महर्षी कर्वे यांचे मुरूड

मुरूड समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनस्थळांचा विचार करताना अगदी अलिबागपासून गोव्यापर्यंत मन भरारी मारून येतं. यातच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीपासन नऊ किलोमीटर अंतरावरील मुरूडचा रम्य किनारा मनाला विशेष मोहून टाकणारा आहे. स्वच्छ किनाऱ्यावर भटकणे, शांत समुद्रामध्ये मनसोक्त डुंबणे व कोकणी पदार्थांचा आस्वाद घेणे, यासाठी मुरूड हे गाव पर्यटकांच्या खास लक्षात राहण्यासारखेच आहे. पुण्याहून 200 किलोमीटर दापोली आणि दापोलीपासून नऊ किलोमीटरवर मुरूड हे महर्षी कर्वे यांचे जन्मगाव. नारळ-पोफळीच्या बागा, कौलारू घरे, सारवलेली अंगणे पाहत पाहत आपण सरळ समुद्रावरच पोचतो व तो विशाल सागर आपल्याला खिळवूनच ठेवतो. याच सागराच्या सान्निध्यात व अगदी नारळाच्या बागेत एक साधे पण सुंदर रिसॉर्ट आहे... श्री. सुरेश बाळ यांचे "मुरूड बीच रिसॉर्ट'. येथे गरमागरम उकडीचे मोदक, आंबोळी, थालीपीठ यासारखे कोकणी पदार्थ आधी कळवल्यास आधी पर्यटकांसाठी बनवतात. तसेच त्यांच्याकडे पोहा पापड, आमसुले, आंबापोळी, फणसपोळी इ. पदार्थ मागणीनुसार उपलब्ध असतात. शिवाय त्यांच्या बागेत जायफळ, लवंगा, काळी मिरी इत्यादी झाडेही पाहायला मिळतात. मुरूडच्या किनाऱ्यावरून सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग व हर्णैचा दीपस्तंभही दिसून येतो. मुरूड गावात दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या खांबांवर नक्षीकाम केलेले आहे, तर पुढील बाजूस नगारखाना व दगडी दीपमाळ आहे. मुरूडपासून चार-पाच किलोमीटर अंतरावर आंजर्ले गाव वसलेले आहे. तेथील गर्द झाडी असणाऱ्या टेकडीवर सुंदर गणेश मंदिर आहे. दापोली-दाभोळ रस्त्यावर असलेली पन्हाळेकाजी लेणी हेही पर्यटकांना पाहण्यासारखे स्थान आहे. दाभोळहून जेटीने किंवा फेरीबोटीने खाडी पार करून गुहागर, हेदवी व वेळणेश्‍वर अशा पर्यटनस्थानांची ओळख करून घेता येते. ही फेरीबोट दुचाकी, चारचाकी वाहने व माणसे यांना वाहून नेते व ही सेवा वाजवी दरात सतत उपलब्ध असते. तसेच मुरूडच्या किनाऱ्यावर राहून पर्यटक रायगड किल्ला, चिपळूणजवळील परशराम मंदिर, दिवेआगर येथील सोन्याचा गणपती इत्यादी ठिकाणे पाहून परत येऊ शकतो.

2 comments:

Tushar Phatak said...

तू मस्त लिहतोस रे! कृपया माझ्याशी संपर्क करू शकशील का?
तू मला एक मेल कर info@holidaysmaharashtra.com वर . . . मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे . . .

bhramar said...

मित्रा या ब्लॉगवरील सर्व लेख हे माझे नाहीत. यातील एखाद दुसरा लेखच माझा आहे. उवर्वरित लेख हे संकलित आहेत. तसा उल्लेखही मी ब्लॉगच्या मनोगतात केला आहे. पण तुला हे लेख आवडले याचे मला समाधान आहे. असाच संपर्कात रहा आणि इतर भ्रमरांनाही याबद्दल माहिती दे.
धन्यवाद