रुपेरी समुद्रकिनाऱ्यावरील केळशी

दोन दिवसांच्या सहलीसाठी रत्नागिरी जिल्हा व दापोली तालुक्‍यात केळशी नावाचे गाव. नितांतसुंदर, निवांत, खऱ्या रुपेरी वाळूचा समुद्रकिनारा, पुरातन मंदिरे, पेशवेकालीन गावाची रचना, नारळी-पोफळीच्या बागा, सर्वत्र बारमाही हिरवा गालिचा असलेले कोकणातील केळशी हे अत्यंत रमणीय व निवांत आहे. गाव तसे लहान आहे, पण त्या गावाला इतिहास आहे. या गावात छत्रपती श्री शिवाजीमहाराजाच्या चौदा गुरूंपैकी एक गुरू बाबा याकूत यांची श्री संभाजीराजांनी बांधलेली समाधी आहे. पेशवेकालीन श्रीराम मंदिर गावात आहे. गावाच्या दक्षिणेस श्री लक्ष्मीमातेचे जागृत पुरातन मंदिर आहे. गाव टुमदार आहे. मोठमोठ्या दगडी चिरा रचून रस्ते व पावसाच्या पाण्यासाठी नाले तयार केले आहेत. एका बाजूस घरे, बंगले, वाड्या व समुद्राच्या बाजूस पश्‍चिमेस नारळी-पोफळीच्या, फुलांच्या बागा आहेत. गावात हॉटेल, लॉज नाहीत; पण गावातील सधन लोकांनी उत्पन्नाचे साधन म्हणून आपल्या प्रशस्त जागांत खोल्या बांधून पर्यटकांसाठी छान सोय केली आहे. गावात दहा-बारा ठिकाणी घरगुती सामुदायिक व वैयक्तिक राहण्याच्या सोई आहेत. मुबलक पाणी, त्यामुळे स्वच्छता, टापटीप वाखाणण्यासारखी. स्वच्छ परिसर, भरपूर झाडी, फुलझाडे, वेली सर्वत्र, त्यामुळे आपण अनोख्या जगात आल्यासारखे वाटते. प्रदूषणमुक्त वातावरण, सुखद हवा, मंद पानाफुलांचा वास, यामुळे तेथे पोचल्यावर थोड्या वेळातच आपण ताजेतवाने होतो. महत्त्वाचे म्हणजे, राहण्याची व भोजनाची अत्यंत किफायतशीर सोय होते. एका पर्यटकासाठी एक दिवसासाठी राहणे, नाष्टा, दोन वेळा चहा व दोन वेळा जेवण यासाठी 200 रुपये घेतले जातात. ज्येष्ठांना सवलत मिळते. दहा लोकांचा गट असेल तर एका व्यक्तीस सर्व मोफत मिळते. भरपूर गरम पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे व खोल्याही स्वच्छ असतात. प्रत्येक ठिकाणी आपुलकीने लक्ष दिले जाते. गडबडगोंधळ अजिबात नसतो. चहा, नाष्टा दर्जेदार, चविष्ट असतो. भोजन तर खास कोकणी पद्धतीचे असते. वरण, भात, तूप, गरम पोळ्या, उसळ, रस्सा भाजी, पापड, चटणी, लोणचे, कोशिंबीर याचा समावेश असतो. सर्व सात्त्विक आहार असतो. त्यामुळे खरे उदभरण होते. तृप्ती होते. अगदी गोड बोलून आग्रहाने जेवण वाढले जाते. अगदी घरच्यासारखा पाहुणचार होतो. शिवाय आगाऊ सांगितल्यास उकडीचे मोदक दिले जातात. जादा पैसे घेऊन सगळ्या ठिकाणी शाकाहारी जेवण मिळते. नशापाणी करण्यास बंदी असते. मागणी केल्यास मांसाहारी जेवण दिले जाते. त्याची वेगळी सोय केली जाते. अशी गावात दहा-बारा ठिकाणी सोय आहे. गाड्या पार्किंगची सोय आहे. आजूबाजूच्या चांगल्या स्थळांबद्दल माहिती दिली जाते. मार्गदर्शन केले जाते. तेथेच घरगुती कोकणी मेवा विकत मिळतो. ... फणसपोळी, पोह्याचे पापड, आंबापोळी, आंबा पल्प, लोणची इत्यादी. त्यामुळे केळशीच्या सहलीत सर्व गोष्टी मुक्तपणे अनुभवता येतात. सर्व कोकणाची वैशिष्ट्ये अनुभवता येतात. मुंबईहून आपल्या वाहनाने चार तासांचे अंतर. पुण्यातून पाच तासांचे अंतर. स्वतःच्या गाडीने सहल करण्यासाठी सहल नियोजन- मुंबईकडून सहल काढायची असेल तर सकाळी निघून 11 वाजेपर्यंत रायगड दर्शन, जेवण करून चार वाजता निघून सातपर्यंत केळशीस मुक्काम. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील श्रीराम मंदिर दर्शन, नंतर सुंदर समुद्रकिनारा, नंतर श्री शिवाजी महाराजांचे गुरू बाबा याकूत यांच्या समाधीचे (दर्गा) दर्शन. शेवटी श्री लक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन गावातील बाजारपेठेतून एकपर्यंत मुक्कामी परत. जेवण करून विश्रांती घेऊन साडेतीन वाजता चहा घेऊन परतीचा प्रवास. जाता जाता वाळूच्या टेकड्या पाहून परत मुंबईस प्रयाण. पुण्याहून सहल ः पुण्याहून दोन मार्ग आहेत- एक ः सकाळी निघून भोर (वरंधा घाटमार्गे), शिवथर घळ (श्री रामदास स्वामीचे ध्यानस्थळ) पाहून रायगड दर्शन, जेवण करून संध्याकाळी सातपर्यंत केळशी मुक्काम. विश्रांती, जेवण. दुसऱ्या दिवशी केळशी स्थळदर्शन, समुद्रस्नान व जेवण, विश्रांती. दुपारी साडेतीन वाजता निघून वाळूच्या टेकड्या पाहून, लोणेर फाटा, निजामपूर, मानगावमार्गे ताम्हिणी घाटातून मुळशीमार्गे आठ वाजता पुण्यात परत. दुसरा मार्ग ः सकाळी सात वाजता पुण्यातून निघून पौडमार्गे मुळशी धरण पाहून नाष्टा करून पुणे-ताम्हिणी घाटातून प्रवास. ताम्हिणी घाट फारच सुंदर, रमणीय. हिरवी वनश्री, विविध पक्षी, झाडे आहेत. पुढे मुंबई-गोवा मार्गावर येऊन नंतर मानगाववरून पुढे निजामपूर व नंतर लोणेर फाट्यावरून आपण केळशीला दुपारी एक वाजेपर्यंत पोचतो. नंतर जेवण व विश्रांती घेऊन दुपारी साडेतीन वाजता चहा घेऊन स्थळदर्शन. प्रथम श्रीराम मंदिर दर्शन, नंतर बाजारपेठमार्गे श्री लक्ष्मीदेवी दर्शन. तेथून पुढे थोड्या अंतरावर श्री गुरू याकूतबाबा समाधी (दर्गा) दर्शन, तसेच पुढे समुद्रदर्शन. खेळणे, सूर्यास्त पाहणे. नंतर वाड्या-बागांतून मुक्कामी परत येणे. सकाळी लवकर उठून सर्व उरकून तेथून 15 किलोमीटर असलेला कड्यावरच्या गणपती दर्शनास जाणे. जाताना कोकण परिसर, खाडी, टुमदार घरे, पुरातन मंदिरे, मासे बाजार पाहून श्री गणपती दर्शन घेणे. गणपती टेकडीवर आहे. गाडी वरपर्यंत जाते. मंदिर अकराशे वर्षांपूर्वीचे आहे. सुंदर, सुबक मूर्ती असलेले मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. वरून सागराचे, आसमंताचे विहगंम दृश्‍य दिसते. परत येताना निवांत समुद्रकिनारा पाहता येतो. बारा वाजेपर्यंत परत येऊन जेवण, विश्रांती घेऊन दुपारी साडेतीन वाजता निघून वाळूच्या टेकड्या पाहून त्याच मार्गाने पुण्याकडे परत येणे. पुण्यापासून साधारण 200 किलोमीटर अंतर आहे. पावसाळा सोडून सर्व हंगाम (सीझन) सहलीस चांगले असतात.
- शि. बा. गोसावी
साभार ः सकाळ

No comments: