सारपास ट्रेक


चित्रपटांमध्ये नट-नट्यांना बर्फात खेळताना, स्केटिंग करताना पाहिल्यावर नेहमी वाटायचं आपल्यालाही बर्फात खेळण्याची, स्केटिंग करण्याची मजा लुटता येईल का कधी? बर्फाच्या या आकर्षणापायी आम्ही काही मित्रांनी दोन-तीन वर्षांपूर्वी वैष्णोदेवीची वारीही केली होती. पण तिथं काही आम्हाला बर्फ मिळाला नाही. या वर्षी "युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया'ने (वायएचएआय) मात्र ही संधी दिली. हिमाचल प्रदेशमधील कुलू जिल्ह्यात युथ हॉस्टेलने 1 ते 31 मे या दरम्यान "सारपास ट्रेकिंग एक्‍सपेडिशन' (सारपास मोहीम) आयोजित केली होती. 21 तारखेला सकाळी 9 वाजता मी, अजय, नंदू आणि दीपा असे आम्ही चौघे "कसोल' गावातील युथ हॉस्टेलच्या बेसकॅम्पमध्ये दाखल झालो. भुन्तर शहरापासून कसोल 30 कि.मी. व समुद्रसपाटीपासून साडेसहा हजार फूट उंचीवर. (टेम्परेचर 6 डिग्री सेल्सियस) गावात दहावीपर्यंत शाळा, रुंद रस्ते, वीज, हॉटेल्स अशा बऱ्यापैकी सुविधा आहेत. तिथं हिप्पींचा सुळसुळाट फार. हे हिप्पी बहुतांशी इस्रायल, इटलीमधून इथं आलेले. त्यांच्यामुळे इथल्या बऱ्याच घरांची हॉटेलं झालेली आहेत. चरस-गांजाच्या नशेत अर्धनग्न अवस्थेत हे हिप्पी तरुण-तरुणी जीवनाचा स्वैर आनंद उपभोगत इथं फिरत असतात. या हिप्पी गिऱ्हाईकांमुळे इथले दुकानदार भारतीय पर्यटकांकडे ढुंकूनही पाहत नाहीत.गावातून बेसकॅम्पला परतल्यानंतर सहा-साडेसातपर्यंत जेवण झालं. त्यानंतर कॅम्पफायरचा कार्यक्रम. हे कॅम्पफायर फारच वेगळ्या प्रकारचं होतं. युथ हॉस्टेलला लाकडं तोडून, जाळून वाया घालवणं मान्य नाही. त्याऐवजी एका लहानशा वर्तुळाकार जागेत विजेचं तोरण फिरवलं होतं. कॅम्पफायरमध्ये ट्रेकर्स, लीडर्स सर्व सहभागी झाले होते. नकला, कविता, गाणी, विनोद असे मनोरंजनाचे प्रकार सादर केले जात होते. कॅम्पफायरमधला सर्वात गोड कार्यक्रम होता सारपास मोहीम पूर्ण करून आलेल्या ग्रुपला प्रमाणपत्र वाटण्याचा. काहींनी आपले अनुभव या वेळी सांगितले. गरमगरम बोर्नव्हिटाचे घोट रिचवित व बर्फातल्या आठवणी साठवित आम्ही झोपायला निघून गेलो.दुसऱ्या दिवशी "ऍक्‍लमटायझेशन' (यामध्ये सकाळी थोडासा व्यायाम झाल्यानंतर दोन ब्लॅंकेट्‌स असलेली सॅग घेऊन बेस कॅम्पासून सुमारे 500 फूट उंचीवर नेले जाते.) आणि "ओरियन्टेशन' (या वेळी ट्रेकिंगची सविस्तर माहिती दिली जाते.) झाल्यावर तिसऱ्या दिवशी "रॉक क्‍लायबिंग आणि रॅपलिंग' दोरीच्या सहाय्याने खाली कसं उतरायचं, खाचा, कपारींच्या आधारानं केवळ हाता-पायाच्या सहाय्यानं मोठ-मोठे दगड कसे पार करायचे याची माहिती या वेळी देण्यात आली. दोरीच्या सहाय्याने उंचावरून खाली उतरण्याचा प्रत्यक्ष अनुभव सर्वांना देण्यात आला.अखेर सारपासच्या दिशेने कूच करण्याचा दिवस अखेर उजाडला. पुढच्या 6 दिवसांच्या प्रवासाला लागणारं सामान पाठीवर घेऊन टाळ्यांच्या गजरात बेसकॅम्पमधून आम्ही प्रस्थान केलं. जणू काही एव्हरेस्टच सर करायला निघालो आहोत, असं वाटत होतं! 44 जणांचा काफिला ग्रहणच्या वाटेला लागला. महाराष्ट्र, गुजरात, चेन्नई, बंगळूर अशा विविध ठिकाणांहून आलेल्या ट्रेकर्समुळे भारतातील विविधता या मोहिमेत एकवटली होती. 16 ते 52 वयोगटाच्या या ग्रुपमध्ये दोन मुलीही होत्या. कसोल ते ग्रहण 9 कि.मी.चे अंतर. तर 7 हजार 700 फूट उंचीवर. (टेम्परेचर 6 ते 7 डिग्री सेल्सियस) दाट वनराजीतून "ऍरोमार्क' शोधत नदी, ओढे ओलांडत आम्ही मजल-दरमजल करीत होतो. दूरूनच कधी तरी ऐकू येणारी पक्ष्यांची किलबिल, नदीचा खळखळाट मन प्रसन्न करीत होता. तासभर चालल्यानंतर पाठीवरची सॅग जड वाटू लागली. ती उतरवून पाठ थोडी मोकळी केली. कॅम्पमधून दिलेली बिस्किटं आणि लीडर्सच्या नजरा चुकवून आणलेल्या चकल्या, शंकरपाळ्या, खाकरा बाहेर आला. ते खाऊन प्रवास पुन्हा सुरू झाला. एकवटलेली विविधता एव्हाना हळूहळू विलग होऊ लागली होती. महाराष्ट्रीयन ग्रुप तयार झाला होता. भावनगर, मेहसाना, गांधीनगरमधील गुजरातीही एक झाले होते. दक्षिण भारतीयांचं वेगळेपण जाणवू लागलं होतं. ही विविधता टोळक्‍यात विभागली ती अगदी शेवटपर्यंत टिकली. पाणवठ्याची जागा आल्यावर कॅम्पमधून दिलेला "लंच पॅक' काढून जेवण उरकलं. दीडएक तास तिथं घालवल्यानंतर आम्ही पुन्हा चालू लागलो. आता चांगलीच चढण लागली होती. वातावरणाचा नूरही बदलू लागला होता. आकाशात काळे ढग जमून त्यांनी पावसाची वर्दी आणली होती. ग्रहणच्या कॅम्पमध्ये जायला तास-दीड तासाचा रस्ता राहिला असेल नसेल, एवढ्यात पावसाने हजेरी लावली. लागलीच रेनशीट अंगवार घेतली. प्लॅस्टिकच्या त्या पिशवीवर टपटप गारा पडू लागल्या. या ठिकाणी आयुष्यात पहिल्यांदा गारांचा पाऊस अनुभवला. रेनशिटमधून ओंजळ बाहेर काढत गारा ओंजळीत साठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा अजून नीटसा बर्फ झाला नव्हता. त्या लगेचच विरघळून जायच्या. रस्त्यावरून पाणी जोराने वाहू लागलं होतं आणि रेनशीटमुळे पुढचा रस्ताही नीट दिसत नव्हता. त्यामुळे चालणं कठीण होत होतं. त्या परिस्थितीत तिथं थांबणंही धोक्‍याचं होतं, म्हणून आम्ही शेवटी चालतच राहिलो. गावातली घरं दिसू लागल्यावर वाटलं टेन्ट जवळ आलं. पण ते अद्याप बरेच लांब होते. एकदाचे आम्ही टेन्टमध्ये आलो. थोड्या वेळानं पाऊसही थांबला.चंद्रपूरमधील पारस ... हे तिथले कॅम्पलीडर. पाऊस गेल्यानंतर शिटी वाजली. सर्वांना बोलावून त्यांनी प्रथम स्वागत केलं. नंतर गरमागरम चहा आणि कांदेपोहे दिले. गारठलेल्या शरीरांना थोडी ऊब मिळाली. टेन्टमध्ये बसण्यापेक्षा आम्ही काही जण ग्रहण गावात फिरायला गेलो. 400 ते 500 लोकवस्ती असलेलं हे गाव सुंदर आणि आटोपशीर होतं. शेती, व्यवसाय, मजुरी ही इथल्या लोकांची उपजीविकेची साधनं. लोक श्रीमंत नसले, तरी गरीबही नाहीत. इथली घरंही मोठी अगदी स्वप्नातल्या घरांसारखी. बर्फाच्या मोसमात दैनंदिन व्यवहार सुरळीत चालावे यासाठी घरं एकमजली बांधलेली. तळमजला हा पूर्णपणे गुरांसाठी. वरच्या मजल्यावर कुटुंबं राहातात. दहाबारा खोल्यांच्या या घरांची आंतरबाह्य रचना अत्यंत आकर्षक असते. गावात एक प्राथमिक शाळाही आहे. पण पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कसोल व महाविद्यालयीन शिकण्यासाठी भुन्तरलाच जावं लागतं. एवढ्या कठीण परिस्थितीतही इथं कित्येकांनी एमएपर्यंत शिक्षण घेतलंय. सुशिक्षित तरुणांना मुंबई, दिल्लीसारख्या शहरांचं आकर्षण फारसं नाही. तिथं पैसा जरी भरपूर मिळत असला, तरी जिवाला शांती नाही. इथं आम्ही कष्टाची अंगमेहनतीची कामं करतो, पण आमचं जीवन अतिशय शांत आहे. हा इथल्या तरुणांचा दृष्टिकोन. पैशाच्या आशेनं काही जण शहरांचा मार्ग धरतात, हेही ते कबूल करतात. इथली लग्नपद्धती साधारणपणे आपल्यासारखीच. लग्नसमारंभ चांगला दोन-तीन दिवस चालतो. या वेळी नाच-गाणी, जेवण-खाण अशी सर्व सरबराई असते. इथंही हुंडाप्रथा आहे. पण हुंड्यासाठी मुलीचा छळ मात्र होत नाही.दिवाळी, दसरा हे या लोकांचे सर्वात मोठे सण. या दिवशी गोड पदार्थ केले जातात. दिवाळीत फटाकेही फोडतात. ऑगस्ट महिन्यात इथं मोठी जत्रा भरते. त्या वेळी आजूबाजूच्या गावातल्या लोकांना आमंत्रित केलं जातं. त्यांच्या राहण्या-खाण्याची मोफत व्यवस्था केली जाते. या दिवशी पारंपरिक वेशात फेर धरून "कुल्वी' हे लोकनृत्य केलं जातं, गाणी म्हटली जातात. देवी, देवतांची जरी मंदिरं नसली, तरी पुराणातल्या याज्ञवल?क्‍य ऋषींचं मंदिर इथं आहे. सिनेमागृह शहराच्या ठिकाणी असल्यामुळे प्रमुख मनोरंजनाचं साधन म्हणजे टीव्ही. चार महानगरांत कॅसचा वाद सुरू असला तरी ग्रहणवासीयांना त्याची फिकीर नाही. इथल्या प्रत्येक घराबाहेर डिशअँटिना लावलेली दिसते. या गावाचं सौंदर्य साठवित आम्ही टेन्टमध्ये आलो.दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शिटी वाजली. पुढचा दिवस सुरू झाला. चहा, नाश्‍ता करून पुढच्या प्रवासासाठी दिलेला लंचपॅक घेऊन आम्ही साडेआठ वाजता ग्रहण सोडलं. आता या पुढच्या प्रवासात आम्हाला कुठेच गाव लागणार नव्हतं आणि ग्रहणचंही पुन्हा दर्शन होणार नव्हतं. पद्री आमचा दुसरा हॉल्ट. ग्रहणपासून 10 कि.मी.वर आणि 9,300 फूट उंचीवर. (टेम्परेचर 4 ते 5 डिग्री सेल्सियस) ऍरोमार्क्‍सच्या आधाराने वाट काढीत आम्ही मार्गक्रमण सुरू केलं. पाईन, देवदारच्या गर्द झाडांमधून निमुळत्या, वळणावळणांच्या रस्त्यानं आम्ही पुढे चाललो होतो. वाटेत मध्येच एखादं मोठं पडलेलं झाड आडवं येई. पावसात बुळबुळीत झालेलं ते झाड निमुळत्या रस्त्यावरून ओलांडणं फार जोखमीचं असे. कारण जरासा पाय घसरला, की सरळ 10-15 फूट खाली. मग घाबरत घाबरतच एकमेकांच्या आधारानं ते झाड आम्ही ओलांडत असू. वाटेत दोन-तीन झाडं अशी पडलेली असायचीच.सह्याद्रीमध्ये जसे विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात, निरनिराळी जनावरं आढळतात, तसं इथं फारसं काही दिसलं नाही. कुठल्या तरी पक्ष्याचा बारीकसा आवाज तोही क्‍वचितच आला तर. इथं ओढ्यांचा खळखळाट मात्र फार. जेवणाच्या ठिकाणी जमले तर ते डोमकावळे. नाही म्हणायला ग्रहणमध्ये लांब शेपटीचा निळसर रंगाचा राजेशाही थाटात उडणारा एक पक्षी पाहण्यात आला. बेस कॅम्पमधून निघताना दिलेल्या लिमलेटच्या गोळ्या अजूनही साथ देत होत्या. दम लागला की, एक गोळी तोंडात टाकायची, चघळून खाऊन झाली की, थोडं पाणी प्यायल्यावर हुशारी यायची. बहुतेक रस्ता हा उभ्या चढणीचा असल्यानं चालताना दम लागत असे. त्यामुळे बहुतेक सर्वांचा प्रवास हा मुक्‍यानंच चालत असे. दोन-अडीचपर्यंत आम्ही पद्री कॅम्पला आलो. स्वागताचा बॅनर तिथं वाट पाहातच होता. फोटो वैगरे काढून झाल्यानंतर आम्ही टेन्टकडे आलो. पाठीवरच्या सॅग उतरवून थोडी विश्रांती घेतल्यावर कॅम्प लीडरची शिटी वाजली. स्वागत, ओळख परेड झाली. दरम्यान, नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हवेत गारवा पसरला होता. बंगळूरचे नटराज आणि अहमदाबादचे विशाल पटेल हे इथले कॅम्पलीडर. त्यांनी स्क्वॅश (ऑरेंज किंवा लेमन फ्लेवरचे सरबत) प्यायला दिले. तिथल्या थंडीमध्ये पाणी पिण्याची इच्छा (आणि हिम्मतही) होत नसल्यामुळं कॅम्पमध्ये हे सरबत दिलं जातं. शरीरात पाण्याचं समप्रमाण राहावं हा त्यामागचा हेतू. हाताला झिणझिण्या आणणाऱ्या पाण्यात हात घालायला लागू नये, यासाठी प्रत्येक जण एकापेक्षा एक शक्कल लढवित असत. स्क्‍वॅश मिळो, चहा मिळो किंवा सूप मिळो ते पिऊन झाल्यावर भांडं धुण्यासाठी नळावर कोण जातंय याकडेच सगळ्यांचा "कानाडोळा' असे. एखादा नळाजवळ जाणारा दिसला की, आपलंही भांडं त्याच्याजवळ सरकवायचं. तीच परिस्थिती दोन नंबरची. काहींनी टिश्‍यू नेले होते. पण हे "टिश्‍यू कल्चर' आपले नसल्याने टिश्‍यू वापरूनही पाण्यात हात घालावाच लागे.पद्री कॅम्प उघड्या विशाल माळावर लावलेला होता. चारी बाजूला डोंगर. त्यातल्या काहींवर बर्फही होतं. लांबवर असलेल्या एका डोंगराच्या टोकावर नगारूचे म्हणजे आमच्या पुढल्या प्रवासातले टेन्टचे ठिपके दिसत होते. आपल्याला अजून एवढं वर चढून जायचं या कल्पनेनं पोटात भीतीचा गोळाही आला होता. पावसाची चिन्हं दिसू लागल्यानं आमचा त्या दिवशीचा नाश्‍ता आणि जेवण लवकरच उरकलं. त्या दिवशीचा आमचा प्रवास संपला होता. सकाळी जाग आली ती बेडटीच्या शिट्टीनं. चहा, नाश्‍ता करून व लंचपॅक घेऊन पद्रीलाही रामराम केला. आता आमचा पुढला टप्पा होता रातापानी. 5 कि.मी.चा प्रवास आणि 11 हजार 200 फूट उंचीवर आम्हाला जायचं होतं. इथलं (टेम्परेचर 6 ते 7 डिग्री सेल्सियस) पावसामुळे वाट निसरडी झालेली. त्यात सुरुवातीचा थोडा प्रवास उतारावरचा. मग कोणी न घसरले तरच आश्‍चर्य. थोडा अंदाज चुकला आणि खाली उतरताना दीपा घसरली. तेव्हापासून जो तिचा आत्मविश्‍वास डगमगला तो शेवटपर्यंत आला नाही. त्यानंतरचा तिचा सर्व प्रवास घाबरतच झाला. पण अशातही तिनं हा ट्रेक पूर्ण केला नागमोड्या वाटा, वाटेत पडलेली झाडं ओलांडत, पुढचा प्रवास सुरूच होता. आता पाऊस पडत नव्हता, तरी तो कधीही येईल ही भीती असल्यानं बहुतेकांनी आता रमतगमत चालणं सोडून वेग वाढवला होता. अगदी दुपारचं जेवणही ते घेत नव्हते. रातापानीला पोहोचण्यासाठी केवळ एक तासाचा रस्ता राहिला होता. पण पावसाची धास्ती घेतलेले आमचे मित्र थांबायला तयार नव्हते. आम्ही चार-पाच जणांनी जेवण घेतलं आणि कॅंपच्या वाटेला लागलो. त्यांची भीती शेवटी सार्थ ठरली. टपाटप गारा पडू लागल्या. थोडा वेळ झाडाखाली पाऊस जाण्याची वाट पाहू लागलो. मधूनच गारा तोंडातही टाकत होतो. पण पाऊस काही हटायचं नाव घेत नव्हता. शेवटी नाईलाजानं आम्ही निघालो. पण टेन्ट जवळच असल्याने फार त्रास झाला नाही. पुढे गेलेल्या आमच्या मित्रांच्या चेहऱ्यावर आपला अंदाज खरा ठरल्याचा अंदाज दिसत होता. पाऊस ओसरला होता. टॉमेटो सूप आमची वाट पाहातच होतं. आम्ही हावऱ्यासारखे धावत जाऊन सॅगमधून ग्लास काढले. लीडर महेश पटेल (अहमदाबाद) यांनी आमचे स्वागत केलं. तिथली परंपरा पार पडल्यानंतर दोन-दोन ग्लास गरमागरम सूप प्यालो. पोटात ऊब आल्यानं थोडं ताजतवानं वाटायला लागलं. इथून नगारूचे टेन्ट आता स्पष्ट दिसत होते. दुर्बिणीतून माणसांची हालचालही स्पष्ट दिसत होती आणि आता अंतरही कमी झालं होतं. रातापानीचा निसर्ग खूपच सुरेख होता. टेन्टच्या समोर 30-40 फुटांचा मोकळा माळ. त्यापुढे मात्र खोल दरी. नजर ठरत नाही इतक्‍या लांबपर्यंत अगदी क्षितिजापर्यंत खालीवर होत गेलेल्या हिमालयाच्या रांगा. काही डोंगर बर्फाळ, काही हिरवे कंच, काही नुसतेच दगडी, तर काही धुक्‍याखाली मान घालून जणू काही ध्यानस्त बसलेले भासत होते. ढगाआड कुठे तरी सूर्य लपला होता. त्याची किरणं त्या ढगांच्या कडांमधून जात असल्यानं मोकळ्या आभाळात लांबवर कवडसा उमटला होता. हे ऊन-सावलीचे खेळ टिपण्यासाठी पटापट कॅमेरे सरसावले. हवामान चांगलं असल्यानं बेस कॅम्पनंतर पहिल्यांदाच रातापानीला कॅम्पफायर होणार होता. त्याचीच ती शिटी. पटेल यांनी सर्व ट्रेकर्सना गोलाकार उभं केलं. गाणी, नाच, कविता, शेरो-शायरीत कॅम्पफायरची सांगता झाली. अजूनही सूर्य आकाशात होता. त्यामुळे थंडी जाणवत नव्हती. असंच हवामान राहिलं, तर सनसेट दिसणार होता. प्रोफेशनल फोटोग्राफर मोठमोठ्या लेन्स लावून सरसावले. पण थोड्या वेळात पश्‍चिमेला धुकं पसरलं. सूर्य धुक्‍याआडच अस्त पावला. थंडीही वाढू लागली होती. आम्ही जेवून झोपलो.सकाळी उठलो. मन प्रसन्न वाटत होतं. कारण मोहिमेची सांगता जवळ येऊ लागली होती. सारपास पार करण्यासाठी फक्‍त एकच टप्पा राहिला होता. नगारूला पोचल्यानंतर सारपास काहीच नव्हतं. तरी तो 9 कि.मी.चा प्रवास होता. यापुढचा जवळपास सगळा रस्ता चढणीचा होता. लंचपॅक घेऊन आम्ही नगारूकडे कूच केली. चालत होतो. दमत होतो. विश्रांती घेऊन पुन्हा चालत होतो. डोंगराला वळसा घालून जाणारी वाट. एका बाजूला उंच डोंगर, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. इकडे तिकडे बघताना पाच चुकला, तर सरळ खालची आणि खालून वरची वाट धरावी लागणार होती. थोडा थोडा मातीत साठून राहिलेला बर्फ आता दिसू लागला होता. म्हणजे लवकरच बर्फाचं दर्शन होणार! या कल्पनेनं मन मोहरून आलं. नगारूचा बॅनर दिसू लागला. आम्ही साडेबारा हजार फुटावर होतो. पावसाने स्वागतासाठी हजेरी लावली. पण तो आता बर्फ बनून आला होता. आम्हाला टेन्टमध्ये लवकर जायचं होतं. कारण ती जागा अत्यंत धोकादायक होती. चढण उंच असल्यामुळे जोरात चालणंही शक्‍य नव्हतं. मुख्य म्हणजे, आता ऑक्‍सिजनचं प्रमाणही कमी झालं होतं. आतापर्यंत जितके कॅम्प केले तिथं माणसं नसली तरी झाडं होती. इथं झाडांचाही पत्ता नव्हता. इथल्या वातावरणाचा नेम नाही. काही वेळा ताशी 120 कि.मी. वेगाने इथं वारे वाहतात. त्यामुळे सर्वांचीच टेन्ट गाठण्याची घाई चालली होती. एकदाचे टेन्ट दिसले. वातावरण खराब असतानाही तिथले कॅम्पलीडर विश्‍वासकुमार गर्ग (पंजाब) आमचं स्वागत करण्यासाठी पुढं आले होते. अंतर कमी असलं, तरी ते भरपूर वाटत होतं. थोड्याच वेळात बर्फाच्या पावसानेही जोर धरला होता. बर्फाचे टपोरे दाणे साबुदाण्यासारखे जमिनीवर उडत होते. काही वेळानं पाऊस बंद झाला. बर्फ वितळू लागल्यानं. सगळी जमीन निसरडी झाली होती. असेंब्लिंगसाठी बोलवायला आलेले दोघे जण आमच्या समोरच घसरून पडले होते. आम्ही काठीचा आधार घेत सावकाश पावलं टाकत कॅम्पलिडरसमोर जमा झालो. इन्स्ट्रक्‍शन दिल्यानंतर त्यांनी टेन्टमध्येच आमच्या चहाची व्यवस्था केली. चहा पिऊन होईपर्यंत वातावरण पूर्ण बदललेलं होतं. आभाळ मोकळं झालेलं. सूर्य दिसू लागला होता. सर्व जण टेन्टबाहेर आले. ज्या जागेवर टेन्ट लावले होते, ती जेमतेम 50 फुटांची. सारपारला जाण्याचा मार्ग सोडला, तर बाकी सर्व बाजूला दरीच होती. इथून ग्रहण, पद्री आणि रातापानीचे कॅम्प स्पष्ट दिसत होते. दूरवर हिमालया?य्‌ा पसरलेल्या रांगा. समोर सारपासचा बर्फाच्छादित डोंगर. दुसऱ्या दिवशी या डोंगरावरूनच आम्हाला खाली उतरायचं होतं. पाण्याची सोयदेखील मजेशीर होती. एका ठिकाणी खूप बर्फ साठलेलं होतं. त्याच्या पायथ्याला दोन ठिकाणी प्लॅस्टिकच्या बाटल्या लावलेल्या होत्या. बर्फ वितळायला सुरुवात झाली की, त्या बाटल्यांच्या तोंडातून पाणी येत असे. तेच पाणी जेवणाला वापरलं जाई. त्या दिवशी नेहमीपेक्षा जरा लवकरच जेवण झालं. दक्षिण दिशेला धुकं गडद होऊ लागलं होतं. काळे ढग गुरगुरत आमच्याकडे येत होते. हे वादळाचे संकेत असल्याचं ओळखून आम्ही सरळ टेन्टमध्ये शिरलो. तोपर्यंत वाऱ्यानंही वेग घेतला होता. टेन्टचे मागचे-पुढचे पडदे बंद करण्याची झटपट होऊ लागली. एखादा आडदांड गुंड दरवाजावर लाथाबुक्‍क्‍या घालून घरात शिरण्याचा प्रयत्न करतो, तसे हे वारे टेन्टमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत होते. पण पडदे बंद करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. टेन्ट गदागदा हलू लागले. टेन्ट उखडून पडतायत की काय, अशी परिस्थिती झाली होती. कुठून अवदसा आठवली, नि या ट्रेकला आलो, असं वाटायला लागलं. आम्हाला लवकर झोपणं भाग होतं. कारण दुसऱ्या दिवशी पहाटे अडीच वाजता उठायचं होतं. प्रवास अर्ध्या रात्रीच सुरू करायचा होता. कारण एकदा का सूर्य उगवला, की बर्फ वितळायला सुरुवात होते. त्यानंतर बर्फातून चालणं शक्‍य नसतं.दुसऱ्या दिवशी आम्ही अडीचला नाही, पण तीनला उठलो. एवढ्या पहाटे ब्रश करण्याची कोणाचीच छाती नव्हती. बेडटी केव्हाचाच येऊन गेला होता. तो पुन्हा मिळणे शक्‍य नव्हता. नाश्‍ता, पॅकलचं घेऊन निघेपर्यंत आम्हाला सहा वाजले. निघायला उशीर झाला होता. दोन गाईड घेऊन आम्ही नगारूला रामराम केला. बर्फाच्या प्रदेशात आम्ही पाय ठेवला. वारा वाहत होता. इथून आम्हाला अजून 1300 फूट उंच जाऊन सारपास गाठायचं होतं. बर्फातला एकूण प्रवास 8 तासांचा होता. (टेम्परेचर 2 ते 3 डिग्री सेल्सियस) सौर म्हणजे तळं. त्या डोंगरावर अशी बरीच बर्फाची तळी आहेत. त्यापैकी एका तळ्याजवळून आम्ही जाणार होतो. त्यामुळे या ठिकाणाला सारपास हे नाव पडलं. बर्फात खेळण्याचे अगोदर ठरवलेले बेत एव्हाना पूर्णपणे गोठले होते. मरणाची थंडी होती. नाक आणि डोळ्यांशिवाय शरीराचा कोणताच भाग उघडा नव्हता. त्यातही नाक असल्याचं जाणवत नव्हतं. दीड-दोन तास बर्फात चालून झाल्यानंतर आम्ही त्या तळ्याजवळ म्हणजेच सारपासजवळ आलो. तिथून पुढं गेल्यानंतर एका बर्फाळ मैदानावर आमच्या गाईडनी आम्हाला थांबवलं. तिथं त्यांचा चहाचा स्टॉल होता. ग्रुपमधल्या बऱ्याच जणांनी तिथं चहा घेतला. फोटो काढले. तिथून आम्ही निघालो शंभरएक पावलं चालल्यानंतर गाईडनं आम्हा सर्वांना रांगेत उभं केले. पहिल्यांदा त्या दोघांपैकी एक बर्फावरून स्लाईड करून खाली गेला. खाली गेल्यानंतर एखाद्या मुंगीसारखा तो दिसत होता. आता आम्हाला बर्फावरून घसरायला मिळणार होतं. दुसरा गाईड प्रत्येकाला एका ठराविक जागेवर बसून खाली पाठवत होता. एकेकाला खाली जाताना पाहून आमचा आनंद स्लाईडगणिक वाटत होता. स्वत: स्लाईड करताना तर आम्हाला गगन ठेंगणं झालं होतं. दरम्यान, सूर्य आता व्यवस्थित वर आल्यामुळे बर्फ वितळू लागला होता. वितळू लागलेल्या बर्फातून चालणं अवघड होऊ लागलं होतं. ऑक्‍सिजन तर फारच कमी असल्यामुळे थोडं चाललं तरी दम लागत असे. त्या बर्फाळ डोंगरावर जवळपास विश्रांती घेण्यासारखं ठिकाण नसल्यानं चालणं भाग पडत होतं. काठीच्या आधाराने तिथल्या तिथंच उभं राहूनच अर्ध्याएक मिनिटाची विश्रांती घेऊन आम्ही पुढं जात असू. इतकी वर्षे हवाहवासा वाटणारा बर्फ आता नकोसा वाटत होता. अजून बरंच चालायचं होतं. प्रत्येक पाऊल टाकताना जीवावर येत होतं. काही ठिकाणी बर्फ कडक होता आणि ऊन पडल्यामुळे पृष्ठभागावरचा बर्फ वितळत होता. त्यामुळं पाय जोरात आपटून घट्ट रूतवूनचालावं लागत होतं. त्या आपटून पाय चालण्यामुळे ते भरून आले होते, पण तरीही चालणं भाग होतं. कारण आमच्या विश्रांतीचे ठिकाण अजून खूप लांब होतं. नगारूला मिळालेल्या लिमलेटच्या गोळ्या एकेक तोंडात टाकत कसेबसे पुढे चालत होतो. विश्रांतीचं ठिकाण आता दिसू लागलं होतं. मनाला पुन्हा उभारी मिळाली. आता थोडंच चालायचं आहे. मग विश्रांतीच करायची आहे. असं मनाला समजावत आम्ही पुढे चाललो. अंतर आता थोडंच राहिलं होतं, पण सतर-ऐंशीच्या कोनातून ती वाट जात होती. आता फक्‍त दहाच पावलांचं अंतर राहिलं होतं. पण ही वाट सरळ काटकोनात होती. पुढे गेलेल्या गाईडनं आपल्या हातातल्या कुदळीसारख्या हत्यारात भिंतीसारख्या त्या वाटेवर खड्डे खोदून पायऱ्या तयार केल्या होत्या. पण प्रत्येक पायरीवर आई आठवत होती. अखेर त्या विश्रांतीच्या ठिकाणी आम्ही एकदाचे पोहोचलो. थोडं चालल्यानंतर आता स्लाईड करीतच जमिनीवर जायचं होतं. अखेर शेवटी स्लाईड करून पुन्हा आम्ही जमिनीवर आलो. इथं एक चहाचा स्टॉल होताच. सर्व जण तिथं बसलो. बूट काढून ओले मोजे सुकत टाकले. नगारूहून दिलेला फ्रुटीसारखा मॅंगो ज्यूस प्यालो. उरलेली बिस्किटं खाल्ली. एव्हाना बर्फाचं आकर्षण पार नाहीसं झालं होतं. डोंगरावरचा बर्फ आम्हाला खुणावत तर नव्हताच, उलट कशी जिरवली तुमची, असं चिडवत असल्यासारखा वाटत होता.घरची आठवण अधिकच तीव्र होऊ लागली होती. कधी एकदा घरी जातोय असं झालं होतं. पण घर एवढ्यात भेटणार नव्हतं. अजून 5 दिवस तरी लागणार होते. नाईलाजानं आम्ही उठलो. कारण बिस्केरी गाठायचं होतं. यापुढचा सर्व रस्ता तसा सोपाच होता. कारण आता चढण लागणार नव्हती. पण वाटेला लागल्यानंतर जाणवलं की, चढण जेवढी चढायला कठीण, उतार तेवढाच उतरायला त्रासदायक असतो. थोड्याच वेळात आम्ही बिस्केरी कॅम्पमध्ये दाखल झालो. बिस्केरीतलं निसर्गसौंदर्य अप्रतिम होतं. आमचे टेन्ट मोठ्या मैदानावर लावले होते. सगळा डोंगर हिरवी-पोपटी चादर पांघरलेला. मेंढ्यांचे कळप, गुरं चरत होती. राई, सोस, रकाडच्या झाडांच्या रांगा. प्रसन्न वातावरण एक वेगळाच आल्हाद देत होतं. हिंदी चित्रपटांमधली स्वित्झर्लंडची सृष्टी आम्ही प्रत्यक्षात तिथं अनुभवत होतो. एवढी सुंदर लोकेशन्स भारतात असताना हे बॉलिवुडवाले स्वित्झर्लंडला का पळतात, हा प्रश्‍न राहून राहून सारखा मनात येत होता. ओले झालेले आणि स्लाईड्‌समुळे फाटलेले कपडे बदलून, नवीन कपडे घालून तिथली स्वर्गसुंदर सृष्टी डोळ्यांनी पिऊन घेण्यासाठी आम्ही टेन्टबाहेर येऊन बसलो.सकाळी शिटीनं जाग आली. पुढचा टप्पा गाठण्याची घाई होतीच. लंच घेऊन आम्ही "बंडक्ताज'च्या वाटेला लागलो. बिस्केरी ते बंडक्ताज 12 कि. मी.चे अंतर (टेम्परेचर 6 ते 7 डिग्री सेल्सियस) आमच्यासोबत रामलाल होते. अर्ध्या वाटेपर्यंत रस्ता दाखवून ते परतणार होते. पुढचा टप्पा लवकर लवकर गाठायची ओढ लागल्यानं पावलं पटापट पडत होती. पुन्हा एकदा दाट वनराजीतून चालताना उल्हसित वाटत होतं. इथं निरनिराळ्या प्रकारची फुलं दिसत होती. सदाफुलीसारखी, पण साबुदाण्याएवढ्या आकाराची पांढरी फुलं तर खूपच सुंदर वाटत होती. मोठ्या चारपाच झाडांच्या मधे नेहमीप्रमाणं एक टी स्टॉल होता. आम्ही तिथं सॅग उतरवल्या. लंच करून घेतलं. त्या चहावाल्याबरोबर गप्पा मारता मारता तो गायक वगैरे असल्याचं समजलं. सागरसिंग राठी त्याचं नाव. स्वत:चं एक गाणं त्यानं आम्हाला गाऊन दाखवलं. त्या गाण्याचे बोल होते "मेरी शिरीदेवी ओ कौरवे चौली तू'. पहाडी भाषेतलं ते गाणं ऐकताना फारच सुंदर वाटत होतं. त्या गाण्यातून त्यानं एका विफल प्रियकराची व्यथा मांडली होती. गाण्यातला प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो की, मी तुला श्रीदेवी, माधुरी, पूजा भट या नट्यांपेक्षाही सुंदर मानलं. पण, उलट तू मलाच सोडून दुसऱ्याकडे निघून गेलीस. त्याच्या गाण्याची "तारीफ' करीत आम्ही पुढचा रस्ता धरला.बंडक्ताज कॅम्पदेखील सुंदर ठिकाणी लावला होता. टेन्टच्या मागंपुढं ऐसपैस जागा होती. आता आम्ही आणि ऊंची 7600 फुटावर होतो. त्यामुळे फारशी थंडी जाणवत नव्हती. पुढचा दिनक्रम युथ हॉस्टेलच्या नियमाप्रमाणं पार पडला. सकाळी उठून आम्ही बरशैनीच्या मार्गाला लागलो. आमची बेसकॅम्प गाठण्याची उर्मी अधिकाधिक वाढत होती. साहजिकच चालण्याला वेग आला होता. बरशैनीहून निघाल्यानंतर वाटेत पुलघा गाव लागलं. या गावातल्या कोणत्याही व्यक्तीबरोबर बोलायचं नाही, अशी ताकीद आम्हाला लीडर्सनी अगोदरच दिली होती. कारण या गावात मोठ्या प्रमाणावर अफूची तस्करी होते. आदेशांचं पालन करीत आम्ही गाव ओलांडून पुढे गेलो. तिथं पार्वती नदीवर धरण बांधण्याचं म्हणजेच "पार्वती प्रोजेक्‍टचं' काम सुरू होतं. 2151 मेगावॅट वीजनिर्मितीचा तो प्रकल्प तयार करण्याचं काम मुंबईतल्या पटेल इंजिनीअरिंग या कंपनीकडे आहे. इथून पुढचा टप्पा मनीकर्णचा आणि तो बसचा असल्याने आम्ही जवळच असलेल्या बस थांब्यावरनं बस पकडली. बसचा प्रवासही रोमहर्षकच होता. थ्रील म्हणून आम्ही बसच्या टपावर बसून प्रवास करण्याचं ठरवलं. पण पहाडी रस्त्यांतून वळणं घेत बस जाऊ लागली, तसा आमचा जीव वरखाली होऊ लागला. प्रत्येक वळणाला बस एका बाजूला झुके. नेमकी त्याच बाजूला खोल दरी असायची. काही वेळा विजेच्या जिवंत केबल वाकल्यानंतरही शिवाशिवीचा जीवघेणा खेळ खेळत. ही अडथळा शर्यत पार करीत आम्ही मनीकर्णला पोहोचलो. मनीकर्ण हे हिंदू आणि शिखांचे तीर्थक्षेत्र. मनीकर्णबद्दल तिथं एक आख्यायिका सांगितली जाते. एकादा शंकरपार्वती या मार्गावरून जात असताना पार्वतीच्या कानातला दागिना या ठिकाणी पडला. तो शेषाने गिळला व तो पाताळात लपून बसला. बराच शोध केला तरी शंकराला दागिना सापडला नाही. शेवटी त्याचा राग अनावर झाला. हे शेषाला कळल्यावर त्याने पाताळगंगेमार्फत तो दागिना पुन्हा धरणीतून वर फेकला. तेव्हापासून या स्थानाला मनीकर्ण असे नाव पडले. या ठिकाणचं एक महत्त्वाचं आश्‍चर्य म्हणजे गरम पाण्याचं कुंड. कुंडाजवळच शिखांचा गुरुद्वारा आहे. गुरुद्वारातल्या "लंगर'मधलं जेवण या कुंडातच शिजवलं जातं, इतकं इथलं पाणी गरम आहे. या कुंडातून पाईपद्वारे एका मोठ्या कुंडात पाणी सोडलेलं आहे. तिथे भाविकांच्या स्नानाची व्यवस्था केलेली आहे. त्या प्रदेशातलं मनीकर्ण तसं नामांकित तीर्थक्षेत्र असल्यानं, इथं विविध प्रकारची बरीच दुकानं आहेत. खरेदी वगैरे करून झाल्यानंतर पुन्हा बसमध्ये बसून आम्ही कसोलला आलो. कधी एकदा घर गाठतोय असं झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी भुन्तरला जाणारी गाडी पकडली. कसोलच्या आठवणी डोळ्यात आणि हृदयात साठवीत आम्ही घरच्या वाटेला लागलो.

No comments: