रामसेज, वाघेरा, खैराई

रामसेज, वाघेरा, खैराई

नाशिक पेठ रस्त्यावरच्या जकात नाक्‍यापुढे आशेवाडी गाव आहे. आतिथ्यशील गावकऱ्यांच्या आशेवाडीत मारुतीचं प्रशस्त मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारून छोटेखानी रामसेज किल्ल्यावर चढाई करता येते. आशेवाडीच्या दिशेला दिसणारा रामसेजचा बुधला डावीकडे ठेवत पुढे गेल्यावर रामसेज किल्ल्यावर चढणाऱ्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांनी वर चढून आल्यावर गडावर प्रवेश करण्यापूर्वी रामाचं मंदिर आणि थंडगार पाण्याची टाकी आहे. मारुती ते राम, हे अंतर आहे फक्‍त एका तासाचं! रामसेज गडमाथ्यावर कोरडी पाण्याची टाकी, पडक्‍या जोत्याचे अवशेष आहेत. माथ्यावर सुस्थितीत असलेलं मंदिर आहे. त्यात वा रामाच्या मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते. आशेवाडीकडला बुधला व त्याजवळच ध्वजस्तंभ ही गडफेरीत करण्याची इतर ठिकाणं. रामसेजवरून समोर प्रशस्त भोरगड दिसतो. संरक्षण यंत्रणांची रडार सिस्टिम असल्याने भोरगडावर मात्र आपल्याला प्रवेश नाही. दिसायला छोटा असणाऱ्या रामसेजवर मोठा इतिहास घडलेला आहे. मुघलांविरुद्ध तब्बल पाच वर्षं या किल्ल्याने टिकाव धरला होता. एकेक किल्ला असा पाच वर्षं लढवण्याच्या क्षमतेतच स्वराज्याचं सामर्थ्य दडलं होतं. रामसेजवरून पुन्हा नासिककडे येताना म्हसरूळनजीक जैन चांभारलेणी आहेत. वेळ असल्यास ती जरूर पाहून घ्यावीत. म्हसरूळकडून एक रस्ता थेट वाघेऱ्यापर्यंत जातो. वाघेरा घाटमाथ्यावरचं गाव आहे. गावाच्या समोरच एक मोठा बंधारा व जलाशय आहे. जलाशयाच्या पाठी उभा आहे उंच वाघेरा. वाघेऱ्याचे कडे थेट घाटाखाली उतरलेले आहेत. धरणाच्या पाण्यावर व सुपीक जमिनीवर शेती करणाऱ्या गावकऱ्यांना वाघेरा किल्ल्याचा रस्ता विचारायचा. वाघेरा जलाशयाचा बांध उजवीकडे जिथे वाघेऱ्याच्या सोंडेला चिकटलेला वाटतो, त्या डोंगरधारेवरून गडावर चढाई करायची. घाटाखाली उतरलेल्या गडाच्या उंचच उंच कातळभिंती उजवीकडे ठेवत गडाची माची गाठायची. पाठीवर सामान नसल्यास माची गाठायला एक तास पुरे. माचीवरून वाघेऱ्याचा उंच सुळकेवजा उंचवटा, गडमाथा दिसतो. दहा-एक मिनिटांच्या सोंडेवरील सपाट चालीनंतर गडाच्या सुळकेवजा गडमाथ्याला भिडायचं. इथे पाण्याची कोरडी टाकी आहेत. इथून गडमाथा गाठायला दोन वाटा आहेत. गडमाथा डावीकडे ठेवत वळसा घालून चढणारी निसरडी वाट अथवा सोपं 10 फुटांचं प्रस्तरारोहण करून सरळ वर चढणारी कातळाची वाट. कोणत्याही वाटेने गडाचा सुळकेवजा माथा गाठायचा. तिथे उघड्यावर शिवलिंग आहे. फडकणाऱ्या भगव्या झेंड्याबरोबर गड सर झाल्याबद्दल ग्रुप फोटो काढायचा. अंजनेरी, ब्रह्मगिरी आणि आजुबाजूच्या परिसरावर नजर फिरवायची आणि परतीला लागायचं. वाघेरा गावातून गडमाथा गाठायला आणि स्थलदर्शनासाठी दोन तास पुरे. गडावर पाणी नसल्याने वा सावलीसाठी झाड नसल्याने सोबत आणलेलं पाणी प्यायचं आणि आल्या वाटेने गड उतरायचा. वाघेऱ्यातून घाट उतरून हरसूल गाठायचं. हरसूवरून ओझरखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाणापाडा आहे. ठाणापाड्याला आश्रमशाळेसमोरून खैराई किल्ल्यावर चढाई करायची. निघताना टॉर्च घ्यायला मात्र विसरायचं नाही. खैराई किल्ला फारसा प्रसिद्ध नसलेला, दुर्लक्षित. ट्रेकिंगसंबंधीच्या पुस्तकात त्याचा उल्लेख नाही. नासिकचे हेमंत पोखरणकर यांनी त्याबद्दल माहिती पुरवली म्हणून आम्ही हा किल्ला करू शकलो. आश्रमशाळेसमोरून खैराई माचीवरचा माचीपाडा गाठायला पाऊण तास पुरे. माचीपाड्यातल्या गावकऱ्यांचं आतिथ्य स्वीकारून गड चढायला लागायचं. माचीवर पोहोचल्यावर डौलदार, बहरलेलं शेत आपलं स्वागत करतं. संध्याकाळी ते पिवळं शेत सोनेरी दिसू लागतं. माचीच्या टोकाला गडाजवळ दुतर्फा घरं आहेत. लुसलुशीत कोकरांबरोबर फोटो काढून झाले की गड चढायचा. गडाला बऱ्यापैकी तटबंदी आहे. माचीपाड्याकडला बुरुज नाक्‍यासमोर ठेवून चढत राहायचा. अर्ध्या तासाने आपण एका टेपावर येऊन पोहोचतो. इथून बुरुजाकडे तुटलेल्या तटावरून गडावर प्रवेश करता येतो. अथवा बुरूज व गडमाथा उजव्या अंगाला ठेवून गडमाथ्याला वळसा घालून गडाच्या पश्‍चिमेकडून गडावर सोप्या वाटेने प्रवेश करायचा. खैराईचा गडमाथा छोटेखानीच आहे. पण मनाला प्रसन्न वाटतं. गडावर पाण्याची टाकी आहेत. त्यातलं पाणी पावसाळ्यात पिण्यास हरकत नाही. गडाच्या तटावरून गड-प्रदक्षिणा करता येते. गडावर उघड्या मंदिराकडे दोन लहान तोफा पडलेल्या आहेत. मावळतीच्या रंगात गड फारच सुंदर भासतो. मावळणाऱ्या सूर्याला दंडवत घालून अंधार पडण्यापूर्वी माचीपाडा गाठायचा. माचीपाड्यावरून सोप्या वाटेने आल्याप्रमाणे ठाणापाडा गाठायचं. स्वतःची गाडी सोबत असेल व चालणारे भिडू असतील तर एका दिवसात हे तिन्ही किल्ले पाहून मुक्कामाला त्र्यंबकेश्‍वर वा अंजनेरी गाठता येतं. वाघेरा घाटाच्या खालचा खैराई तांत्रिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यात असला तरी भौगोलिकदृष्ट्या तो ठाणे जिल्ह्यात वाटतो. नाशिक त्र्यंबकेश्‍वरच्या आसपासच्या या किल्ल्यांची सफर आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते.
- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट
yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

No comments: