निसर्गरम्य तळजाई दर्शन

पुणे शहरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. परंतु त्याचप्रमाणे शहराच्या उपनगरांतही काही मंदिरे आहेत. सातारा रस्त्यावर असणारे तळजाई मातेचे मंदिर अशापैकीच एक; परंतु या मंदिराचा सातारा रस्त्यापेक्षाही जास्त जवळचा संबंध आहे तो "सिंहगड रस्त्याशी.' कारण सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द गावात कॅनॉललगत असणाऱ्या टेकड्यांवरून हे मंदिर सहज गाठता येते. या भागात घनदाट जंगल पसरले असून, या जंगलातून सफर करणे अप्रतिम अनुभव देते. वन विभागाने जाहीर केलेले हे संरक्षित वनक्षेत्र व पर्यटनस्थळ अजूनही सिंहगड रस्त्यावरील असंख्य पर्यटकांना माहिती नाही. सिं हगड, पानशेत, खडकवासला, यांसारखी अनेक पर्यटन स्थळे पुणेकरांच्या चांगलीच परिचयाची आहेत. परंतु घनदाट जंगलराजीत वसलेले व शहरापासून अगदीच जवळ असणारे प्राचीन तळजाई मातेचे मंदिर फारसे परिचयाचे नसावे. पुणेकरांना हे जवळचे आहेच आणि त्यातही सिंहगड रस्तावासीयांसाठी "रोजच्या मॉर्निंग वॉक'चे एक प्रशस्त व निसर्गरम्य स्थानही आहे. सिंहगड रस्त्यावरील हिंगणे गावातील कॅनॉल पार करून गेले की दृष्टीस पडते ती पर्वती पाचगाव वनक्षेत्राची अफाट डोंगररांग, हिरवे गालिचे पांघरलेली ही डोंगररांग मन मोहून टाकते. या डोंगरांपैकी कुठलाही डोंगर चढून गेले, की सुरू होते हिरवीगर्द वनराई. या वनराईतून मार्गक्रमण करताना विविध दुर्मिळ वृक्षांचेही दर्शन होते. करवंदांच्या जाळ्या मध्येच डोकावत असतात. उन्हाळ्यात बहरलेला गुलमोहर लक्ष वेधून घेतो. याशिवाय विविध वृक्षांच्या असंख्य प्रजाती या वनक्षेत्रात वन विभागाने जाणीवपूर्वक वाढवलेल्या आहेत. आपल्यासारख्या सामान्य पर्यटकाला त्या वृक्षांची माहिती नसते इतकंच. रानफुलांच्या असंख्य प्रजाती, निलगिरीचे उंचच्या उंच झुळके, कडुलिंबाची शीतल छाया, कांचनवृक्ष असे कितीतरी वृक्षप्रकार येथे पाहावयास मिळतात. वृक्षप्रेमींना संशोधनासाठी हेही एक चांगले ठिकाण असू शकते. डोंगर चढून गेल्यावर नजर पोचेल तिथपर्यंत दिसणाऱ्या पुणे शहराच्या पश्‍चिम उपनगरांतील उंच इमारती ठेंगण्या दिसतात आणि वाढत्या शहरीकरणाचे चित्र उभे करतात. परंतु याचबरोबर डोंगराच्या मागे वसलेली पर्वती पाचगावची वनराई निसर्गाचे खरे चित्र उभे करते आणि ते या इमारतींच्या चित्रापेक्षा कितीतरी आल्हाददायक वाटते. सिंहगड रस्तावासीयांना हे ठिकाण तर रोजच्या मॉर्निंग वॉकसाठी अगदी जवळचे आहे. या ठिकाणी अनेक लोक सकाळच्या मोकळ्या प्रसन्न हवेत प्रभातफेरीला येतात, मनसोक्त विहार करतात, व्यायाम करतात व "फ्रेश' होऊन दिवसभराच्या "रुटीनशी' झुंजण्यास सज्ज होतात. सकाळी सात वाजता जरी डोंगर चढायला सुरवात केली, तर पाऊण तासात तळजाईपर्यंत पोचता येते व परतीला तेवढाच वेळ लागतो. पक्ष्यांचा राजा "मोर' हे या वनक्षेत्राचे खास आकर्षण आहे. वनविहार करताना मोरांचे दर्शन हमखास होतेच. मोरांसाठी ठिकठिकाणी धान्य पाणी यांची व्यवस्था आहे. जंगलात थोडेसे आतमध्ये गेल्यास क्वचित "ससे'ही दिसतात. याशिवाय असंख्य पक्ष्यांच्या प्रजाती येथे नजरेस पडतात. वन्यप्राणी मात्र अद्याप तरी येथे दिसलेला नाही. वनक्षेत्रातून फिरत फिरत केव्हा तळजाईचे मंदिर येते कळतही नाही. निसर्गाच्या हिरव्या कुशीत वसलेले तळजाई मातेचे हे मंदिर एक अद्‌भुत अनुभव देते. पालिकेने तळजाई पठारावर क्रीडा संकुलही बांधले आहे. तळजाई मंदिराच्या मागे पवित्र "तळे' असून, त्यावरूनच या देवीला तळजाई असे संबोधले जाते. मंदिराचे व्यवस्थापन थोरात कुटुंबीयांमार्फत पाहिले जाते. तळजाई, वाघजाई आणि पर्वतीपर्यंत पसरलेली ही हिरवीगार वनराई आपल्याला निसर्गाच्या अगदी जवळ नेऊन ठेवते. आपली नेहमीची पर्यटनस्थळे बाजूला ठेवून थोडीशी वाट वाकडी केली, तर तळजाईची वनराई आपल्याला अविस्मरणीय अनुभव देईल हे नक्की.

No comments: