जिम कॉर्बेट नॅशनल पार्क

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या देशातील महत्त्वाच्या अभयारण्यांपैकी एक असा त्याचा लौकिक आहे. या पार्कची स्थापना "हेली नॅशनल पार्क' या नावाने 1936 मध्ये करण्यात आली. 1957 मध्ये त्याचे नाव बदलून प्रसिद्ध शिकारी तसंच पर्यावरणवादी लेखक जिम कॉर्बेट यांचं नाव देण्यात आलं. 1970 च्या सुमाराला "वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडा'ची मदत घेऊन व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यामुळे वाघांची संख्या वाढायला मोठीच मदत झाली आहे. या परिसरात वाघ, हत्ती, चित्ता, रानमांजर यांच्यासारखे जंगली प्राणी; मगर, सुसर, नाग असे सरपटणारे प्राणी आणि पक्ष्यांच्या सहाशेहून अधिक प्रजाती पाहायला मिळतात. हिरव्यागार झाडांनी नटललेल्या वनराईचा आस्वाद घेण्यासाठी फ्लोरा भागात जायला हवं. इथं भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते जून हा उत्तम कालावधी असून पावसाळ्यात नद्यांना पूर आल्यास ते काही कालावधीसाठी बंदही ठेवलं जातं. इथं जाण्यासाठी पंतनगर येथील विमानतळ तसेच दिल्लीचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. रेल्वेनं जात असल्यास रामनगर आणि मोरादाबाद या रेल्वेस्थानकावरून टॅक्‍सी आणि बस उपलब्ध होतात. रस्त्यानं जाण्यासाठी जवळपासच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांपासून थेट दळणवळण सेवा पुरविली जाते. पर्यटकांना राहण्यासाठी वेगवेगळी हॉटेल्स, वन खात्याची रेस्ट हाऊस आणि रिसॉर्टसची सोय आहे. इथं खरेदी करण्यासाठी फारसा वाव जरी नसला, तरी फक्त जंगलात प्राप्त होणाऱ्या काही गोष्टी (आवश्‍यक त्या परवानगीसहीत) घेता येतात.

No comments: