दिल्ली

दिल्ली शहराला स्वत:चा असा मोठा इतिहास आहे. पूर्वी त्याच्या तख्तावर बसून राज्य करणं हा राजघराण्यांचा बहुमान समजला जाई. आज त्याला आपल्या देशाच्या राजधानीचा दर्जा प्रदान करण्यात आला. जगभरातल्या पर्यटकांचं ते प्रमुख आकर्षणस्थळ ठरतं.दिल्ली शहराला राजकीय, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटनांचं प्रतीक मानलं जातं. तिथं मुघल, राजपूत आणि अफगाणी साम्राज्याच्या खुणा जागोजागी पाहायला मिळतात. लाल किल्ला, जामा मशीद, हुमायूनची कबर, कुतुबमिनार आणि जंतरमंतर ही तिथली मुख्य ठिकाणं. इतर प्रेक्षणीय स्थळांमध्ये पुरातत्त्व विभाग आणि हवाई दलाचं वस्तुसंग्रहालय, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि बिर्ला मंदिर, अक्षरधाम मंदिर, बांगला साहिब गुरुद्वार ही ठिकाणे बघता येतील. त्याशिवाय राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटही पर्यटकांची आकर्षणस्थळं ठरतात. दिल्ली राजधानीचं ठिकाण असल्यामुळे ते देश तसेच जगभरातल्या सगळ्याच प्रमुख शहरांशी जोडण्यात आलं आहे. दिल्ली विमानतळावरून सतत मोठ्या प्रमाणावर फ्लाईट्‌स सुटतात. रेल्वेने जायचं असल्यास राजधानी एक्‍स्प्रेसच्या राजेशाही प्रवासाचा अनुभव घ्यायला हवा. पर्यटकांच्या वास्तव्यासाठी बजेट हॉटेलपासून ते डिलक्‍स हॉटेलपर्यंत निरनिराळ्या स्वरूपातील पर्याय उपलब्ध आहेत. पुढील प्रवासाकरिता मुक्कामासाठी (ट्रान्झिस्ट हॉल्ट) रेल भवन आणि महाराष्ट्रीय लोकांसाठी बृहन्महाराष्ट्र भवन उपलब्ध होतं. या शहराची व्यापारपरंपरा मोठी असून दागदागिने आणि मौल्यवान खडे, कार्पेट, सिल्क आणि सिल्व्हर वेअर प्रसिद्ध आहे. कनॉट प्लेस, चांदनी चौक आणि करोल बाग या मुख्य बाजारपेठा. पण तिथं जाऊन खरेदी करण्यापूर्वी घासाघीस करण्याची कला मात्र शिकून घ्यावी.

No comments: