ट्रेक सह्याद्री...

ट्रेक सह्याद्री...

"राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा...' असं महाराष्ट्राचं वर्णन कुसुमाग्रजांनी करून ठेवलंय, ते खरंच आहे। हा दगडांचा देश आहे, पण या दगडांतूनही सौंदर्याच्या खाणी पसरल्या आहेत आणि त्यांचा अनुभव घ्यायला जावं लागतं सह्याद्रीच्या कुशीत...

पहिल्या दिवशीचा मुक्‍काम असेल कर्जत येथील बेस कॅम्पला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या खऱ्या पदभ्रमणाला सुरुवात होईल. कोंदिवडे गावातून आपण निघू राजमाचीच्या रोखाने. संपूर्ण चढाईचा दिवस. मात्र ही चढाई नुसती चढाई नाही. या वाटेवर आपण पाहणार आहोत "कोंढाणा लेणी'. या लेण्यांना "कोंढाणा लेणी' म्हटलं जातं ते या लेण्यांच्या पायालगत असलेल्या कोंढाणा या गावाच्या नावावरून; मात्र या गावातून येणारा रस्ता जास्त खडतर असल्यानं आपण कोंदिवडे गावातून या लेण्यांकडे येणार आहोत. ज्या वाटेनं आपण चालणार, तो कोणे एके काळी राजमार्ग असावा. कारण या वाटेवर असणारी कोंढाणा लेणी आणि डोंगरांच्या माथ्यावर असणारा राजमाची किल्ला. लेण्यांची निर्मिती ही नेहमीच राजसत्तेच्या संरक्षणाखाली आर्थिक मदतीने करण्यात आलेली आहे. अत्यंत नाजूक कलाकुसरीने नटलेली ही लेणी ख्रिस्त जन्मापूर्वी सुमारे 200 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली असावीत, असं म्हटलं जातं. ही अती प्राचीन लेणी पाहून आपण दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेऊन राजमाचीकडे प्रस्थान करतो. संध्याकाळी पोहोचतो. मोहिमेचा तिसरा दिवस आपण राजमाची किल्ल्याच्या प्रदेशात घालविणार आहोत. मनरंजन व श्रीवर्धन ही किल्ल्यांची जोडगोळी म्हणजेच "राजमाची किल्ला'. थेट ख्रिस्तपूर्ण 200 वर्षे जुना. राजमाची वळलाय तो कुसूर घाटाच्या तोंडावर आणि जोडला गेलाय 300 मी. लांब सह्याद्रीच्या रांगेशी. संपूर्ण परिसर घनदाट अरण्यानं वेढलेला, विविध प्रकारच्या वन्य श्‍वापदांनी संपन्न. पूर्वेच्या बाजूला श्रीवर्धन, तर पश्‍चिमेस मनरंजन हे दोन बालेकिल्ले. त्यांच्या मधल्या खिंडीत वसलंय भैरोबाचं मंदिर. याच परिसरात राजमाचीच्या दक्षिणेस दूरवर आपणास दिसतो ड्यूक्‍स नोज, तर नैऋत्येस ढाक भैरी. 1648 मध्ये हा किल्ला हिंदवी स्वराज्यात आला आणि त्यानंतर शेवटी 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. ट्रेकच्या चौथ्या दिवशी आपण राजमाचीहून कार्ला लेण्यांकडे निघणार आहोत. वाटेत लागणारं शिरोड धरण, त्याचा जलाशय पाहणार आहोत. महाराष्ट्रात जी अत्यंत महत्त्वाची अशी लेणी आहेत, त्यातील एक "कार्ला लेणी.' इंद्रायणी नदीच्या विस्तीर्ण प्रदेशात उंच डोंगरात खोदलेली. कार्ले हे गाव दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध. एकवीरा मातेचं मंदिर आणि लेणी. एकवीरा हे कोळी बांधवांचं आराध्य दैवत. याच मंदिराच्या मागच्या बाजूस लांबलचक डोंगरात खोदली गेलीत बौद्धकालीन लेणी. या लेण्यांची निर्मिती अदमासे ख्रिस्तपूर्व 100 वर्षे इतकी जुनी आहे. मुख्य लेण्यातील स्तूप हा "स्तूप' या शब्दाची व्युत्पत्ती समजाविणारा सध्या अस्तित्वात असलेला एकमेव स्तूप आहे. सकाळी उठून आपण निघणार आहोत आपल्या शेवटच्या मुक्कामाच्या दिशेने, अर्थात लोहगडाकडे. वाटेत मळवली रेल्वेस्थानक लागतं. हा परिसर पक्षी निरीक्षणासाठी अगदी योग्य आहे. विविध प्रकारचे पक्षी आपल्याला या परिसरात पहाटेच्या वेळी पाहायला मिळतात. भाजे गावाकडे आपण कूच करतो. या गावाच्या पूर्वेस असलेल्या डोंगरातील लेण्यांकडे जाणारी पायऱ्यांची वाट आपल्याला भाजे लेण्यांकडे घेऊन जाते. महाराष्ट्रातील "सर्वात प्रथम खोदली गेलेली लेणी' असा भाजे लेण्यांचा उल्लेख केला जातो. ख्रिस्तपूर्व 240 वर्षे खोदलेली ही लेणी. या ठिकाणी एकंदर 20 गुहा असून त्यामध्ये दोन चैत्य, अशी रचना आहे। ख्रिस्तपूर्व 270 वर्षं सुरू झालेलं या लेण्यांचं खोदकाम इ.स. 1200 पर्यंत अखंड चालू होतं. या लेण्यांतील स्तूप हा दगडात कोरलेला आहे. ही लेणी पाहून आपण विसापूर किल्ल्यावर येतो. येथील तटबंदी, तोफ फिरविण्याची जागा इत्यादी गोष्टी पाहून आपण दक्षिणेतील घळीतून खाली उतरतो. ही उतरणसुद्धा थोडी जोखमीचीच, पण मजेशीर, एक वेगळा अनुभव देणारी. संध्याकाळ झालेली असते. सूर्य मावळतीकडे झुकलेला असतो. लोहगडाची सावली विसापूरचं चुंबन घेत असते आणि आपण लोहगडाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतो... आजचा मुक्काम लोहगडावरच! .... सकाळ. आज ट्रेकचा शेवटचा दिवस. मनात परतीचे वेध लागलेले असतात. आज आपण लोहगड पाहणार आहोत. शिवकालात सुरतेची लूट येथेच ठेवून महाराज राजगडाकडे प्रस्थान करते झाले. सातवाहन - बहामनी - निजामशहा - आदिलशहा - मराठे - मुघल - मराठे - मुघल - कान्होजी आंग्रे - पेशवाई अशी राजवटींची श्रृंखला अनुभवलेला हा किल्ला अखेर तोफेचा एकही गोळा न फेकता निमूटपणे इंग्रजांच्या हवाली झाला. या गडावरील लोमेश ऋषींची गुहा, चार दरवाजे, विंचू काटा या काही उल्लेखनीय वास्तू. असा हा लोहगड पाहून आपण लोणावळ्याच्या दिशेने निघतो.
- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट।
yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

No comments: