मालवण

मालवण
माझा जन्म कुडाळचा. त्यामुळे कोकणाबद्दल, त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल मला विशेष प्रेम. युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या गोवा राज्य शाखेने आयोजित केलेल्या फॅमिली कॅम्पिंगसाठी चार दिवस गोव्यात होतो. येताना चार दिवस मालवणला मुक्काम केला. मालवणात राहून पाहता येतील अशा ठिकाणांची ही तुमच्यासाठी ओळख...
मालवणची भौगोलिक रचना खास आहे. पश्‍चिमेला अथांग अरबी समुद्र. पूर्वेला कासारटाक्‍याची घाटी. उत्तरेला गड नदीची खाडी, तर दक्षिणेला कर्ली नदीची खाडी. या दोन्ही नद्या समुद्राला मिळण्याआधी समुद्राला समांतर वाहतात. त्यातून जमिनीची एक चिंचोळी पट्टी तयार झाली आहे. शंभरएक मीटर रुंदीची. या चिंचोळ्या पट्टीच्या पश्‍चिमेला आहे समुद्रकिनारा, तर पूर्वेला नदी किनारा. एका बाजूला समुद्राची गाज, तर दुसऱ्या बाजूला माडांच्या बनातून वाहणारी शांत नदी. कर्ली नदीच्या चिंचोळ्या पट्टीत तारकर्ली वसलंय. नदीच्या मुखाजवळ आहे देवबाग, तर समोरच्या किनाऱ्यावर आहे भोगवे. गडनदीच्या पट्टीतलं गाव तोंडवळी, मुखाजवळ आहे तळाशील आणि दुसऱ्या किनाऱ्यावर वसलंय रेवंडी. मालवणच्या दक्षिणेला सात किलोमीटरवर आहे तारकर्ली. लांबच लांब विस्तीर्ण समुद्रकिनारा तारकर्लीला लाभलेला आहे. एमआयडीसीने तारकर्लीला प्रसिद्धी मिळवून देण्यात विशेष हातभार लावलाय. तारकर्लीपासून पाच किलोमीटर दक्षिणेला असणाऱ्या देवबागपर्यंत कर्ली नदी समुद्राला भेटायला वाहत येते. तारकर्ली ते देवबाग गाडीरस्ता उपलब्ध आहे. देवबागला बोटीत बसायचं आणि कर्ली नदी समुद्राला मिळते त्याच्या दुसऱ्या किनाऱ्यावर असणाऱ्या भोगवे बीचवर उतरायचं. देवबाग भोगवे सफरीदरम्यान शेकडो सीगल पक्षी तुम्हाला पाहायला मिळतात. भोगवे किनारा पाहून झाला, की पुन्हा बोटीत बसायचं, निघायचं निवतीकडे. समुद्रकिनारी टेकडीवर निवतीचा किल्ला आहे बीचला लागूनच. निवती, भोगवे दोन्ही समुद्रकिनारे अतिशय रमणीय व सुंदर आहेत. देवबागहून बोटीने या किनाऱ्यांना भेट देण्यात विशेष मजा आहे. या बोट सफरीचं अजून एक आकर्षण आहे, ते म्हणजे डॉल्फिन. निवतीजवळच्या समुद्रात डॉल्फिन हमखास बघायला मिळतात आणि देवबागचे बोटवाले तुम्हाला डॉल्फिन दाखविल्याशिवाय हार मानत नाहीत. मात्र तुम्ही नेमकी वेळ गाठायला हवी आणि थोडीफार नशिबाने साथ द्यायला हवी. तीन-चार तासांच्या या सफरीचं 10 जणांचं मिळून 800 रु. भाडं आहे. तुमचे स्वतःचे 10 जण नसतील, तर मात्र दरडोई अधिक खर्च सोसायची तयारी हवी. देवबाग, तारकर्ली करीत कर्ली नदीतून लक्ष्मीनारायणाचं सुप्रसिद्ध मंदिर असणाऱ्या वालावलपर्यंत जर तुम्हाला बोटिंग करण्याची संधी मिळाली, तर मात्र सोन्याहून पिवळं; पण त्यासाठी योग्य ती किंमत मोजायची तयारी हवी. देवबागची नदी व समुद्रकिनारा दृष्ट लागण्याइतका स्वच्छ व नितळ पाण्याचा आहे. देवबाग कर्ली नदीइतकाच सुंदर किनारा आहे तळाशील गड नदीचा. गड नदी समुद्राला भेटायला येते ती तोंडवलीपासून. तळाशीलपर्यंत समुद्राला समांतर वाहते. मालवण, हडी, तोंडवली, तळाशील असा गाडीरस्ता उपलब्ध आहे. नदीच्या एका बाजूला तोंडवली, तळाशील, तर दुसऱ्या बाजूला ओझर, रेवंडी, कोळंब आहे. ओझरची ब्रह्मानंद स्वामींची असणारी गुहा व पाण्याचा झरा बघण्यासारखा आहे. ओझरजवळ आहे रेवंडी. मालवणचा सुपुत्र "वस्त्रहरण'कार मच्छिंद्र कांबळींचं गाव. गावात भद्रकालीचं मंदिर आहे. रेवंडीतल्या तरीवरून तळाशीलला बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तळाशीलची मच्छिमारांची वस्ती संपली, की बांद्याच्या पुढे ओसाड बेट आहे. त्यावरून गड नदीच्या मुखाचं सुंदर दर्शन होतं. रेवंडीतूनसुद्धा गड नदी समुद्राला मिळते ती जागा बघण्यासारखी आहे. तोंडवळीचा सुरूचा किनारा, तळाशीलचा माडांच्या चिंचोळ्या पट्टीचा किनारा खास बघण्यासारखा. खुद्द मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्याबरोबरच बघण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. तिथला मासळीबाजार, अनेक मंदिरं, रॉक गार्डन, चिवळा आणि त्याला लागून असलेला कोळंबचा समुद्रकिनारा अशा ठिकाणी सहज जाता येतं. महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेलं मालवण गाव. इथे येऊन सिंधुदुर्ग किल्ला न पाहिला तर काय पाहिलं? मालवणच्या जेटीवरून किल्ल्यात जायला बोटी उपलब्ध आहेत. राजाराम महाराजांनी स्थापन केलेलं महाराजांचं मंदिर, फांदी असणारं माडाचं झाड, दुधबाव, दहीबाव, महाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा, राणीची वेळा इत्यादी पाहताना वेळ कसा पटकन निघून जातो. मालवणला रेल्वे स्टेशन नाही. रेल्वे पकडण्यासाठी कुडाळला जावं लागतं. मालवणहून कुडाळला जाताना रस्त्यात धामापूर लागतं. धामापूरचा तलाव मन प्रसन्न करणारा आहे. तलावात बोटिंगची सोय आहे. झाडीभरला हा तलाव नुसत्या दर्शनानेच तुम्हाला ताजतवानं करतो. आठवडाभराची सुट्टी असेल, तर मालवणनंतरचा मुक्काम करायचा सावंतवाडी अथवा वेंगुर्ल्याला. त्याशिवाय देवगड अथवा कणकवली असासुद्धा पर्याय आहे. आठवड्याची सुट्टी नसली, तर कोकण रेल्वे आहेच तुम्हाला झटपट मालवणला पोहोचायला. मगे येतालास ना? येवा, कोकण आपलाच आसा!
- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल, मालाड युनिट. yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

No comments: