नाच रे मोरा...!!

नाच रे मोरा...!!
"नाचरे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच!' लहानपणापासून कित्येक वेळा आपण हे गाणं ऐकलेलं असतं। मग कधीमधी राणीच्या बागेत आपण त्याला प्रत्यक्ष पाहिलेलं असतं. तेव्हापासून मोर आपल्या मनामध्ये घर करून बसलेला असतो. पूर्वी गावागावांत माळरानावर हमखास दिसणारा मोर अलीकडे मात्र सहज दिसेनासा झाला. गावाकडे मोराला हमखास बघायचं असेल, तर तुम्हाला यावं लागेल ते पुणे जिल्ह्यातल्या मोराच्या चिंचोलीला. पुण्याच्या ईशान्येला 50 कि.मी. अंतरावर एक अनोखं गाव वसलंय, ज्याचं नाव आहे मोराची चिंचोली. पुणे-नाशिक रस्त्याच्या राजगुरुनगर वा पुणे-नगर रस्त्यावरच्या शिक्रापूर इथून मोराच्या चिंचोलीला जाता येतं. मोराचं संरक्षण व संवर्धन करण्याचं काम या परिसरातल्या गावकऱ्यांनी मनापासून केलं. त्यामुळे या परिसरात मोरांची संख्या एवढी वाढली, की एका माणसामागे एक मोर, अशी परिस्थिती झाली. शेकडोने मोर पाहायला मिळत असल्याने पर्यटनाच्या नकाशावर मोराची चिंचोली प्रसिद्ध पावते आहे. चिंचोलीमध्ये चिंचेची भरपूर झाडं आहेत. सकाळी जरा उजाडलं, काळोख सरून दिसायला लागलं, की झाडांच्या शेंड्यावरून मोर खाली उतरतात. सकाळी सहा ते आठ हा मोर बघायला सर्वोत्तम काळ. शिवारात जिथे नजर टाकाल तिथे मोर आणि लांडोर दिसतात. पर्यटकांच्या सोयीसाठी "जय मल्हार कृषी विकास प्रतिष्ठान' यांनी विशेष सोय केली आहे. एका मोठ्या चौथऱ्यावर मोरांसाठी दाणे टाकलेले असतात. तिथे एकाच जागेवर अनेक मोर आपल्याला पाहायला मिळतात. शिवारात सर्वत्र मोर फिरत असतात; मात्र त्यांच्या फार जवळ जाता कामा नये, नाहीतर ते पळून जातात. साधारण 40 ते 50 फुटांवरून तुम्ही त्यांचं निरीक्षण करू शकता. एवढ्या अंतरावरून फोटो काढण्यासाठीचा कॅमेरा तुमच्याकडे हवा. उन्हं वर चढू लागली, की मोर पुन्हा दिसेनासे होतात. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी मोराच्या चिंचोलीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये ग्रामीण जीवनाचा अनुभव शहरी पर्यटकांना घेता यावा यादृष्टीने विविध देखावे आणि वस्तू मांडल्या आहेत. चिंचोलीच्या ओढ्याकाठच्या उद्यानात झोपाळ्यावर तुम्ही उंचच उंच झोके घेऊ शकता. बमी ब्रीजवर चालू शकता, बैलगाडीतून रपेट मारू शकता. पुन्हा संध्याकाळी चिंचोलीतल्या तळ्यावर मोरांच्या पाठी हिंडू शकता. मोराच्या चिंचोलीहून परत आल्यावर मात्र इतर चार लोकांना त्याबाबत सांगा, त्यामुळे इथल्या पर्यटनाला चालना मिळेल. मोराच्या चिंचोलीइतकंच अनोखं अजून एक अप्रूप इथून जवळच आहे. कुकडी नदीच्या पात्रातील रांजणकुंड. कुकडी नदी ही पुणे व नगर जिल्ह्याची सीमा आहे. नगर जिल्ह्यांत निघोज व पुणे जिल्ह्यातलं टाकळीहाजी या नदीच्या तीरावरील गावांदरम्यान नदी पात्रात अनेक रांजणकुंडं निर्माण झाली आहेत. नदीच्या पाण्याबरोबर गोल गोल फिरून छोटे छोटे दगड मोठ-मोठ्या रांजणाच्या आकाराचे खळगे तयार करतात. त्यात पाणी घुसळून घुसळून त्याचा आकार मोठा होत जातो. मग दोन बाजूबाजूचे रांजण खड्डे एकमेकांना छेदतात व मोठा रांजण तयार होतो. त्यातून वाहणारं निळंशार पाणी व किनाऱ्यावरील मंदिर आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातं. मुद्दाम पाहावं असं हे ठिकाण आहे. मोराची चिंचोली व रांजणकुंडं बघून झाली, की रांजणगावचा गणपती जवळच आहे. गणरायाचं दर्शन करायचं आणि सरत्या दिवसाच्या स्मृती जागवत आपापल्या गावी प्रस्थान करायचं.
- मधुकर धुरी युथ हॉस्टेल मालाड yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

No comments: