दोन दिवसांच्या सहलीसाठी रत्नागिरी जिल्हा व दापोली तालुक्यात केळशी नावाचे गाव. नितांतसुंदर, निवांत, खऱ्या रुपेरी वाळूचा समुद्रकिनारा, पुरातन मंदिरे, पेशवेकालीन गावाची रचना, नारळी-पोफळीच्या बागा, सर्वत्र बारमाही हिरवा गालिचा असलेले कोकणातील केळशी हे अत्यंत रमणीय व निवांत आहे. गाव तसे लहान आहे, पण त्या गावाला इतिहास आहे. या गावात छत्रपती श्री शिवाजीमहाराजाच्या चौदा गुरूंपैकी एक गुरू बाबा याकूत यांची श्री संभाजीराजांनी बांधलेली समाधी आहे. पेशवेकालीन श्रीराम मंदिर गावात आहे. गावाच्या दक्षिणेस श्री लक्ष्मीमातेचे जागृत पुरातन मंदिर आहे. गाव टुमदार आहे. मोठमोठ्या दगडी चिरा रचून रस्ते व पावसाच्या पाण्यासाठी नाले तयार केले आहेत. एका बाजूस घरे, बंगले, वाड्या व समुद्राच्या बाजूस पश्चिमेस नारळी-पोफळीच्या, फुलांच्या बागा आहेत. गावात हॉटेल, लॉज नाहीत; पण गावातील सधन लोकांनी उत्पन्नाचे साधन म्हणून आपल्या प्रशस्त जागांत खोल्या बांधून पर्यटकांसाठी छान सोय केली आहे. गावात दहा-बारा ठिकाणी घरगुती सामुदायिक व वैयक्तिक राहण्याच्या सोई आहेत. मुबलक पाणी, त्यामुळे स्वच्छता, टापटीप वाखाणण्यासारखी. स्वच्छ परिसर, भरपूर झाडी, फुलझाडे, वेली सर्वत्र, त्यामुळे आपण अनोख्या जगात आल्यासारखे वाटते. प्रदूषणमुक्त वातावरण, सुखद हवा, मंद पानाफुलांचा वास, यामुळे तेथे पोचल्यावर थोड्या वेळातच आपण ताजेतवाने होतो. महत्त्वाचे म्हणजे, राहण्याची व भोजनाची अत्यंत किफायतशीर सोय होते. एका पर्यटकासाठी एक दिवसासाठी राहणे, नाष्टा, दोन वेळा चहा व दोन वेळा जेवण यासाठी 200 रुपये घेतले जातात. ज्येष्ठांना सवलत मिळते. दहा लोकांचा गट असेल तर एका व्यक्तीस सर्व मोफत मिळते. भरपूर गरम पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे व खोल्याही स्वच्छ असतात. प्रत्येक ठिकाणी आपुलकीने लक्ष दिले जाते. गडबडगोंधळ अजिबात नसतो. चहा, नाष्टा दर्जेदार, चविष्ट असतो. भोजन तर खास कोकणी पद्धतीचे असते. वरण, भात, तूप, गरम पोळ्या, उसळ, रस्सा भाजी, पापड, चटणी, लोणचे, कोशिंबीर याचा समावेश असतो. सर्व सात्त्विक आहार असतो. त्यामुळे खरे उदभरण होते. तृप्ती होते. अगदी गोड बोलून आग्रहाने जेवण वाढले जाते. अगदी घरच्यासारखा पाहुणचार होतो. शिवाय आगाऊ सांगितल्यास उकडीचे मोदक दिले जातात. जादा पैसे घेऊन सगळ्या ठिकाणी शाकाहारी जेवण मिळते. नशापाणी करण्यास बंदी असते. मागणी केल्यास मांसाहारी जेवण दिले जाते. त्याची वेगळी सोय केली जाते. अशी गावात दहा-बारा ठिकाणी सोय आहे. गाड्या पार्किंगची सोय आहे. आजूबाजूच्या चांगल्या स्थळांबद्दल माहिती दिली जाते. मार्गदर्शन केले जाते. तेथेच घरगुती कोकणी मेवा विकत मिळतो. ... फणसपोळी, पोह्याचे पापड, आंबापोळी, आंबा पल्प, लोणची इत्यादी. त्यामुळे केळशीच्या सहलीत सर्व गोष्टी मुक्तपणे अनुभवता येतात. सर्व कोकणाची वैशिष्ट्ये अनुभवता येतात. मुंबईहून आपल्या वाहनाने चार तासांचे अंतर. पुण्यातून पाच तासांचे अंतर. स्वतःच्या गाडीने सहल करण्यासाठी सहल नियोजन- मुंबईकडून सहल काढायची असेल तर सकाळी निघून 11 वाजेपर्यंत रायगड दर्शन, जेवण करून चार वाजता निघून सातपर्यंत केळशीस मुक्काम. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील श्रीराम मंदिर दर्शन, नंतर सुंदर समुद्रकिनारा, नंतर श्री शिवाजी महाराजांचे गुरू बाबा याकूत यांच्या समाधीचे (दर्गा) दर्शन. शेवटी श्री लक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन गावातील बाजारपेठेतून एकपर्यंत मुक्कामी परत. जेवण करून विश्रांती घेऊन साडेतीन वाजता चहा घेऊन परतीचा प्रवास. जाता जाता वाळूच्या टेकड्या पाहून परत मुंबईस प्रयाण. पुण्याहून सहल ः पुण्याहून दोन मार्ग आहेत- एक ः सकाळी निघून भोर (वरंधा घाटमार्गे), शिवथर घळ (श्री रामदास स्वामीचे ध्यानस्थळ) पाहून रायगड दर्शन, जेवण करून संध्याकाळी सातपर्यंत केळशी मुक्काम. विश्रांती, जेवण. दुसऱ्या दिवशी केळशी स्थळदर्शन, समुद्रस्नान व जेवण, विश्रांती. दुपारी साडेतीन वाजता निघून वाळूच्या टेकड्या पाहून, लोणेर फाटा, निजामपूर, मानगावमार्गे ताम्हिणी घाटातून मुळशीमार्गे आठ वाजता पुण्यात परत. दुसरा मार्ग ः सकाळी सात वाजता पुण्यातून निघून पौडमार्गे मुळशी धरण पाहून नाष्टा करून पुणे-ताम्हिणी घाटातून प्रवास. ताम्हिणी घाट फारच सुंदर, रमणीय. हिरवी वनश्री, विविध पक्षी, झाडे आहेत. पुढे मुंबई-गोवा मार्गावर येऊन नंतर मानगाववरून पुढे निजामपूर व नंतर लोणेर फाट्यावरून आपण केळशीला दुपारी एक वाजेपर्यंत पोचतो. नंतर जेवण व विश्रांती घेऊन दुपारी साडेतीन वाजता चहा घेऊन स्थळदर्शन. प्रथम श्रीराम मंदिर दर्शन, नंतर बाजारपेठमार्गे श्री लक्ष्मीदेवी दर्शन. तेथून पुढे थोड्या अंतरावर श्री गुरू याकूतबाबा समाधी (दर्गा) दर्शन, तसेच पुढे समुद्रदर्शन. खेळणे, सूर्यास्त पाहणे. नंतर वाड्या-बागांतून मुक्कामी परत येणे. सकाळी लवकर उठून सर्व उरकून तेथून 15 किलोमीटर असलेला कड्यावरच्या गणपती दर्शनास जाणे. जाताना कोकण परिसर, खाडी, टुमदार घरे, पुरातन मंदिरे, मासे बाजार पाहून श्री गणपती दर्शन घेणे. गणपती टेकडीवर आहे. गाडी वरपर्यंत जाते. मंदिर अकराशे वर्षांपूर्वीचे आहे. सुंदर, सुबक मूर्ती असलेले मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. वरून सागराचे, आसमंताचे विहगंम दृश्य दिसते. परत येताना निवांत समुद्रकिनारा पाहता येतो. बारा वाजेपर्यंत परत येऊन जेवण, विश्रांती घेऊन दुपारी साडेतीन वाजता निघून वाळूच्या टेकड्या पाहून त्याच मार्गाने पुण्याकडे परत येणे. पुण्यापासून साधारण 200 किलोमीटर अंतर आहे. पावसाळा सोडून सर्व हंगाम (सीझन) सहलीस चांगले असतात.
- शि. बा. गोसावी
साभार ः सकाळ
मला फिरायला आवडत नाही, असं सांगणारा मनुष्य सापडणं तसं कठीणच. इंटरनेटवर इंग्रजी भाषेत पर्यटनावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. वेबसाईट्सही आहेत. पण माझ्या माहितीनुसार (कारण नेमकं माहीत नाही) मराठीत इंटरनेटवर उपलब्ध असणारी माहिती अगदीच अत्यल्प आहे. त्यामुळं "भटक्यांना' मराठीतही अशी माहिती सहज उपलब्ध व्हावी या हेतूने हे भारतातल्या प्रेक्षणीय स्थळांचं संकलन...
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे, पावस, गणेशगुळे, माचाळ, मार्लेश्वर, काळबादेवी, पालगड, मुरूड, मंडणगड, आयनी-मेटे अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोव्यातून राष्ट्रीय महामार्गमार्गे सिंधुदुर्ग जिल्हा ओलांडला की खारेपाटणपासून रत्नागिरी जिल्ह्यास सुरवात होते. पहिले गाव लागते राजापूर. एकेकाळचे प्रसिद्ध बंदर, राजापूरहून तीस किलोमीटरवर डावीकडे आडिवरे येथे श्री महाकालीचे पुरातन मंदिर आहे. आडिवरे येथे शिलाहार राजाची सत्ता असताना भरभराटीस आलेली बाजारपेठ होती. राजापूरजवळ श्री धूतपापेश्वराचे मंदिर नदीकिनारी आहे. राजापूरपासून पाच किलोमीटरवर गंगातीर्थ आहे. राजापूरची गंगा म्हणून ते ठिकाण प्रसिद्ध असले तरी तेथे पाणी असल्याची खात्री करूनच भेट द्यावी. पुढे गेल्यावर हातखंबा येथून डावीकडे वळल्यावर रत्नागिरी लागते. रेल्वेने रत्नागिरीस जावयाचे असल्यास रेल्वेस्थानक शहराबाहेर 13 किलोमीटरवर आहे हे आधी लक्षात घ्यावे. तेथून रिक्षा करून रत्नागिरी गाठावी लागते. रत्नागिरीपासून 15 किलोमीटरवर पावस आहे. हे गाव स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्याने पुनीत होऊन तीर्थक्षेत्र बनले आहे. तेथे स्वामींची समाधी व सुंदर मंदिर आहे. पावसला जाताना भाट्याच्या खाडीवरील राजिवडा बंदर ओलांडून जावे लागते. भाटये येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे नारळ संशोधन केंद्र आहे. तेथे नारळाची रोपेही विकत मिळतात. शिवरायांच्या आरमारातील शूर सेनानी मामाजी भाटकर भाट्ये येथीलच. त्यांची समाधी तेथे आहे. पावसला जाण्यासाठी लांजा येथूनही मार्ग आहे, पण तो अरुंद. रत्नागिरीत लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आहे. हे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्यात आले आहे. श्रीमती इंदिराबाई गोरे यांचा हा वाडा आता टिळक स्मारक म्हणून ओळखला जातो. रत्नागिरीतच प्रसिद्ध थिबा पॅलेसही आहे. ब्रिटिशांनी 1910-11 मध्ये ही वास्तू उभारली. तेथे आता वस्तूसंग्रहालय आहे, तसेच बाजूला असलेला थिबा पॉइंटही चांगला आहे. रत्नागिरीच्या भगवती किल्ल्यावर जाता येते, तेथे दिवसा जाणे कधीही चांगले. किल्ल्यात शिवकालीन भगवतीचे मंदिर आहे. रत्नदुर्गाच्या पायथ्याशी दक्षिणेला किनारा काळ्या वाळूचा असल्याने त्याला काळा समुद्र तर उत्तरेकडील समुद्राला पांढरा समुद्र असे म्हणतात. या किल्ल्याच्या पायथ्याशी भागोजीशेठ कीर यांनी बांधलेले श्री भागेश्वर मंदिर आहे. या शिवमंदिरातील खांबांवर पशुपक्ष्यांची सुंदर निसर्गचित्रे कोरलेली आहेत. अथांग समुद्रकिनारा, निसर्गसंपन्न परिसर आणि प्राचीन गणेशमंदिर. पावसजवळचे गणेशगुळे आकर्षक आहे. रत्नागिरीहून पन्नास किलोमीटरवर गणपतीपुळे आहे, रत्नागिरीहून झाडगावमार्गे गणपतीपुळे येथे जाताना वाटेत मत्स्य महाविद्यालय लागते. गणपतीपुळेला गणपतीचे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी असून समोर अथांग सागर व पांढऱ्या वाळूचा विस्तीर्ण किनारा पसरलेला आहे. या देवस्थानचा इतिहास 1600 पासूनचा आहे. सांगलीच्या पटवर्धन संस्थानिकांचे हे कुलदैवत. छत्रपती शिवाजी महाराज ते पेशवाईपर्यंतचा इतिहास या मंदिराशी निगडित आहे. देवालयाचा गाभारा छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सचिव अण्णाजी दत्तो यांनी, सभामंडप व मंदिराभोवतालची दगडी पाखाडी सरदार गोविंदपंत बुंदेले यांनी तर आवारातील धर्मशाळा रमाबाई पेशवे यांनी बांधलेली आहे. नंदादीप नानासाहेब पेशवे यांनी तर नगारखाना चिमाजी अप्पा यांनी बांधला आहे. गणपतीपुळेला जाण्यासाठी पणजीहून कदंब व एसटीच्या बसेस आहेत. गणपतीपुळेच्या शेजारी मालगुंड असून ते कवी केशवसुतांचे गाव. त्यांचे वस्तुसंग्रहालय वजा स्मारक पाहण्यासारखे आहे. पुढे चिपळूणच्या दिशेने जाताना वाटेत संगमेश्वर लागते. त्याच रस्त्यावर आरवली व तुरळ येथे गरम पाण्याचे झरे रस्त्यालगतच आहेत. या पाण्याला गंधकाचा वास येतो. त्वचारोग बरे करण्यासाठी तेथे स्नान करण्यासाठी अनेकजण थांबत असतात. संगमेश्वरजवळील कसबा येथे चालुक्य घराण्यातील कर्ण राजाने बांधलेले श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी पुरातन मंदिर आहे. तेथे सरदेसायांचा मोठा वाडा असून या वाड्यात छत्रपती संभाजीराजे असताना त्यांच्यावर औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने अचानक हल्ला करून अटक केली होती. या ठिकाणी संभाजी राजांचा स्मारक स्तंभ आहे. संगमेश्वरहून चिपळूणकडे जाताना डावीकडे श्री क्षेत्र मार्लेश्वर आहे. देवरूखपासून 15 किलोमीटरवर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात निसर्गरम्य ठिकाणी वसलेले शंकराचे हे देवस्थान पाहण्याजोगे आहे. उंच डोंगराला वळसा घालून गेल्यावर एका गुहेत हे स्वयंभू देवस्थान आहे. या डोंगरावर मोठा धबधबा आहे. देवस्थानपर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. कशेळीचा कनकादित्य रत्नागिरी, पावस, गणपतीपुळे ही सारी ठिकाणं पर्यटकांच्या परिचयाची. पण इथून जवळच आहे, एक आगळं-वेगळं ठिकाण. त्याचं नाव आहे कशेळी. (मंडणगड जवळचं केळशी नव्हे) महाराष्ट्रात एकेकाळी सौरसंप्रदाय पसरला होता. परंतु सूर्याची फारशी मंदिरं आजमितीस अस्तित्वात नाहीत. पण कोकणात काही सूर्यमंदिरे आहेत. आरवली, आंबव, नेवरे, कशेळी अशा काही गावांमध्ये ही सूर्यमंदिरे आहेत. कशेळीचा कनकादित्य हे आवर्जून भेट देण्याजोगं ठिकाण निश्चित आहे. रत्नागिरीपासून 22 कि.मी. आणि राजापूरपासूनही 22 कि.मी. अंतरावर कशेळी हे छोटं गाव आहे. रत्नागिरी-भाट्ये-पावस-पूर्णगड-कशेळी असा हा उत्तम रस्ता आहे. या टुमदार गावाला विस्तीर्ण असा सागरकिनारा लाभला आहे. तिथला डोंगरकडा अन् केवड्याचं बन केवळ अनुभवण्याजोगं. सुमारे 800 वर्षे नांदतं, असं श्री कनकादित्याचं मंदिर गावात उभं आहे. चहूबाजूंना आंबा-फणस-नारळी-पोफळीची दाटी आहे. त्यातच धनेश म्हणजे हॉर्नबिल हा पक्षी हमखास पाहायला मिळतो. मंदिराच्या आवारातच श्री गणपती, श्री शंकर, श्री आर्यादुर्गादेवी, श्री विष्णू अशी चार मंदिरे आहेत. म्हणजे हे सूर्यपंचायतन आहे. शिवाय एक मारुती मंदिरही आहे. पन्हाळगडच्या शिलाहार राजाने आषाढ शुद्ध चतुर्थी शके 1113 म्हणजे 27 जून 1191 रोजी गोविंदभट्ट भागवत यांना कशेळी गाव इनाम दिला. तसा ताम्रपट करून दिला. आजही हा तीन ताम्रपृष्ठांचा काही किलो वजनाचा ताम्रपट मंदिरात उपलब्ध आहे. मुंबईच्या नाना शंकरशेठ यांनी मंदिराचा सभामंडप बांधून दिला आहे. प्रख्यात इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर, थोर साहित्यिक वि. सी. गुर्जर, थिऑसॉफीचे भाष्यकार राजाराम सखाराम भागवत आदी अनेक मंडळींचं कशेळी हे जन्मस्थान. इथे मुक्काम करण्यासंदर्भात भास्कर नारायण भागवत, मुख्य विश्वस्त श्री कनकादित्य मंदिर, कशेळी यांच्याशी संपर्क साधावा, दूरध ्वनी- 02353- 226317 किंवा रमेश पांडुरंग ओळकर 02353-226323 हे दूरध्वनी क्रमांक त्यासाठी उपयुक्त ठरतील. कशेळी गावातच श्री लक्ष्मी केशवाचे मंदिर आवर्जून भेट देण्याजोगे आहे. इथून जवळच वेत्ये गावचा विलोभनीय समुद्रकिनारा डोळ्यांचे पारणेच फेडतो. आडिवरे येथील देवीच्या महाकालीची मूर्ती येथेच सापडली. कशेळीच्याच भेटीत राजापूरमधील अनेक ठिकाणांनाही भेट देता येते. चिपळूणहून खेडला जाताना परशुराम हे गाव लागते. सहाशे वर्षांपूर्वीच्या श्री परशुराम मंदिराची, आदिलशाही विजापूरकर वैभवाची वास्तू तेथे आहे. परशुराम, काम व काळ या अनुक्रमे विष्णू, ब्रह्मदेव व शंकराचा अवतार असलेल्या काळ्या पाषाणाच्या मूर्ती मंदिरात आहेत. परशुरामात प्राचीनकाळी घरोघरी पाणी पोचविण्याची पाटवजा व्यवस्था होती. तिचे अवशेष आजही पाहायला मिळतात. परशुराम घाटात पावसाळ्यात सवत कडा हा धबधबाही दिसतो. खेडहून पुढे दापोलीला जाता येते. दापोलीत पाहण्यासाठी जवळपास 62 पर्यटनस्थळे आहेत. आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती आणि दुर्गादेवीचं मंदिर अनेकांच्या परिचयाचं. बकुळ वृक्षांच्या गराड्यात असलेलं श्री गणेश मंदिर आणि तेथून हर्णे-मुरूडच्या किनाऱ्यावरील सुवर्णदुर्ग-कनकदुर्ग-फत्तेगड आणि गोवा किल्ला ही दुर्गचौकडी व्यवस्थित न्याहाळता येते. आंजर्ले येथील मुक्कामासाठी माधव हरी साठ्ये, श्री स्वामी समर्थ निवास, उभाघर आंजर्ले, ता. दापोली, जि. रत्नागिरी यांच्याशी 02358 - 234229 यांच्याशी संपर्क साधावा. आंजर्ले-केळशी रस्त्यावर आडे-पडले गाव आहे. इथे पुलाजवळ श्रीभार्गवरामाचं म्हणजे श्री परशुरामाचं देखणं मंदिर आहे. शिवाय श्री बेलेश्वराचंही मंदिर आहे. आंजर्ले इथे मुक्काम करून हर्णे - मुरूड (अण्णासाहेब ऊर्फ भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव) आसूदचा श्री व्याघ्रेश्वर आणि श्री केशवराज, दापोली- लोकमान्य टिळकांचं मूळ गाव, चिखलगाव दाभोळ-कोळथरे-पंचनदी- पन्हाळे लेणी अशी अनेक ठिकाणं पाहून दिवसभरात परत येता येतं. मंडणगड येथील अप्पा घैसासांच्या संतोष हॉटेलमधील (02350-225207) थालिपीठ, अळिवाचे लाडू आणि अप्रतिम कोकम सरबत चाखून पाहायला विसरू नकाच. दापोलीपासून नऊ किलोमीटरवर मुरूड हे महर्षी कर्वे यांचे जन्मगाव. नारळ-पोफळीच्या बागा, कौलारू घरे, सारवलेली अंगणे पाहत पाहत आपण स रळ समुद्रावरच पोचतो व तो विशाल सागर आपल्याला खिळवूनच ठेवतो. याच सागराच्या सान्निध्यात व अगदी नारळाच्या बागेत एक साधे पण सुंदर रिसॉर्ट आहे... श्री. सुरेश बाळ यांचे "मुरूड बीच रिसॉर्ट'. येथे गरमागरम उकडीचे मोदक, आंबोळी, थालीपीठ यासारखे कोकणी पदार्थ आधी कळवल्यास बनवतात. तसेच त्यांच्याकडे पोहा पापड, आमसुले, आंबापोळी, फणसपोळी इ. पदार्थ मागणीनुसार उपलब्ध असतात. शिवाय त्यांच्या बागेत जायफळ, लवंगा, काळी मिरी इत्यादी झाडेही पाहायला मिळतात. मुरूडच्या किनाऱ्यावरून सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग व हर्णैचा दीपस्तंभही दिसून येतो. मुरूड गावात दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या खांबांवर नक्षीकाम केलेले आहे, तर पुढील बाजूस नगारखाना व दगडी दीपमाळ आहे. दाभोळहून होडीने किंवा फेरीबोटीने खाडी पार करून गुहागर, हेदवी व वेळणेश्वर अशा पर्यटनस्थानांची ओळख करून घेता येते. ही फेरीबोट दुचाकी, चारचाकी वाहने व माणसे यांना वाहून नेते व ही सेवा वाजवी दरात सतत उपलब्ध असते. तसेच मुरूडच्या किनाऱ्यावर राहून पर्यटक रायगड किल्ला, चिपळूणजवळील परशुराम मंदिर, दिवेआगर येथील सोन्याचा गणपती इत्यादी ठिकाणे पाहून परत येऊ शकतो. आसूदच्या रस्त्यानेच पुढे गेल्यावर व्याघ्रेश्वर मंदिर लागते. हे मंदिर 800 वर्षे जुने आहे. आसूद गावातून वाहणाऱ्या ओढ्याच्या काठी असलेल्या या मंदिराला चारही बाजूंनी सुमारे पाच फूट उंचीची दगडी भिंत आहे. आतल्या लाकडी खांबांवर दशावतार कोरलेले आहेत. मुरुड आसूद पुलापाशी डावीकडे वळल्यानंतर मुरुड गाव लागते. इथेच दुर्गादेवीचे मंदिर आहे. या मंदिराजवळचा रस्ता थेट समुद्रकिनारी जातो. कर्देमुरुड गावाकडे जाताना डावीकडे कर्दे इथला निसर्गरम्य समुद्रकिनारा लागतो. हा समुद्रकिनारा बराच प्रसिद्ध आहे. थंडीच्या मोसमात हर्णे, मुरुड, कर्दे परिसरात बरेचसे स्थलांतरित पक्षी येतात., त्यामुळे हे ठिकाण बघण्यासारखे आहे.
राहण्याची व्यवस्था ः
1) हॉटेल सफारी एशिया- रत्नागिरी- (02352) २२१७६०
2) हॉटेल विवेक- रत्नागिरी- (02352) २२२१६२
3) हॉटेल अल्फा- रत्नागिरी- (02352) २२२३५७
4) हॉटेल प्रभा- रत्नागिरी- (02352) २२३५१५
5) स्वरूप लॉज- रत्नागिरी- (02352) २२०५८५
6) कोहिनूर बीच रिसॉर्ट- रत्नागिरी (02352) 235231, ३२
7) हॉटेल लॅण्डमार्क- रत्नागिरी - (02352) २२०१२०
8) मातृछाया निवास- गणपतीपुळे- (02357) २३५२९१
9) अभिषेक बीच रिसॉर्ट- गणपतीपुळे- (02357) २३५३२७
10) गोकूळ लॉज- गणपतीपुळे- (02357) २३५०३१
11) हॉटेल श्रीसागर- गणपतीपुळे- (02357) २३५१४५
12) किस्मत रेसिडेन्सी बीच रिसॉर्ट- गुहागर- (02359)
13) हॉटेल कौटिल्य लॉज- गुहागर- (02359)
14) कुंटे हिल रिसॉर्ट ऍण्ड फार्म हाउस- कोळंबे, संगमेश्वर-
15) हॉटेल पार्वती पॅलेस- देवरुख- (02354)
16) बीच रिसॉर्ट सिल्व्हर सॅण्ड- दापोली- (02358)
17) रूपा लॉज- खेड- (02356)
18) सीता- चिपळूण- (02355) 252244,
अंतर ः
पणजी ते रत्नागिरी 240 कि.मी।
लांजा ते रत्नागिरी 70ं कि.मी
लांजा ते रत्नागिरी आडिवरेमार्गे 64 कि. मी
हातखंबा गणपतीपुळे नेवरेमार्गे 37 कि. मी
हातखंबा गणपतीपुळे निवळीमार्गे 47 कि. मी
रत्नागिरी संगमेश्वर 45 कि. मी
संगमेश्वर देवरूख 15 कि. मी
साखरपा देवरूख 15 कि. मी
साखरपा कोल्हापूर 80 कि. मी
संगमेश्वर चिपळूण 45 कि. मी
चिपळूण दापोली 72 कि. मी
चिपळूण गुहागर 45 कि. मी
चिपळूण खेड 36 कि. मी
दापोली मंगणगड 42 कि. मी
रत्नागिरी ते पावस 15 कि.मी
देवरूख ते मार्लेश्वर 15 कि.मी
रत्नागिरी ते कशेळी 22 कि.मी
मुरूड ते आंजर्ले 5 कि.मी.
राहण्याची व्यवस्था ः
1) हॉटेल सफारी एशिया- रत्नागिरी- (02352) २२१७६०
2) हॉटेल विवेक- रत्नागिरी- (02352) २२२१६२
3) हॉटेल अल्फा- रत्नागिरी- (02352) २२२३५७
4) हॉटेल प्रभा- रत्नागिरी- (02352) २२३५१५
5) स्वरूप लॉज- रत्नागिरी- (02352) २२०५८५
6) कोहिनूर बीच रिसॉर्ट- रत्नागिरी (02352) 235231, ३२
7) हॉटेल लॅण्डमार्क- रत्नागिरी - (02352) २२०१२०
8) मातृछाया निवास- गणपतीपुळे- (02357) २३५२९१
9) अभिषेक बीच रिसॉर्ट- गणपतीपुळे- (02357) २३५३२७
10) गोकूळ लॉज- गणपतीपुळे- (02357) २३५०३१
11) हॉटेल श्रीसागर- गणपतीपुळे- (02357) २३५१४५
12) किस्मत रेसिडेन्सी बीच रिसॉर्ट- गुहागर- (02359)
13) हॉटेल कौटिल्य लॉज- गुहागर- (02359)
14) कुंटे हिल रिसॉर्ट ऍण्ड फार्म हाउस- कोळंबे, संगमेश्वर-
15) हॉटेल पार्वती पॅलेस- देवरुख- (02354)
16) बीच रिसॉर्ट सिल्व्हर सॅण्ड- दापोली- (02358)
17) रूपा लॉज- खेड- (02356)
18) सीता- चिपळूण- (02355) 252244,
अंतर ः
पणजी ते रत्नागिरी 240 कि.मी।
लांजा ते रत्नागिरी 70ं कि.मी
लांजा ते रत्नागिरी आडिवरेमार्गे 64 कि. मी
हातखंबा गणपतीपुळे नेवरेमार्गे 37 कि. मी
हातखंबा गणपतीपुळे निवळीमार्गे 47 कि. मी
रत्नागिरी संगमेश्वर 45 कि. मी
संगमेश्वर देवरूख 15 कि. मी
साखरपा देवरूख 15 कि. मी
साखरपा कोल्हापूर 80 कि. मी
संगमेश्वर चिपळूण 45 कि. मी
चिपळूण दापोली 72 कि. मी
चिपळूण गुहागर 45 कि. मी
चिपळूण खेड 36 कि. मी
दापोली मंगणगड 42 कि. मी
रत्नागिरी ते पावस 15 कि.मी
देवरूख ते मार्लेश्वर 15 कि.मी
रत्नागिरी ते कशेळी 22 कि.मी
मुरूड ते आंजर्ले 5 कि.मी.
उटी
थंड हवेचे ठिकाण म्हणून "उटी'चा लौकिक साऱ्या देशभर आहे. आजच्या अधिकृत भाषेत या ठिकाणाचे नाव "उधगमंडलम' असे आहे. मध्यंतरी त्याला उटकमंड असेही म्हटले गेले. सुमारे दीड पावणेदोनशे वर्षांपूर्वी जॉन सुलीवॉननामक ब्रिटिश अधिकाऱ्याने विकसित केलेल्या दक्षिण भारतातील या ठिकाणास "क्वीन ऑफ हिलस्टेशन्स' असे म्हटले जाते. हिंदीसह अन्य भारतीय भाषांतील चित्रपटांचे या परिसरात शूटिंग केवळ पावसाळ्याचे काही दिवस वगळता इथे वर्षभर चालू असते. अत्यंत समृद्ध अशी वनसंपदा, वन्यप्राणिसंपदा लाभलेले हे ठिकाण निलगिरी पर्वतशृंखलेत आहे आणि ते आजच्या प्रशासकीय पद्धतीनुसार तमिळनाडू राज्यात असले, तरी इथून केरळ आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमाही लागूनच आहेत. इथे उटीच्या पर्यटकीय वैशिष्ट्यांऐवजी तेथील भाजीपाला शेतीबाबत माहिती देत आहे. समुद्रसपाटीपासून उटी सुमारे अडीच हजार मीटर्स उंचीवर आहे. येथील हवामान तापमान बाराही महिने विलक्षण आल्हाददायक, सुखद असते. वार्षिक पर्जन्यमान सुमारे 200 सेंटिमीटर पाऊस एवढे आहे. थोडक्यात भूमी अर्थात जमीन, पाणी, तापमान हे सगळे भाजीपाला शेतीसाठी अत्यंत पोषक, अनुकूल असे आहे. त्यामुळे या सगळ्या परिसरात ज्याला निलगिरी जिल्हा म्हणतात आणि ज्याचे मुख्यालय उटी शहर आहे तिथे वर्षभर भाजीपाला पिकवला जातो.
भीमाशंकर!
निसर्गसौंदर्याने नटलेले भीमाशंकर! सदाहरित जंगलामुळे या परिसरात पदभ्रमण करणे हा वेगळाच सुखद अनुभव आहे. पावसाळ्यात तर त्याचे सौंदर्य अधिकच खुलते. हिरव्याकंच पर्णभाराने लगडलेल्या वृक्षांवर गोड कूजन करणारे बुलबुल, फुलाफुलांवर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, आकर्षक रंगांनी मन आकर्षित करून घेणारे तऱ्हेतऱ्हेचे कीटक, या सर्वांचे निरीक्षण करणे हा अद्भुत अनुभव असतो. रोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचा उबग आलेल्यांना तर हा परिसर म्हणजे नंदनवनच वाटावा, यात काहीच आश्चर्य नाही. पावसाळ्यात धुक्याच्या तरल पडद्याआडून हळूच डोकावणारी वृक्षवल्लरी क्षणार्धात शहरी शीण आणि ताणतणाव घालवून टाकते. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच महाराष्ट्रात आहेत. भीमाशंकर त्यापैकीच एक. या संपूर्ण परिसराला लाभलेल्या हिरव्या कोंदणामुळे या पवित्र भूमीला भाविकांबरोबरच निसर्गप्रेमींचाही स्वर्ग म्हणायला हरकत नाही. नागफणी या उंच शिखरावरून आसपासच्या दऱ्याखोऱ्यंचे विहंगम दृश्य मनाला भुरळ पाडते. याच क्षेत्रातून भीमा नदीचा उगम होतो आणि आग्नेय दिशेने वाहत ती पुढे कर्नाटकातील रायचूरजवळ कृष्णा नदीत विलीन होते. ही पवित्र देवभूमी आहे आणि भगवान शंकराचा या परिसराला परीसस्पर्श झाला आहे. भीमाशंकराचे मंदिर नगारा शैलीत अठराव्या शतकात बांधण्यात आले आहे. त्याच्या बांधकामावर आर्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. येथे महादेवाचे स्वयंभू लिंग आहे. पेशव्यांचे कारभारी नाना फडणीस यांनी मंदिराचे शिखर बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही या मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी मदत दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. मंदिराच्या कोरीव दगडी खांबांवर पौराणिक देखावे खोदण्यात आले आहेत. मंदिराच्या आवारात शनिमंदिरही आहे. या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख सापडतो. एक आख्यायिका अशी सांगतात, की सह्याद्रीच्या या परिसरात एक दुष्ट राक्षस राहत होता. त्रिपुरासुर किंवा भीम असे त्याचे नाव. त्याच्या मातेचे नाव करकती. भीम आपल्या जीवनातील काही रहस्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता. आपला पिता कोण आणि त्याने आपल्याला वाऱ्यावर का सोडून दिले, असा प्रश्न त्याने आपल्या मातेला केला. तेव्हा त्याला समजले की तो कुंभकर्णाचा पुत्र आहे. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या प्रभू रामाने त्याचा वध केला होता. हे रहस्य समजल्यानंतर भीमाने विष्णूचा सूड उगविण्याचा निर्धार केला. त्याने ब्रह्मदेवाच्या प्राप्तीसाठी याच परिसरात तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्याला एका वराद्वारे अमर्याद सामर्थ्य प्रदान केले. मात्र, त्याचा दुष्टपणा एवढा वाढला, की त्याने देवांचा राजा इंद्राचाही पराभव केला. महादेवाचा उपासक कामरूपेश्वराचाही त्यानं पराभव करून त्याला पाताळात धाडून दिले. भीमाचा दुष्टपणा वाढत चालल्यामुळे ब्रह्मदेव भगवान शंकराला शरण गेले आणि त्या दुष्टाचा नायनाट करण्याची विनंती केली. भीमाने कामरूपेश्वराला शंकराची भक्ती सोडून आपले गुणगान करण्याचा आदेश दिला; परंतु कामरूपेश्वराने त्याला तसे करण्यास नकार दिला; त्यामुळे भीमाने शिवलिंग भग्न करण्याच्या उद्देशाने तलवार उपसली. त्याच वेळी भगवान शंकर तेथे प्रकट झाले. त्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. या युद्धामुळे तिन्ही लोक भयभीत झाले. ते पाहून नारदाने युद्ध थांबविण्याची दोघांना विनंती केली. त्यानंतर भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून भीमाची राख केली. त्यानंतर भगवान शंकर त्याच स्वयंभू लिंगात विलीन झाले आणि हे क्षेत्र ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले. पश्चिम घाटाच्या पूर्व-पश्चिम पसरलेल्या एका रांगेपैकी भीमाशंकरची रांग आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची तीन हजार 250 फूट आहे. येथील जंगलात आंबा, हिरडा, बेहडा, बांबू, औषधी वनस्पती आहेत. घनदाट अरण्यामुळे या प्रदेशात विविध प्रकारचे वन्य जीव वास्तव्यास असतात. बिबट्यांचा येथे मुक्त संचार आहे. त्याचबरोबर रानडुक्कर, भेकर, सांबर, तरस आणि शेकरू (जायंट इंडियन स्क्विरल) ही मोठी खार या अरण्याचे वैशिष्ट्य आहे. मोरांची संख्याही येथे विपुल आहे. पदभ्रमण व गिरिभ्रमण करणाऱ्यांचा तर हा स्वर्गच आहे. या परिसरात तयार झालेल्या पाऊलवाटांनी फिरण्यातच खरी मजा आहे. भाकादेवीचा बंधारा, नागफणीच्या रस्त्यावरील हनुमान तळे, सीतारामबाबांचा मठ आणि हनुमान मंदिर, तेथून काहीशा अवघड वाटेने चढून गेल्यास नागफणी हे भीमाशंकरचे सर्वोच्च शिखर लागते. त्याशिवाय जिल्हा परिषदेचे दोन तलाव येथे आहेत. मुंबई पॉईंट, साक्षी विनायक, कमळजा मंदिर ही आणखी काही रम्य स्थळे. दोन दिवसांच्या सहलीचे नियोजन करून भीमाशंकरला जाता येते. कोकणातून कल्याणमार्गे आणि पुण्याहून मंचरमार्गे येथे पोचता येते. पुण्याहून भीमाशंकर 110 किलोमीटर आहे. बस किंवा मोटारीने येथे येणे सोपे आहे. पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातून नियमितपणे एसटीच्या बस सुटतात. नारायणगाव किंवा मंचरपर्यंत येऊनही तेथे दुसरी बस मिळू शकते. पुणे हा जवळचा विमानतळ आहे. मुंबईहूनही तेथे जाता येते. मुंबईहून बस किंवा लोकलने कर्जतपर्यंत यावे व तेथून खांडसची (सुमारे 40 किलोमीटर) बस पकडावी. सुमारे चार ते साडेचार तासांच्या प्रवासानंतर भीमाशंकरला पोचता येते. भीमाशंकरला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासस्थान आहे. त्याचे आरक्षण मुंबई किंवा पुण्यातून करता येते. भीमाशंकरच्या अलीकडे ब्लू मॉरमॉन आणि अन्य काही हॉटेलेही आहेत. तेथेही दूरध्वनी करून आरक्षण करता येते. सुटीच्या आणि महाशिवरात्रीसारख्या सणांच्या दिवशी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे सुटी व सणाचे दिवस वगळून येथे आल्यास येथील निसर्गसौंदर्याचा लाभ घेता येईल. येथील किंवा अन्य कोणत्याही जंगलात काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा येथे वापर टाळावा. वापरल्यास कोठेही फेकून देऊ नयेत. मोठ्या आवाजात बोलू नये, रेडिओ, टेप बंद ठेवावेत, चालताना झाडांच्या फांद्या तोडू नयेत, बिळांमध्ये काठ्या खुपसून आतील वन्य जीवांना त्रास देऊ नये. कोणत्याही ऋतूमध्ये येथे येता येईल.
विजयदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळ चोहोबाजूंनी समुद्राने वेढलेला सिंधुदुर्ग हा वैशिष्ट्यपूर्ण किल्ला विशेष प्रसिद्ध आहे; पण याच जिल्ह्यातील देवगड तालुक्यात तिन्ही बाजूंनी समुद्राने घेरलेला विजयदुर्गही पाहण्यासारखा आहे. 1653 मध्ये शिवाजी महाराजांनी तो ताब्यात घेऊन अधिक मजबूत बनविला. आता एक पर्यटन स्थळ म्हणून त्याचा परिसर विकसित करण्यात येत आहे.
जिम कॉर्बेट नॅशनल पार्क
जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या देशातील महत्त्वाच्या अभयारण्यांपैकी एक असा त्याचा लौकिक आहे. या पार्कची स्थापना "हेली नॅशनल पार्क' या नावाने 1936 मध्ये करण्यात आली. 1957 मध्ये त्याचे नाव बदलून प्रसिद्ध शिकारी तसंच पर्यावरणवादी लेखक जिम कॉर्बेट यांचं नाव देण्यात आलं. 1970 च्या सुमाराला "वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडा'ची मदत घेऊन व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यामुळे वाघांची संख्या वाढायला मोठीच मदत झाली आहे. या परिसरात वाघ, हत्ती, चित्ता, रानमांजर यांच्यासारखे जंगली प्राणी; मगर, सुसर, नाग असे सरपटणारे प्राणी आणि पक्ष्यांच्या सहाशेहून अधिक प्रजाती पाहायला मिळतात. हिरव्यागार झाडांनी नटललेल्या वनराईचा आस्वाद घेण्यासाठी फ्लोरा भागात जायला हवं. इथं भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते जून हा उत्तम कालावधी असून पावसाळ्यात नद्यांना पूर आल्यास ते काही कालावधीसाठी बंदही ठेवलं जातं. इथं जाण्यासाठी पंतनगर येथील विमानतळ तसेच दिल्लीचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. रेल्वेनं जात असल्यास रामनगर आणि मोरादाबाद या रेल्वेस्थानकावरून टॅक्सी आणि बस उपलब्ध होतात. रस्त्यानं जाण्यासाठी जवळपासच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांपासून थेट दळणवळण सेवा पुरविली जाते. पर्यटकांना राहण्यासाठी वेगवेगळी हॉटेल्स, वन खात्याची रेस्ट हाऊस आणि रिसॉर्टसची सोय आहे. इथं खरेदी करण्यासाठी फारसा वाव जरी नसला, तरी फक्त जंगलात प्राप्त होणाऱ्या काही गोष्टी (आवश्यक त्या परवानगीसहीत) घेता येतात.
दिल्ली
दिल्ली शहराला स्वत:चा असा मोठा इतिहास आहे. पूर्वी त्याच्या तख्तावर बसून राज्य करणं हा राजघराण्यांचा बहुमान समजला जाई. आज त्याला आपल्या देशाच्या राजधानीचा दर्जा प्रदान करण्यात आला. जगभरातल्या पर्यटकांचं ते प्रमुख आकर्षणस्थळ ठरतं.दिल्ली शहराला राजकीय, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटनांचं प्रतीक मानलं जातं. तिथं मुघल, राजपूत आणि अफगाणी साम्राज्याच्या खुणा जागोजागी पाहायला मिळतात. लाल किल्ला, जामा मशीद, हुमायूनची कबर, कुतुबमिनार आणि जंतरमंतर ही तिथली मुख्य ठिकाणं. इतर प्रेक्षणीय स्थळांमध्ये पुरातत्त्व विभाग आणि हवाई दलाचं वस्तुसंग्रहालय, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि बिर्ला मंदिर, अक्षरधाम मंदिर, बांगला साहिब गुरुद्वार ही ठिकाणे बघता येतील. त्याशिवाय राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटही पर्यटकांची आकर्षणस्थळं ठरतात. दिल्ली राजधानीचं ठिकाण असल्यामुळे ते देश तसेच जगभरातल्या सगळ्याच प्रमुख शहरांशी जोडण्यात आलं आहे. दिल्ली विमानतळावरून सतत मोठ्या प्रमाणावर फ्लाईट्स सुटतात. रेल्वेने जायचं असल्यास राजधानी एक्स्प्रेसच्या राजेशाही प्रवासाचा अनुभव घ्यायला हवा. पर्यटकांच्या वास्तव्यासाठी बजेट हॉटेलपासून ते डिलक्स हॉटेलपर्यंत निरनिराळ्या स्वरूपातील पर्याय उपलब्ध आहेत. पुढील प्रवासाकरिता मुक्कामासाठी (ट्रान्झिस्ट हॉल्ट) रेल भवन आणि महाराष्ट्रीय लोकांसाठी बृहन्महाराष्ट्र भवन उपलब्ध होतं. या शहराची व्यापारपरंपरा मोठी असून दागदागिने आणि मौल्यवान खडे, कार्पेट, सिल्क आणि सिल्व्हर वेअर प्रसिद्ध आहे. कनॉट प्लेस, चांदनी चौक आणि करोल बाग या मुख्य बाजारपेठा. पण तिथं जाऊन खरेदी करण्यापूर्वी घासाघीस करण्याची कला मात्र शिकून घ्यावी.
काझीरंगा अभयारण्य
आसाम हे ईशान्य भारतातल्या राज्यांना जोडणारं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. हा संपूर्ण प्रदेश सपाट भूभाग असून नद्या आणि जंगलं यांनी समृद्ध आहे. यामुळे हा प्रदेश प्राण्यांसाठी नंदनवनच ठरतं आणि त्यामुळे या भागात देशातील एक मोठं काझीरंगा अभयारण्य आहे.एकशिंगी गेंडे हे या अभयारण्याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्याशिवाय हत्ती, रानरेडे, सांबार, हरीणं आणि वाघ यांच्यासारखे वनचर प्राणी तसेच हजारो जातींचे पक्षीसुद्धा इथं पाहायला मिळतात. या पार्कमध्ये फिरण्यासाठी निघणाऱ्या हत्तींच्या फेऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबरोबरच जीप आणि मिनी बसमधूनही हिंडता येऊ शकते. या अभयारण्याखेरीज मानस अभयारण्य, ब्रह्मपुत्रा नदी, चित्रचक टेकडीवरील नवग्रह मंदिर आणि नीलाचल टेकडीवरील कामाख्या मंदिरासारखी ठिकाणंही बघण्यासारखी आहेत. काझीरंगाला जाण्यासाठी जोरहाट आणि गुवाहाटीला विमानतळ आहेत. फर्केटिंग हे रेल्वे स्टेशन काझीरंगाला जवळून जोडण्याचं काम करतं. आपल्याकडून जाण्यासाठी मुंबई-गुवाहाटी एक्स्प्रेस उत्तम. खासगी बस आणि टॅक्सींचा पर्याय वापरता येतो. इथं पर्यटकांच्या सोयीसाठी प्रामुख्यानं जंगलातच कॅम्प, लॉज आणि रिसॉर्टची व्यवस्था केली जाते. नोव्हेंबर मध्यापासून ते एप्रिलपर्यंतचा काळ येथे जाण्यासाठी उत्तम. गुवाहाटीत रेशमी कपडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात; तर काझीरंगा कलात्मक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे.
दार्जिलिंग
"क्वीन ऑफ दि हिल्स'. भारतात हिमालय पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या थंड हवेच्या ठिकाणांमधील महत्त्वाचं "हिल स्टेशन' म्हणजे दार्जिलिंग! हे ठिकाण पश्चिम बंगालमध्ये असून, पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचं श्रेय इंग्रजांकडे जातं. त्याला "क्वीन ऑफ दि हिल्स' या नावानंही संबोधतात. दार्जिलिंग प्रामुख्यानं चहाचे मळे आणि दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेकरिता प्रसिद्ध असून, "युनेस्को'नं त्याला जागतिक वारशाचा दर्जा प्रदान केला आहे. ते समुद्रसपाटीपासून 2,134 मीटर उंचीवर आहे. टायगर हिल्स हा त्या परिसरातील सगळ्यात उंच भाग म्हणून ओळखण्यात येतो.मार्च ते सप्टेंबर हा येथील मुख्य हंगाम असतो. तिथं पाहण्याजोगी अनेक ठिकाणं आहेत. उदा. जपानी पॅगोडा, लॉईड बॉटनिकल गार्डन, कांचनगंगा, टाऊन ऑफ घूम, हिमालयीन माऊंटेनियरिंग इन्स्टिट्यूट, पद्मजा नायडू हिमालयीन झुऑलॉजिल पार्क, धीरधाम मंदिर.दार्जिलिंगला जाण्यासाठी बागदोगरा हा प्रमुख विमानतळ असून, त्याला अनेक शहरांतील विमानसेवांनी थेट जोडण्यात आलं आहे. रेल्वेनं जायचं असल्यास न्यू जलपायगुडी स्थानकावर उतरावं लागतं. पुढ प्रसिद्ध टॉय ट्रेननंही प्रवास करता येतो. कोलकत्ता आणि अन्य ठिकाणांहून सरकारी तसेच खासगी बससेवा आणि टॅक्सी सेवा उपलब्ध आहे. इथं येऊन खास हिमालयीन प्रदेशात मिळणारी औषधं आणि औषधी वनस्पतींची खरेदी करणं महत्त्वाचं ठरतं. त्याखेरीज येथील कपडे, दागिने आणि मूर्तीही प्रसिद्ध आहेत.
रेल्वे - दार्जिलिंगला सर्वात जवळ असलेले रेल्वेस्थानक म्हणजे न्यु जलपायगुडी (88 कि.मी.). मुंबई, कोलकाता, दिल्ली, गुवाहाटी, वाराणसी, बंगळूर, चेन्नई आदी ठिकाणांहून येथे जाता येते.
बस-टॅक्सी - एकदा का जलपायगुडीला तुम्ही उतरलात की, तुम्हाला दार्जिलिंगला जाण्यासाठी टॅक्सी, ऑटो रिक्षा उपलब्ध होतात.
रेल्वे - दार्जिलिंगला सर्वात जवळ असलेले रेल्वेस्थानक म्हणजे न्यु जलपायगुडी (88 कि.मी.). मुंबई, कोलकाता, दिल्ली, गुवाहाटी, वाराणसी, बंगळूर, चेन्नई आदी ठिकाणांहून येथे जाता येते.
बस-टॅक्सी - एकदा का जलपायगुडीला तुम्ही उतरलात की, तुम्हाला दार्जिलिंगला जाण्यासाठी टॅक्सी, ऑटो रिक्षा उपलब्ध होतात.
ताजमहाल
भारत दर्शन करायला निघालं, तर आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम येतो ताजमहाल, जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक म्हणून गणला जाणारा...राजा शहाजहान याने आपली पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधलेली वास्तू म्हणून ताजमहाल ओळखला जातो. त्यातून इंडो-पर्शियन कलाकुसरीचे उत्तम दर्शन घडते. त्याची प्रमाणबद्ध रचना, नाजूक नक्षीकाम व अप्रतिम सौंदर्य नजरेत भरण्याजोगंच आहे. प्रेमाचं प्रतीक बनलेल्या या ताजमहालाची मनमोहक रूपे वेगवेगळ्या वेळी पर्यटकांना पाहता येतात. ताजमहालाखेरीज लाल किल्ला, जहांगीर पॅलेस, इतमद्-उद-दाऊला कबर, राधाओसामी समाधी, अकबराची समाधी ही इतर काही प्रेक्षणीय स्थळंही या शहरात बघता येतात. आगऱ्यापर्यंत पोचण्यासाठी सहा किमी अंतरावर खेरिया हा मुख्य विमानतळ आहे. बाहेरून येणाऱ्या फास्ट आणि सुपरफास्ट ट्रेन आग्रा रेल्वे स्थानकावरच थांबतात. पर्यटकांसाठी सर्वसामान्य हॉटेलांपासून ते पंचतारांकित डिलक्सपर्यंत अनेक प्रकारची हॉटेलं उपलब्ध आहेत. इथं मिळणाऱ्या मोगलाई डिशेसही खवय्यांचं खास आकर्षण ठरतात. आगऱ्याला येऊन खरेदी करणं हाही एक महत्त्वाचा भाग असतो. त्यासाठी सदर बाजार, ताज गंज, किनारी बाजार व प्रताप पुरा यांसारखी ठिकाणं प्रसिद्ध आहेत. तिथं प्रामुख्यानं हस्तनिर्मित आणि कलाकुसरीच्या वस्तू विकत मिळतात.
कसे जायचे -
ट्रेन - दिल्लीहून आग्रा हे शहर रेल्वेने चांगल्याप्रकारे जोडले गेले आहे. शताब्दी एक्सप्रेस-दोन तास, ताज एक्सप्रेस-अडीच तास आणि इंटरसिटी एक्सप्रेस-तीन तास.
बस - दिल्ली, जयपूर, लखनो, ग्वालियर या ठिकाणाहून बससेवा मिळू शकते.
कसे जायचे -
ट्रेन - दिल्लीहून आग्रा हे शहर रेल्वेने चांगल्याप्रकारे जोडले गेले आहे. शताब्दी एक्सप्रेस-दोन तास, ताज एक्सप्रेस-अडीच तास आणि इंटरसिटी एक्सप्रेस-तीन तास.
बस - दिल्ली, जयपूर, लखनो, ग्वालियर या ठिकाणाहून बससेवा मिळू शकते.
Subscribe to:
Posts (Atom)