगिरीवरून त्र्यंबकेश्‍वराचं सुरेख दर्शन होतं. ब्रह्मगिरीच्या माथ्यावर एका टोकाला आहे गोवातीर्थ. तिथे गोदामाईची मूर्ती असणारं मंदिर आहे. मंदिराच्या समोर एका कुंडामध्ये गोमुखातून पाणी पडत असतं. हे मंदिर म्हणजे गोदावरी नदीचा मूळ उगम आहे, असा समज आहे. माथ्याच्या वरच्या दुसऱ्या टोकाला आहे शंकराचं मंदिर. शंकराने गुडघे टेकवून इथे जरा आपटले होते म्हणे. गुडघ्याचे दोन खड्डे व जरा आपटल्याच्या दगडावरील खुणा पाहण्यासारख्या आहेत. 4200 फुटांहून अधिक उंच असणाऱ्या या गडावरून हरिहर, बसगड, वाघेरा, अंजनेरी सहज दिसून येतात. याशिवाय ठळकपणे नजरेत भरतो तो अप्पर वैतरणा तलाव. आल्या वाटेने त्र्यंबकेश्‍वरकडे उतरताना डावीकडे गंगाद्वार आहे, ते जरूर पाहण्यासारखं. श्रावणातल्या सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालणाऱ्या भक्तांची रीघ लागलेली असते. संत ज्ञानेश्‍वरांचे गुरू व बंधू निवृत्तीनाथांनी त्र्यबंकेश्‍वरलाच समाधी घेतली. ब्रह्मगिरीच्या जवळच असणारा अंजनीपुत्र हनुमानाचा जन्म झालेला अंजनेरी, अप्पर वैतरणा काठचा श्रीघाट तसेच नाशिकची पांडव लेणी इथून जवळच आहेत व मुद्दाम पाहण्यासारखी ही स्थळं आहेत. अंजनेरी, ब्रह्मगिरी, हरिहर, बसगड असा ट्रेकसुद्धा करण्यासारखा आहे.
मधुकर धुरी
युथ हॉस्टेल, मालाड
yhai-malad@redeffmail.com
(साभार ः सकाळ)