भीमाशंकर!

निसर्गसौंदर्याने नटलेले भीमाशंकर! सदाहरित जंगलामुळे या परिसरात पदभ्रमण करणे हा वेगळाच सुखद अनुभव आहे. पावसाळ्यात तर त्याचे सौंदर्य अधिकच खुलते. हिरव्याकंच पर्णभाराने लगडलेल्या वृक्षांवर गोड कूजन करणारे बुलबुल, फुलाफुलांवर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, आकर्षक रंगांनी मन आकर्षित करून घेणारे तऱ्हेतऱ्हेचे कीटक, या सर्वांचे निरीक्षण करणे हा अद्‌भुत अनुभव असतो. रोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचा उबग आलेल्यांना तर हा परिसर म्हणजे नंदनवनच वाटावा, यात काहीच आश्‍चर्य नाही. पावसाळ्यात धुक्‍याच्या तरल पडद्याआडून हळूच डोकावणारी वृक्षवल्लरी क्षणार्धात शहरी शीण आणि ताणतणाव घालवून टाकते. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच महाराष्ट्रात आहेत. भीमाशंकर त्यापैकीच एक. या संपूर्ण परिसराला लाभलेल्या हिरव्या कोंदणामुळे या पवित्र भूमीला भाविकांबरोबरच निसर्गप्रेमींचाही स्वर्ग म्हणायला हरकत नाही. नागफणी या उंच शिखरावरून आसपासच्या दऱ्याखोऱ्यंचे विहंगम दृश्‍य मनाला भुरळ पाडते. याच क्षेत्रातून भीमा नदीचा उगम होतो आणि आग्नेय दिशेने वाहत ती पुढे कर्नाटकातील रायचूरजवळ कृष्णा नदीत विलीन होते. ही पवित्र देवभूमी आहे आणि भगवान शंकराचा या परिसराला परीसस्पर्श झाला आहे. भीमाशंकराचे मंदिर नगारा शैलीत अठराव्या शतकात बांधण्यात आले आहे. त्याच्या बांधकामावर आर्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. येथे महादेवाचे स्वयंभू लिंग आहे. पेशव्यांचे कारभारी नाना फडणीस यांनी मंदिराचे शिखर बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही या मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी मदत दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. मंदिराच्या कोरीव दगडी खांबांवर पौराणिक देखावे खोदण्यात आले आहेत. मंदिराच्या आवारात शनिमंदिरही आहे. या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख सापडतो. एक आख्यायिका अशी सांगतात, की सह्याद्रीच्या या परिसरात एक दुष्ट राक्षस राहत होता. त्रिपुरासुर किंवा भीम असे त्याचे नाव. त्याच्या मातेचे नाव करकती. भीम आपल्या जीवनातील काही रहस्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता. आपला पिता कोण आणि त्याने आपल्याला वाऱ्यावर का सोडून दिले, असा प्रश्‍न त्याने आपल्या मातेला केला. तेव्हा त्याला समजले की तो कुंभकर्णाचा पुत्र आहे. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या प्रभू रामाने त्याचा वध केला होता. हे रहस्य समजल्यानंतर भीमाने विष्णूचा सूड उगविण्याचा निर्धार केला. त्याने ब्रह्मदेवाच्या प्राप्तीसाठी याच परिसरात तपश्‍चर्या केली. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्याला एका वराद्वारे अमर्याद सामर्थ्य प्रदान केले. मात्र, त्याचा दुष्टपणा एवढा वाढला, की त्याने देवांचा राजा इंद्राचाही पराभव केला. महादेवाचा उपासक कामरूपेश्‍वराचाही त्यानं पराभव करून त्याला पाताळात धाडून दिले. भीमाचा दुष्टपणा वाढत चालल्यामुळे ब्रह्मदेव भगवान शंकराला शरण गेले आणि त्या दुष्टाचा नायनाट करण्याची विनंती केली. भीमाने कामरूपेश्‍वराला शंकराची भक्ती सोडून आपले गुणगान करण्याचा आदेश दिला; परंतु कामरूपेश्‍वराने त्याला तसे करण्यास नकार दिला; त्यामुळे भीमाने शिवलिंग भग्न करण्याच्या उद्देशाने तलवार उपसली. त्याच वेळी भगवान शंकर तेथे प्रकट झाले. त्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. या युद्धामुळे तिन्ही लोक भयभीत झाले. ते पाहून नारदाने युद्ध थांबविण्याची दोघांना विनंती केली. त्यानंतर भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून भीमाची राख केली. त्यानंतर भगवान शंकर त्याच स्वयंभू लिंगात विलीन झाले आणि हे क्षेत्र ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले. पश्‍चिम घाटाच्या पूर्व-पश्‍चिम पसरलेल्या एका रांगेपैकी भीमाशंकरची रांग आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची तीन हजार 250 फूट आहे. येथील जंगलात आंबा, हिरडा, बेहडा, बांबू, औषधी वनस्पती आहेत. घनदाट अरण्यामुळे या प्रदेशात विविध प्रकारचे वन्य जीव वास्तव्यास असतात. बिबट्यांचा येथे मुक्त संचार आहे. त्याचबरोबर रानडुक्कर, भेकर, सांबर, तरस आणि शेकरू (जायंट इंडियन स्क्विरल) ही मोठी खार या अरण्याचे वैशिष्ट्य आहे. मोरांची संख्याही येथे विपुल आहे. पदभ्रमण व गिरिभ्रमण करणाऱ्यांचा तर हा स्वर्गच आहे. या परिसरात तयार झालेल्या पाऊलवाटांनी फिरण्यातच खरी मजा आहे. भाकादेवीचा बंधारा, नागफणीच्या रस्त्यावरील हनुमान तळे, सीतारामबाबांचा मठ आणि हनुमान मंदिर, तेथून काहीशा अवघड वाटेने चढून गेल्यास नागफणी हे भीमाशंकरचे सर्वोच्च शिखर लागते. त्याशिवाय जिल्हा परिषदेचे दोन तलाव येथे आहेत. मुंबई पॉईंट, साक्षी विनायक, कमळजा मंदिर ही आणखी काही रम्य स्थळे. दोन दिवसांच्या सहलीचे नियोजन करून भीमाशंकरला जाता येते. कोकणातून कल्याणमार्गे आणि पुण्याहून मंचरमार्गे येथे पोचता येते. पुण्याहून भीमाशंकर 110 किलोमीटर आहे. बस किंवा मोटारीने येथे येणे सोपे आहे. पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातून नियमितपणे एसटीच्या बस सुटतात. नारायणगाव किंवा मंचरपर्यंत येऊनही तेथे दुसरी बस मिळू शकते. पुणे हा जवळचा विमानतळ आहे. मुंबईहूनही तेथे जाता येते. मुंबईहून बस किंवा लोकलने कर्जतपर्यंत यावे व तेथून खांडसची (सुमारे 40 किलोमीटर) बस पकडावी. सुमारे चार ते साडेचार तासांच्या प्रवासानंतर भीमाशंकरला पोचता येते. भीमाशंकरला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासस्थान आहे. त्याचे आरक्षण मुंबई किंवा पुण्यातून करता येते. भीमाशंकरच्या अलीकडे ब्लू मॉरमॉन आणि अन्य काही हॉटेलेही आहेत. तेथेही दूरध्वनी करून आरक्षण करता येते. सुटीच्या आणि महाशिवरात्रीसारख्या सणांच्या दिवशी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे सुटी व सणाचे दिवस वगळून येथे आल्यास येथील निसर्गसौंदर्याचा लाभ घेता येईल. येथील किंवा अन्य कोणत्याही जंगलात काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा येथे वापर टाळावा. वापरल्यास कोठेही फेकून देऊ नयेत. मोठ्या आवाजात बोलू नये, रेडिओ, टेप बंद ठेवावेत, चालताना झाडांच्या फांद्या तोडू नयेत, बिळांमध्ये काठ्या खुपसून आतील वन्य जीवांना त्रास देऊ नये. कोणत्याही ऋतूमध्ये येथे येता येईल.

2 comments:

विजयकुमार भवारी said...

khare tar bhimashankar jawalch maze gav aahe mala mahit nasleli mahiti milali dhanyawad !

Anonymous said...

shivbhaktani ekda tari bhhimashankarla javech tasech nisarga premini sudha
vijay amrutkar
9870142670