रामतीर्थ धबधबा


कोल्हापूर जिल्हातील आजऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर हिरव्या गर्द वनराईच्या कुशीत वसलेला रामतीर्थ धबधबा पावसात मुसळधार कोसळू लागतो.आजरा शहराच्या पश्‍चिम-उत्तर पूर्व दिशेकडून हिरण्यकेशी नदी वाहते. या नदीवरील रामतीर्थ धार्मिकस्थळाजवळचा धबधबा म्हणजे निसर्गसौंदर्याचा खजिना. दरवर्षी हजारो पर्यटक या स्थळाला आवर्जून भेट देतात. पावसामुळं हिरण्यकेशी नदीचं पात्र वाहायला सुरुवात झाली की, उन्हाळ्यात कोरडा पडलेला धबधबा सौंदर्यानं खुलत जातो. निसर्गाचं मुक्तहस्ते वरदान लाभलेला हा धबधबा अनेकांना भुरळ घालतो. नदीपात्रातील काळ्याकभिन्न विशाल पत्थरांवरून वेगानं धावणारं पांढरं-तांबूस पाणी धबधब्याचं सौंदर्य खुलवितं. तसंच कोसळणाऱ्या प्रपाताचे तुषार आणि मांद्रसप्तकातील धीरगंभीर आवाज अवघा आसमंत भरून टाकतो. सृष्टीसौंदर्याचं हे अनोखं रूप डोळ्यांत साठवूनच चिंब झालेला पर्यटक माघारी वळतो.

No comments: