गंगाद्वारावरचा "ब्रह्मगिरी'

गंगाद्वारावरचा "ब्रह्मगिरी'
अंजनेरी, ब्रह्मगिरी पर्वतरांग दोन मोठ्या नद्यांना जन्म देते... वैतरणा आणि गोदावरी. कोकणात वाहत जाणारी वैतरणा नळाद्वारे मुंबईतल्या घराघरापर्यंत पोचते. पवित्र गोदावरी तर दक्षिणेतील फार प्रसिद्ध नदी. नाशिक, पैठण, नांदेड यांसारखी अनेक पुण्यक्षेत्रं तिच्या काठावर वसली आहेत. पहाटे लवकर त्र्यंबकेश्‍वरला यायचं. त्र्यंबकेश्‍वरला यायला नाशिक आणि जव्हारकडून उत्तम रस्ता आहे. कुंभमेळा लागणाऱ्या त्र्यंबकेश्‍वराच्या पवित्र कुशावर्त तीर्थात स्नान करायचं. ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्‍वर महादेवाचं दर्शन करायचं आणि गावापाठी उभ्या असणाऱ्या ब्रह्मगिरीकडे कूच करायची. त्र्यबंकेश्‍वराहून ब्रह्मगिरीकडे जायला प्रशस्त वाट आहे. रस्त्यात मध्येमध्ये लिंबू सरबतवाल्यांची दुकानं आहेत. ब्रह्मगिरीचा शेवटचा कातळ चढण्यासाठी रेलिंग लावलेल्या पायऱ्या आहेत. चढताना माकडांना खायला न दिलेलंच बरं, नाही तर माकडं तुम्हाला चढताना अक्षरशः खिंडीत गाठतात. तुमची झडती घेऊन खाण्याच्या वस्तू लंपास करतात. एखादी काठी सोबत ठेवलेली बरी. ब्रह्मगिरीवरून त्र्यंबकेश्‍वराचं सुरेख दर्शन होतं. ब्रह्मगिरीच्या माथ्यावर एका टोकाला आहे गोवातीर्थ. तिथे गोदामाईची मूर्ती असणारं मंदिर आहे. मंदिराच्या समोर एका कुंडामध्ये गोमुखातून पाणी पडत असतं. हे मंदिर म्हणजे गोदावरी नदीचा मूळ उगम आहे, असा समज आहे. माथ्याच्या वरच्या दुसऱ्या टोकाला आहे शंकराचं मंदिर. शंकराने गुडघे टेकवून इथे जरा आपटले होते म्हणे. गुडघ्याचे दोन खड्डे व जरा आपटल्याच्या दगडावरील खुणा पाहण्यासारख्या आहेत. 4200 फुटांहून अधिक उंच असणाऱ्या या गडावरून हरिहर, बसगड, वाघेरा, अंजनेरी सहज दिसून येतात. याशिवाय ठळकपणे नजरेत भरतो तो अप्पर वैतरणा तलाव. आल्या वाटेने त्र्यंबकेश्‍वरकडे उतरताना डावीकडे गंगाद्वार आहे, ते जरूर पाहण्यासारखं. श्रावणातल्या सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालणाऱ्या भक्तांची रीघ लागलेली असते. संत ज्ञानेश्‍वरांचे गुरू व बंधू निवृत्तीनाथांनी त्र्यबंकेश्‍वरलाच समाधी घेतली. ब्रह्मगिरीच्या जवळच असणारा अंजनीपुत्र हनुमानाचा जन्म झालेला अंजनेरी, अप्पर वैतरणा काठचा श्रीघाट तसेच नाशिकची पांडव लेणी इथून जवळच आहेत व मुद्दाम पाहण्यासारखी ही स्थळं आहेत. अंजनेरी, ब्रह्मगिरी, हरिहर, बसगड असा ट्रेकसुद्धा करण्यासारखा आहे.
मधुकर धुरी
युथ हॉस्टेल, मालाड
yhai-malad@redeffmail.com
(साभार ः सकाळ)

No comments: