ताजमहाल

भारत दर्शन करायला निघालं, तर आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम येतो ताजमहाल, जगातल्या सात आश्‍चर्यांपैकी एक म्हणून गणला जाणारा...राजा शहाजहान याने आपली पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधलेली वास्तू म्हणून ताजमहाल ओळखला जातो. त्यातून इंडो-पर्शियन कलाकुसरीचे उत्तम दर्शन घडते. त्याची प्रमाणबद्ध रचना, नाजूक नक्षीकाम व अप्रतिम सौंदर्य नजरेत भरण्याजोगंच आहे. प्रेमाचं प्रतीक बनलेल्या या ताजमहालाची मनमोहक रूपे वेगवेगळ्या वेळी पर्यटकांना पाहता येतात. ताजमहालाखेरीज लाल किल्ला, जहांगीर पॅलेस, इतमद्‌-उद-दाऊला कबर, राधाओसामी समाधी, अकबराची समाधी ही इतर काही प्रेक्षणीय स्थळंही या शहरात बघता येतात. आगऱ्यापर्यंत पोचण्यासाठी सहा किमी अंतरावर खेरिया हा मुख्य विमानतळ आहे. बाहेरून येणाऱ्या फास्ट आणि सुपरफास्ट ट्रेन आग्रा रेल्वे स्थानकावरच थांबतात. पर्यटकांसाठी सर्वसामान्य हॉटेलांपासून ते पंचतारांकित डिलक्‍सपर्यंत अनेक प्रकारची हॉटेलं उपलब्ध आहेत. इथं मिळणाऱ्या मोगलाई डिशेसही खवय्यांचं खास आकर्षण ठरतात. आगऱ्याला येऊन खरेदी करणं हाही एक महत्त्वाचा भाग असतो. त्यासाठी सदर बाजार, ताज गंज, किनारी बाजार व प्रताप पुरा यांसारखी ठिकाणं प्रसिद्ध आहेत. तिथं प्रामुख्यानं हस्तनिर्मित आणि कलाकुसरीच्या वस्तू विकत मिळतात.

कसे जायचे -

ट्रेन - दिल्लीहून आग्रा हे शहर रेल्वेने चांगल्याप्रकारे जोडले गेले आहे. शताब्दी एक्‍सप्रेस-दोन तास, ताज एक्‍सप्रेस-अडीच तास आणि इंटरसिटी एक्‍सप्रेस-तीन तास.

बस - दिल्ली, जयपूर, लखनो, ग्वालियर या ठिकाणाहून बससेवा मिळू शकते.

दांडेली अभयारण्य

गोव्यातील सांगे तालुक्‍यात असलेले हे अभयारण्य जंगल सफारीसाठी प्रसिद्ध आहे. येथे जंगली खार, काळे चित्ते, वाघ, काळविटे आणि माकडे आणि ठिकठिकाणी किंग कोब्रासारखे अनेक प्रकारचे सर्प पाहावयास मिळतात.

खोतीगाव अभयारण्य

गोव्यातील काणकोण तालुक्‍यातील मुख्यालयापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. जंगली भागातील लोकांचे आयुष्य अनुभवण्याबरोबरच येथे हरणे आणि सरपटणारे प्राणी पाहावयास मिळतात. येथे अनेक वनस्पतींच्या जातींचे संवर्धन केले आहे.

साळावली धरण

पणजीपासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर सांगे तालुक्‍यात आहे. गोव्यातील हे सर्वांत मोठे धरण आहे. येथे पर्यटन खात्याने राहण्याचीही खास सोय केली आहे. याच धरणाजवळ गणपतीचे मंदिरही आहे. धरणामुळे विस्थापित झालेले हे मंदिर सरकारने पूर्वीच्याच साहित्यातून जसेच्या तसे पुन्हा उभारले आहे. हा प्राचीन वारसा पाहताना गोव्यातील पूर्वीचे जीवन किती समृद्ध होते, याचा अनुभव घेता येतो. याच परिसरात राज्य सरकार उभारत असलेले बोटॅनिकल गार्डनही पाहावयास मिळते.

डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य

प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्यावरून नाव मिळालेल्या हे अभयारण्य मांडवी नदीजवळील चोराव बेटावर आहे. पणजीहून बस किंवा टॅक्‍सी पकडून रायबंदर फेअरी डॉकवर यायचे आणि बोटीतून मांडवी नदी ओलांडून चोराव बेटावर उतरायचे. ऑक्‍टोबर ते मार्च हा काळ इथे पक्षी निरीक्षणासाठी चांगला मानला जातो. यात अनेक प्रकारचे पक्षी पाहता येतात. चोडण बेटावरील हे अभयारण्य पक्षी निरीक्षकांना नेहमीच आकर्षित करत राहिले आहे. येथे खारफुटीचे जंगल आहे. यामुळेच या बेटाला अनेक "फ्लाइंग वंडर्स'नी आपले घर केले आहे. मगरी, कोल्हे आणि लांडगे हे प्राणीही या बेटावर पाहायला मिळतात.

CHALA PHIRAYALA: सवतसडा धबधबा

CHALA PHIRAYALA: सवतसडा धबधबा

बोंडला अभयारण्य

पणजीपासून 50 किमी, मार्गोपासून 38 किमी आणि पोडापासून 20 किमीवर बोंडला अभयारण्य आहे. जंगल रिसॉर्ट हे येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण. आठ चौ. मी. परिसरात पसरलेल्या या अभयारण्यात हरणे, विविध पक्षी, वाघ अशा प्राण्यांबरोबरच येथील प्राणिसंग्रहालयातही मगरी, हत्ती, साप, हरणे पाहावयास मिळतात.

केसरवाळ धबधबा

पणजी-मडगाव रस्त्यावर वेर्णा गावामध्ये आहे. या धबधब्याच्या पाण्याच्या औषधी गुणांमुळे तो पर्यटकांत प्रसिद्ध आहे. त्वचारोग, विविध शारीरिक व्याधी असलेल्या व्यक्ती या धबधब्याखाली अंघोळ केल्यानंतर बऱ्या झाल्याचे अनेक अनुभव आहेत.

हरवळे धबधबा

गोव्यातील डिचोलीपासून नऊ किलोमीटर अंतरावर हरवळे धबधबा आहे. या धबधब्यात 24 फूट उंचीवरून पाणी सरळ खाली पडते. असे मानले जाते, की श्री रुद्रेश्‍वराची उंची 24 फूट होती. तेवढ्याच उंचीवरून हे पाणी पडत असल्याने या धबधब्याला धार्मिक महत्त्व आहे. या धबधब्यासमोरच रुद्रेश्‍वराचे मंदिर आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात गोव्यात येणे उत्तम. तसेच या धबधब्याजवळच प्राचीन गुहाही आहेत.

दूधसागर धबधबा

पणजीपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. या धबधब्याजवळूनच रेल्वे ट्रॅक जातो. रेल्वेतर्फे दूधसागरला जाण्यासाठी खास रेल्वे चालवली जाते. जगातील प्रमुख 237 धबधब्यांमध्ये दूधसागरचा समावेश होतो. या धबधब्याची उंची 310 मीटर इतकी आहे. उंचीच्या निकषामध्ये दूधसागर धबधबा भारतातील धबधब्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. बेळगाव-गोवा रस्त्यावरील कुळे गावापासून हा धबधबा अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे.