महर्षी कर्वे यांचे मुरूड

मुरूड समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनस्थळांचा विचार करताना अगदी अलिबागपासून गोव्यापर्यंत मन भरारी मारून येतं. यातच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीपासन नऊ किलोमीटर अंतरावरील मुरूडचा रम्य किनारा मनाला विशेष मोहून टाकणारा आहे. स्वच्छ किनाऱ्यावर भटकणे, शांत समुद्रामध्ये मनसोक्त डुंबणे व कोकणी पदार्थांचा आस्वाद घेणे, यासाठी मुरूड हे गाव पर्यटकांच्या खास लक्षात राहण्यासारखेच आहे. पुण्याहून 200 किलोमीटर दापोली आणि दापोलीपासून नऊ किलोमीटरवर मुरूड हे महर्षी कर्वे यांचे जन्मगाव. नारळ-पोफळीच्या बागा, कौलारू घरे, सारवलेली अंगणे पाहत पाहत आपण सरळ समुद्रावरच पोचतो व तो विशाल सागर आपल्याला खिळवूनच ठेवतो. याच सागराच्या सान्निध्यात व अगदी नारळाच्या बागेत एक साधे पण सुंदर रिसॉर्ट आहे... श्री. सुरेश बाळ यांचे "मुरूड बीच रिसॉर्ट'. येथे गरमागरम उकडीचे मोदक, आंबोळी, थालीपीठ यासारखे कोकणी पदार्थ आधी कळवल्यास आधी पर्यटकांसाठी बनवतात. तसेच त्यांच्याकडे पोहा पापड, आमसुले, आंबापोळी, फणसपोळी इ. पदार्थ मागणीनुसार उपलब्ध असतात. शिवाय त्यांच्या बागेत जायफळ, लवंगा, काळी मिरी इत्यादी झाडेही पाहायला मिळतात. मुरूडच्या किनाऱ्यावरून सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग व हर्णैचा दीपस्तंभही दिसून येतो. मुरूड गावात दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या खांबांवर नक्षीकाम केलेले आहे, तर पुढील बाजूस नगारखाना व दगडी दीपमाळ आहे. मुरूडपासून चार-पाच किलोमीटर अंतरावर आंजर्ले गाव वसलेले आहे. तेथील गर्द झाडी असणाऱ्या टेकडीवर सुंदर गणेश मंदिर आहे. दापोली-दाभोळ रस्त्यावर असलेली पन्हाळेकाजी लेणी हेही पर्यटकांना पाहण्यासारखे स्थान आहे. दाभोळहून जेटीने किंवा फेरीबोटीने खाडी पार करून गुहागर, हेदवी व वेळणेश्‍वर अशा पर्यटनस्थानांची ओळख करून घेता येते. ही फेरीबोट दुचाकी, चारचाकी वाहने व माणसे यांना वाहून नेते व ही सेवा वाजवी दरात सतत उपलब्ध असते. तसेच मुरूडच्या किनाऱ्यावर राहून पर्यटक रायगड किल्ला, चिपळूणजवळील परशराम मंदिर, दिवेआगर येथील सोन्याचा गणपती इत्यादी ठिकाणे पाहून परत येऊ शकतो.

वाईची हिरवाई

पुण्याहून महाबळेश्‍वर,पाचगणीला जाण्याऐवजी वाईला गेल्यावर कृष्णाकाठी घाटावर पुरातन मंदिरे आहेत. त्यात एक ढोल्या गणपती मंदिर (दहा फुटी गणपती मूर्ती आहे. मंदिर सुंदर आहे) आहे. जवळच श्री शंकराचे कोरीव कामाचे सुंदर मंदिर आहे. मंदिर, नदी, शिवलिंग फारच सुंदर आहे. ते पाहून वाईतून धोम गाव व धरणाकडे एक रस्ता जातो. रस्त्याच्या कडेने दाट झाडी आहे व हिरवीगार शेते. बाराही महिने हा परिसर हिरवागार असतो. मन प्रसन्न होते. शुद्ध हवा, मनाला भुरळ घालणारा आसमंत. पुढे या रस्त्याने पाच-सहा मैलांवर कृष्णाकाठचे मेणवली गाव लागते. गाव पेशवेकालीन आहे. येथे जुने वाडे आहेत. नाना फडणवीस यांचा वाडा आहे. वाड्याची रचना वेगळी व कल्पक आहे. नैसर्गिक रंगाची भिंतीचित्रे आहेत. नानांचा शिसमचा मोठा पलंग आहे. वाडा बराच पडझड झालेला आहे. आता तेथे नोकरचाकर राहतात. वाड्याचा बराच भाग बंदिस्त आहे. तेथेच कृष्णाकाठी चंद्रकोराकृती सुंदर घाट आहे. पुरातन मंदिरे आहेत. संथ वाहणारी कृष्णा नदी, आजूबाजूस दाट झाडी, त्यामुळे परिसर फारच निवांत, रमणीय आहे. पुढे त्याच रस्त्याने सात मैलांवर धोम गाव आहे. डाव्या बाजूस धोम धरण, गाव, कृष्णा नदी, सुंदर घाट, नृसिंह मंदिर व अप्रतिम शिल्पकलेचे काळ्या पाषाणातील शिवालय व यापुढील अनोखे नंदी मंदिर व छोटी किल्लेवजा गढी आणि सर्वत्र निसर्गरम्य परिसर. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनाला भुरळ घालणारी नीरव शांतता. आपल्याला गडबड-गोंगाटाची सवय, पण येथे वेगळाच अनुभव... जसे काय ऋषिमुनींचे तपस्यास्थान असावे. वाईस गेल्यावर मंदिरापासून जवळ, गावात बंडा जोशी यांची खाणावळ आहे. घरगुती सुग्रास जेवण मिळते. जेवणात वरण-भात, गरम घडीची पोळी, उसळ, आमटी, चटणी, कोशिंबीर, ताक असा जेवणाचा बेत असतो. जेवणाचे दरही स्वस्त आहेत. मन तृप्त होते. तेथून पुढे उजव्या बाजूच्या रस्त्याने बलकवडी धरण व धोम धरणाचा परिसर लागतो. धरणाच्या पाण्यात नौकानयन करून पुढे बलकवडी धरणासाठी जाता येते. धरणाचे काम अर्धवट आहे, पण परिसर निसर्गरम्य आहे. एक-दोन पुरातन मंदिरे आहेत. ते पाहून आपण त्याच रस्त्याने परत वाईस येऊन पुण्यास आठ वाजेपर्यंत सहज पोचू शकतो. सर्व प्रवास 130 किलोमीटरचा होतो. जर दोन दिवस अवधी असेल तर वाईस बऱ्यापैकी लॉज आहेत. आनंदवनसारखे मेणवली रस्त्यावर राहण्याचे, निसर्गाच्या सान्निध्यात, तेही स्वस्तात सोय असलेले ठिकाण आहे. दुसऱ्या दिवशी पाचगणीस जाऊन पाचगणी स्थळदर्शन करून आपण संध्याकाळी पुण्यास आरामात येऊ शकतो.
- सुभद्रा गोसावी

शिरसाड

शिरसाड एक दुर्लक्षित पर्यटन स्थळ. मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगाव या तालुक्‍याच्या ठिकाणापासून पूर्वेला 15 किलोमीटर अंतरावर बोरवाडी हे गाव सह्याद्रीच्या उंच शिखरांच्या पायथ्याशी वसले आहे. या परिसरामध्ये शिवकालात बऱ्याच लढाया झालेल्या असल्याने या परिसराला "शिरछाट'चा अपभ्रंश होऊन "शिरसाड' टप्पा, असे म्हटले जाते. या परिसरातील "बोरवाडी' (बारा वाड्यांचे प्रमुख आश्रयस्थान) या पायखस्त होत चाललेल्या गावातील शहरी भागात गेलेल्या लोकांनी एकत्र येऊन तेथील मंदिरांच्या परिसरात शासकीय मदतीशिवाय वृद्ध, रुग्णाइतांची सोय व्हावी या उद्देशाने "माऊली वृद्धाश्रम' चालविला आहे. सुमारे तेवीस लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक सोईंनी युक्त असलेल्या या आनंदाश्रमामध्ये तीस वृद्ध राहत आहेत. हा वृद्धाश्रम विठ्ठल-रखुमाई देवस्थान ट्रस्टमार्फत सशुल्क चालवला जातो. हा आश्रम पाहण्यासारखा आहेच, परंतु तेथे आलेल्यांची निवास व भोजनाची (शाकाहारी) अवस्था अत्यल्प दरामध्ये केली जाते. याच परिसरात किल्ले रायगड, मानगड, गांगवली (छ. शाहूमहाराजांचे जन्मस्थान) एक प्रचंड देवराई, ही ऐतिहासिक ठिकाणे आहेतच, त्याचबरोबर कुंभे (नियोजित जलविद्युत प्रकल्पस्थान) जोर, केळगण ही थंड हवेची ठिकाणे आहेत. तेथील खेडूत राहण्या-जेवणाचीही सोय करतात. मध्यमवर्गीयांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी ही ठिकाणे आहेत. त्याचबरोबर वृद्धाश्रमातील वृद्धांबरोबर गप्पा मारताना, तसेच "आपणाला कोणीतरी भेटायला आले आहे,' याचा त्या वृद्धांना होणारा आनंद होतो खासच आनंददायी अनुभव असतो. भ्रमंतीच?या आनंदाबरोबरच सामाजिक जाणिवेचा आनंदही या निमित्ताने मिळू शकतो. गटाने सहलींच्या दृष्टीनेही हा परिसर चांगला आहेच, गिर्यारोहण व निसर्गभ्रमण करणाऱ्यांना तर ही पर्वणीच ठरेल, असा हा परिसर आहे.
- साभार ः सकाळ

भीमाशंकर तव शरणम्‌

पावसाळा सुरू झाला की आषाढ संपून श्रावण कधी येतो ते कळतसुद्धा नाही. श्रावणात सह्याद्री पावसात न्हाऊन तृप्त झालेला असतो. त्याच्या अंगाखांद्यावरून पाण्याचे ओहोळ खळाळत असतात. रानहळदीची फुलं फुललेली असतात. अशाच एखाद्या श्रावणातल्या रविवारी पायथ्याच्या खांडस गावातून भीमाशंकरचा डोंगर चढायचा. संध्याकाळी भीमाशंकरला पोहोचले की वरती मुक्काम करायचा. दुसऱ्या दिवशी असतो श्रावणी सोमवार. भीमाशंकराचं पहाटे दर्शन करायचं. गुप्त भीमाच्या धबधब्याखाली भिजायचं. पुढच्या वर्षी पुन्हा येईन सांगून देवाचा निरोप घ्यायचा. कित्येक वर्षं श्रावणातला पहिला सोमवार मी चुकवला नव्हता. त्याच्या आठवणी अजूनही मन ताजंतवानं करतात. मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकापासून रिक्षाने खांडस गाव गाठायचं. खांडस गावाला सह्याद्रीची मुख्य रांग लागूनच आहे. खांडस गावातून भीमाशंकराची चढाई दोन टप्प्यांत करायची. त्यातला पहिला टप्पा चढण्यासाठी गणपती घाट व शिडी घाट असे दोन मार्ग आहेत. गणपती घाटात घाटाचं रक्षण करणाऱ्या देवतेचं, गणपतीचं मंदिर आहे. गणपती घाट तुलनेने चढायला सोपा आणि निसर्गरम्य आहे. गणपती घाटाने चढताना पदरगडाचं अतिशय सुंदर दर्शन होतं. घाट चढताना लागणारे ओहोळ व धबधबे प्रवासाचा शीण अजिबात येऊ देत नाहीत. गणपती घाटाने पहिला टप्पा चढायला चार तास लागतात. पहिला टप्पा चढायची अधिक जोखमीची वाट म्हणजे शिडीची वाट. ही वाट अधिक उभ्या चढणीची असून वाटेत तीन ठिकाणी शिड्या लावल्या आहेत. त्याशिवाय एका ठिकाणी वाट इतकी अरुंद आहे की दरीकडे पाठ करून कातळात केलेल्या खोबणीत दोन्ही हाताची बोटं रुतवून ती पार करावी लागते. शिडीने पहिला टप्पा चढायला तीन तास पुरेत. पहिला टप्पा संपून चढायचा दुसरा टप्पा सुरू होताना पठार लागतं. त्या पठारावर खांडस गावातून चढून येणाऱ्या शिडीची वाट व गणपती घाट या दोन्ही वाटा एकत्र येतात. येथून पुढे झिगझॅग चढणारी वाट दमछाक करायला लावते. दोनेक तासांच्या चढाईनंतर शेवटच्या टप्प्यात वाट दरीला समांतर होते, चढ कमी होतो. पावसाळ्यात आलात तर दरी धुक्‍याने भरलेली असते. पायाखालची वाटही दूरवर दिसत नाही. आपण स्वर्गात आहोत आणि थेट ढगात चालतो आहोत, असा भास होतो. अर्ध्या तासाच्या चालीनंतर आपण भीमाशंकराच्या पठारावर प्रवेश करतो. इथे धुकं असतंच, पण सोबतीला गार बोचरा वारासुद्धा असतो. पाचेक मिनिटं चालल्यावर धुक्‍यातूनच अंधुक गाड्यांचे हेडलाईट दिसायला लागतात आणि आपण भानावर येतो. अरे, या जादुई दुनियेत या गाड्या कुठून आल्या? गाडीतळापासून मंदिरापर्यंत उतरत्या पायऱ्यांची वाट आहे. तिथल्याच एखाद्या घरात आपली पथारी पसरायची. भीमाशंकरची उंची आहे 3250 फूट. श्रावणात पठारावर पाऊस सतत भुरभुरत असतो. भीमाशंकराच्या मंदिराचा कळस धुक्‍यात हरवून गेलेला असतो. भीमाशंकर मंदिराची बांधणी नागर किंवा उत्तर भारतीय पद्धतीची आहे. मंदिराशेजारीच मोक्षकुंड आहे. शंकराचं दर्शन झालं की जंगलात जाणाऱ्या वाटेने गुप्त भीमाशंकराकडे निघायचं. भीमा नदीच्या पात्रात तीन टप्प्यांत असणारा धबधबा आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याची उंची आहे सात फूट. तिथे कातळावर छोटी शिवलिंगं कोरली आहेत. मोठ्या कुंडात उगम पावलेली भीमा गुप्त भीमाशंकरला पुन्हा प्रगट होते असं म्हणतात. गुप्त भीमाशंकर पाहून परत येताना धबधब्याच्या आधी नदी ओलांडायची आणि वेगळ्या वाटेने मंदिराकडे परतायचं. या वाटेवरसुद्धा एक फोटोजिनिक धबधबा आहे. नाना फडणविसांनी मंदिराचा जीर्णोधार केला होता. वसई विजयाचं चिन्ह असणारी एक मोठी घंटा या मंदिर परिसरात आहे. भगवान शंकरांनी इथे त्रिपुरासुराचा वध केला होता. त्रिपुरारी पौर्णिमेला इथे मोठा उत्सव असतो. भीमाशंकर ते गुप्त भीमा दरम्यानच्या जंगलात तुम्हाला शेकरू दिसू शकतो. ही असते उडणारी खार. तपकिरी रंगाचा हा प्राणी त्याच्या पांढऱ्या झुबकेदार शेपटीसह सुंदर दिसतो. पावसाळा संपताना शेकरू त्याच्या झाडावरच्या घरट्याजवळ दिसू शकतो. गुप्त भीमाशंकराहून पुढे गेल्यावर अर्ध्या तासात रस्ता एका तिठ्यावर येतो. नदीच्या बाजूने जाणारा रस्ता जातो भोरगिरी किल्ल्यावर आणि नदी ओलांडून जाणारा रस्ता जातो वांद्रेवाडीला. वांद्रेवाडी-भीमाशंकर हा ट्रेकसुद्धा करण्यासारखा आहे. मुंबईहून कर्जतला जाताना भिवपुरी रोडहून वांद्रेवाडीची खिंड आपल्याला दिसते. भिवपुरी-वांद्रेवाडी-भीमाशंकर रस्ता कित्येक वर्षं फायलीमध्ये पडून आहे. भीमाशंकराच्या उत्तरेला असणाऱ्या अहुपे घाटातूनसुद्धा भीमाशंकर ट्रेक करता येतो. त्याशिवाय लोणावळा, तुंगार्ली, वळवण, मांजरसुंभा, कोंडेश्‍वर, कुसूर, सावळ, वांद्रेवाडी असा ट्रेकही करता येतो. भीमाशंकरला रस्त्याने यायचं, वर चाकण अथवा जुन्नर करत खेड मंचरला यायचं. इथून दोन तासांच्या घाट रस्त्यानंतर भीमाशंकरला पोहोचता येतं. राहण्या-जेवण्याच्या घरगुती स्वरूपाच्या सोयी इथे आहेत. हॉटेलं मात्र नाहीत. ज्योतिर्लिंग असल्याने देशभरातून भाविक इथे येत असतात. पण स्वच्छता, पाणी इत्यादी मूलभूत सुविधा इथे आढळत नाहीत. त्या लवकरच होतील अशी आशा. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात तुम्ही इथे याल तेव्हा किमान अपेक्षा ठेवून या. आंबेगाव व खेड तालुक्‍याच्या वादात या देवस्थानाचा विकास होईल तेव्हा होईल, ट्रेकर्सचं मात्र इथे स्वागत आहे. ओम शिव ओम शिव परात्वराशिव, ओंकाराशिव तव शरणम्‌! हे शिवशंकर भवानीशंकर, उमामहेश्‍वर तव शरणम्‌।
- मधुकरी धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट

युनिटyhai_malad@rediffmail.com">mailto:युनिटyhai_malad@rediffmail.com
साभार ः सकाळ

ट्रेक सह्याद्री...

ट्रेक सह्याद्री...

"राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा...' असं महाराष्ट्राचं वर्णन कुसुमाग्रजांनी करून ठेवलंय, ते खरंच आहे। हा दगडांचा देश आहे, पण या दगडांतूनही सौंदर्याच्या खाणी पसरल्या आहेत आणि त्यांचा अनुभव घ्यायला जावं लागतं सह्याद्रीच्या कुशीत...

पहिल्या दिवशीचा मुक्‍काम असेल कर्जत येथील बेस कॅम्पला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या खऱ्या पदभ्रमणाला सुरुवात होईल. कोंदिवडे गावातून आपण निघू राजमाचीच्या रोखाने. संपूर्ण चढाईचा दिवस. मात्र ही चढाई नुसती चढाई नाही. या वाटेवर आपण पाहणार आहोत "कोंढाणा लेणी'. या लेण्यांना "कोंढाणा लेणी' म्हटलं जातं ते या लेण्यांच्या पायालगत असलेल्या कोंढाणा या गावाच्या नावावरून; मात्र या गावातून येणारा रस्ता जास्त खडतर असल्यानं आपण कोंदिवडे गावातून या लेण्यांकडे येणार आहोत. ज्या वाटेनं आपण चालणार, तो कोणे एके काळी राजमार्ग असावा. कारण या वाटेवर असणारी कोंढाणा लेणी आणि डोंगरांच्या माथ्यावर असणारा राजमाची किल्ला. लेण्यांची निर्मिती ही नेहमीच राजसत्तेच्या संरक्षणाखाली आर्थिक मदतीने करण्यात आलेली आहे. अत्यंत नाजूक कलाकुसरीने नटलेली ही लेणी ख्रिस्त जन्मापूर्वी सुमारे 200 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली असावीत, असं म्हटलं जातं. ही अती प्राचीन लेणी पाहून आपण दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेऊन राजमाचीकडे प्रस्थान करतो. संध्याकाळी पोहोचतो. मोहिमेचा तिसरा दिवस आपण राजमाची किल्ल्याच्या प्रदेशात घालविणार आहोत. मनरंजन व श्रीवर्धन ही किल्ल्यांची जोडगोळी म्हणजेच "राजमाची किल्ला'. थेट ख्रिस्तपूर्ण 200 वर्षे जुना. राजमाची वळलाय तो कुसूर घाटाच्या तोंडावर आणि जोडला गेलाय 300 मी. लांब सह्याद्रीच्या रांगेशी. संपूर्ण परिसर घनदाट अरण्यानं वेढलेला, विविध प्रकारच्या वन्य श्‍वापदांनी संपन्न. पूर्वेच्या बाजूला श्रीवर्धन, तर पश्‍चिमेस मनरंजन हे दोन बालेकिल्ले. त्यांच्या मधल्या खिंडीत वसलंय भैरोबाचं मंदिर. याच परिसरात राजमाचीच्या दक्षिणेस दूरवर आपणास दिसतो ड्यूक्‍स नोज, तर नैऋत्येस ढाक भैरी. 1648 मध्ये हा किल्ला हिंदवी स्वराज्यात आला आणि त्यानंतर शेवटी 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. ट्रेकच्या चौथ्या दिवशी आपण राजमाचीहून कार्ला लेण्यांकडे निघणार आहोत. वाटेत लागणारं शिरोड धरण, त्याचा जलाशय पाहणार आहोत. महाराष्ट्रात जी अत्यंत महत्त्वाची अशी लेणी आहेत, त्यातील एक "कार्ला लेणी.' इंद्रायणी नदीच्या विस्तीर्ण प्रदेशात उंच डोंगरात खोदलेली. कार्ले हे गाव दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध. एकवीरा मातेचं मंदिर आणि लेणी. एकवीरा हे कोळी बांधवांचं आराध्य दैवत. याच मंदिराच्या मागच्या बाजूस लांबलचक डोंगरात खोदली गेलीत बौद्धकालीन लेणी. या लेण्यांची निर्मिती अदमासे ख्रिस्तपूर्व 100 वर्षे इतकी जुनी आहे. मुख्य लेण्यातील स्तूप हा "स्तूप' या शब्दाची व्युत्पत्ती समजाविणारा सध्या अस्तित्वात असलेला एकमेव स्तूप आहे. सकाळी उठून आपण निघणार आहोत आपल्या शेवटच्या मुक्कामाच्या दिशेने, अर्थात लोहगडाकडे. वाटेत मळवली रेल्वेस्थानक लागतं. हा परिसर पक्षी निरीक्षणासाठी अगदी योग्य आहे. विविध प्रकारचे पक्षी आपल्याला या परिसरात पहाटेच्या वेळी पाहायला मिळतात. भाजे गावाकडे आपण कूच करतो. या गावाच्या पूर्वेस असलेल्या डोंगरातील लेण्यांकडे जाणारी पायऱ्यांची वाट आपल्याला भाजे लेण्यांकडे घेऊन जाते. महाराष्ट्रातील "सर्वात प्रथम खोदली गेलेली लेणी' असा भाजे लेण्यांचा उल्लेख केला जातो. ख्रिस्तपूर्व 240 वर्षे खोदलेली ही लेणी. या ठिकाणी एकंदर 20 गुहा असून त्यामध्ये दोन चैत्य, अशी रचना आहे। ख्रिस्तपूर्व 270 वर्षं सुरू झालेलं या लेण्यांचं खोदकाम इ.स. 1200 पर्यंत अखंड चालू होतं. या लेण्यांतील स्तूप हा दगडात कोरलेला आहे. ही लेणी पाहून आपण विसापूर किल्ल्यावर येतो. येथील तटबंदी, तोफ फिरविण्याची जागा इत्यादी गोष्टी पाहून आपण दक्षिणेतील घळीतून खाली उतरतो. ही उतरणसुद्धा थोडी जोखमीचीच, पण मजेशीर, एक वेगळा अनुभव देणारी. संध्याकाळ झालेली असते. सूर्य मावळतीकडे झुकलेला असतो. लोहगडाची सावली विसापूरचं चुंबन घेत असते आणि आपण लोहगडाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतो... आजचा मुक्काम लोहगडावरच! .... सकाळ. आज ट्रेकचा शेवटचा दिवस. मनात परतीचे वेध लागलेले असतात. आज आपण लोहगड पाहणार आहोत. शिवकालात सुरतेची लूट येथेच ठेवून महाराज राजगडाकडे प्रस्थान करते झाले. सातवाहन - बहामनी - निजामशहा - आदिलशहा - मराठे - मुघल - मराठे - मुघल - कान्होजी आंग्रे - पेशवाई अशी राजवटींची श्रृंखला अनुभवलेला हा किल्ला अखेर तोफेचा एकही गोळा न फेकता निमूटपणे इंग्रजांच्या हवाली झाला. या गडावरील लोमेश ऋषींची गुहा, चार दरवाजे, विंचू काटा या काही उल्लेखनीय वास्तू. असा हा लोहगड पाहून आपण लोणावळ्याच्या दिशेने निघतो.
- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट।
yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

रामसेज, वाघेरा, खैराई

रामसेज, वाघेरा, खैराई

नाशिक पेठ रस्त्यावरच्या जकात नाक्‍यापुढे आशेवाडी गाव आहे. आतिथ्यशील गावकऱ्यांच्या आशेवाडीत मारुतीचं प्रशस्त मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारून छोटेखानी रामसेज किल्ल्यावर चढाई करता येते. आशेवाडीच्या दिशेला दिसणारा रामसेजचा बुधला डावीकडे ठेवत पुढे गेल्यावर रामसेज किल्ल्यावर चढणाऱ्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांनी वर चढून आल्यावर गडावर प्रवेश करण्यापूर्वी रामाचं मंदिर आणि थंडगार पाण्याची टाकी आहे. मारुती ते राम, हे अंतर आहे फक्‍त एका तासाचं! रामसेज गडमाथ्यावर कोरडी पाण्याची टाकी, पडक्‍या जोत्याचे अवशेष आहेत. माथ्यावर सुस्थितीत असलेलं मंदिर आहे. त्यात वा रामाच्या मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते. आशेवाडीकडला बुधला व त्याजवळच ध्वजस्तंभ ही गडफेरीत करण्याची इतर ठिकाणं. रामसेजवरून समोर प्रशस्त भोरगड दिसतो. संरक्षण यंत्रणांची रडार सिस्टिम असल्याने भोरगडावर मात्र आपल्याला प्रवेश नाही. दिसायला छोटा असणाऱ्या रामसेजवर मोठा इतिहास घडलेला आहे. मुघलांविरुद्ध तब्बल पाच वर्षं या किल्ल्याने टिकाव धरला होता. एकेक किल्ला असा पाच वर्षं लढवण्याच्या क्षमतेतच स्वराज्याचं सामर्थ्य दडलं होतं. रामसेजवरून पुन्हा नासिककडे येताना म्हसरूळनजीक जैन चांभारलेणी आहेत. वेळ असल्यास ती जरूर पाहून घ्यावीत. म्हसरूळकडून एक रस्ता थेट वाघेऱ्यापर्यंत जातो. वाघेरा घाटमाथ्यावरचं गाव आहे. गावाच्या समोरच एक मोठा बंधारा व जलाशय आहे. जलाशयाच्या पाठी उभा आहे उंच वाघेरा. वाघेऱ्याचे कडे थेट घाटाखाली उतरलेले आहेत. धरणाच्या पाण्यावर व सुपीक जमिनीवर शेती करणाऱ्या गावकऱ्यांना वाघेरा किल्ल्याचा रस्ता विचारायचा. वाघेरा जलाशयाचा बांध उजवीकडे जिथे वाघेऱ्याच्या सोंडेला चिकटलेला वाटतो, त्या डोंगरधारेवरून गडावर चढाई करायची. घाटाखाली उतरलेल्या गडाच्या उंचच उंच कातळभिंती उजवीकडे ठेवत गडाची माची गाठायची. पाठीवर सामान नसल्यास माची गाठायला एक तास पुरे. माचीवरून वाघेऱ्याचा उंच सुळकेवजा उंचवटा, गडमाथा दिसतो. दहा-एक मिनिटांच्या सोंडेवरील सपाट चालीनंतर गडाच्या सुळकेवजा गडमाथ्याला भिडायचं. इथे पाण्याची कोरडी टाकी आहेत. इथून गडमाथा गाठायला दोन वाटा आहेत. गडमाथा डावीकडे ठेवत वळसा घालून चढणारी निसरडी वाट अथवा सोपं 10 फुटांचं प्रस्तरारोहण करून सरळ वर चढणारी कातळाची वाट. कोणत्याही वाटेने गडाचा सुळकेवजा माथा गाठायचा. तिथे उघड्यावर शिवलिंग आहे. फडकणाऱ्या भगव्या झेंड्याबरोबर गड सर झाल्याबद्दल ग्रुप फोटो काढायचा. अंजनेरी, ब्रह्मगिरी आणि आजुबाजूच्या परिसरावर नजर फिरवायची आणि परतीला लागायचं. वाघेरा गावातून गडमाथा गाठायला आणि स्थलदर्शनासाठी दोन तास पुरे. गडावर पाणी नसल्याने वा सावलीसाठी झाड नसल्याने सोबत आणलेलं पाणी प्यायचं आणि आल्या वाटेने गड उतरायचा. वाघेऱ्यातून घाट उतरून हरसूल गाठायचं. हरसूवरून ओझरखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाणापाडा आहे. ठाणापाड्याला आश्रमशाळेसमोरून खैराई किल्ल्यावर चढाई करायची. निघताना टॉर्च घ्यायला मात्र विसरायचं नाही. खैराई किल्ला फारसा प्रसिद्ध नसलेला, दुर्लक्षित. ट्रेकिंगसंबंधीच्या पुस्तकात त्याचा उल्लेख नाही. नासिकचे हेमंत पोखरणकर यांनी त्याबद्दल माहिती पुरवली म्हणून आम्ही हा किल्ला करू शकलो. आश्रमशाळेसमोरून खैराई माचीवरचा माचीपाडा गाठायला पाऊण तास पुरे. माचीपाड्यातल्या गावकऱ्यांचं आतिथ्य स्वीकारून गड चढायला लागायचं. माचीवर पोहोचल्यावर डौलदार, बहरलेलं शेत आपलं स्वागत करतं. संध्याकाळी ते पिवळं शेत सोनेरी दिसू लागतं. माचीच्या टोकाला गडाजवळ दुतर्फा घरं आहेत. लुसलुशीत कोकरांबरोबर फोटो काढून झाले की गड चढायचा. गडाला बऱ्यापैकी तटबंदी आहे. माचीपाड्याकडला बुरुज नाक्‍यासमोर ठेवून चढत राहायचा. अर्ध्या तासाने आपण एका टेपावर येऊन पोहोचतो. इथून बुरुजाकडे तुटलेल्या तटावरून गडावर प्रवेश करता येतो. अथवा बुरूज व गडमाथा उजव्या अंगाला ठेवून गडमाथ्याला वळसा घालून गडाच्या पश्‍चिमेकडून गडावर सोप्या वाटेने प्रवेश करायचा. खैराईचा गडमाथा छोटेखानीच आहे. पण मनाला प्रसन्न वाटतं. गडावर पाण्याची टाकी आहेत. त्यातलं पाणी पावसाळ्यात पिण्यास हरकत नाही. गडाच्या तटावरून गड-प्रदक्षिणा करता येते. गडावर उघड्या मंदिराकडे दोन लहान तोफा पडलेल्या आहेत. मावळतीच्या रंगात गड फारच सुंदर भासतो. मावळणाऱ्या सूर्याला दंडवत घालून अंधार पडण्यापूर्वी माचीपाडा गाठायचा. माचीपाड्यावरून सोप्या वाटेने आल्याप्रमाणे ठाणापाडा गाठायचं. स्वतःची गाडी सोबत असेल व चालणारे भिडू असतील तर एका दिवसात हे तिन्ही किल्ले पाहून मुक्कामाला त्र्यंबकेश्‍वर वा अंजनेरी गाठता येतं. वाघेरा घाटाच्या खालचा खैराई तांत्रिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यात असला तरी भौगोलिकदृष्ट्या तो ठाणे जिल्ह्यात वाटतो. नाशिक त्र्यंबकेश्‍वरच्या आसपासच्या या किल्ल्यांची सफर आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते.
- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट
yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

सहा दिवसांत सह्याद्री सर!

सहा दिवसांत सह्याद्री सर!

सह्याद्री म्हटलं की आपल्याला आठवतात घाट आणि खंडाळा-लोणावळा म्हटलं की आठवतात पावसाळी सहली। पण यापलीकडे सह्याद्री आणि खंडाळा-लोणावळा आहेतच की! मुळात खंडाळा-लोणावळा आहेत ते सह्याद्रीच्या कुशीतच... तिथलेच हे सहा दिवस...

पहिला दिवस लोणावळ्याजवळचं कार्ला गाव. एकवीरा आईचा डोंगर व त्यापाठी कोरलेली हिनयान पंथाची सर्वोत्कृष्ट लेणी. लेण्यासमोर सोळा कोनांचा स्तंभ उभा आहे. लेण्यातली हत्तीची शिल्पं नजर लागण्याइतकी जिवंत आहेत. लेण्यामधील चैत्यावर दोन हजार वर्षांपूर्वीची लाकडी छात्रावली आहे. एकवीराला बेसकॅम्प असणार आहे. रिपोर्टिंगनंतर नवीन वातावरण रुळण्यासाठी ट्रेकर्स कार्ला लेणी, एकवीरा मंदिर व कार्ला टॉप, जेथून शिरोटा लेकचं सुंदर दर्शन होतं, तिथवर एक छोटा ट्रेक करतील.
दुसरा दिवस कार्ल्यापासून पाच किमी अंतरावर भाजे लेणी आहेत. इस पूर्व 250 मधली ही लेणी महाराष्ट्रातली आद्य लेणी आहेत. ऐरावतावरील इंद्र व चार घोड्यांच्या रथावरील सूर्य यांच्या प्रतिमा लेण्यात कोरल्या आहेत. भाजे लेणी पाहून आपण जाणार आहोत ते विसापूर किल्ल्यावर. प्रचंड विस्तार असणारा हा किल्ला आहे. लांबलचक तटबंदी व तटावर जागोजागी कोरलेले संरक्षक मारुती हे या गडाचं वैशिष्ट्य. गडावर जमिनीवर बांधलेला गोलाकार बुरुज आहे. विसापूर उतरून आपण लोहगडवाडीत येणार. तेथून पायऱ्यांच्या वाटेने गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा व शेवटी महादरवाजा असं करत आपण गडावर येऊन पोहोचू. लोहगडाचं मुख्य आकर्षण आहे ते विंचूकाटा. दुहेरी तटबंदी असणारी ही माची. दोन्ही बाजूस गर्द झाडी असणारी. गडावरील लोमेश ऋषीच्या गुहेत आपण मुक्काम करणार आहोत.
तिसरा दिवस आज आपण लोहगड उतरायचा. पवना धरण पाहून लोणावळ्यात यायचं. तेथून पुढे खंडाळ्याची वाघदरी पाहायची आणि कुणे गावात यायचं. कुणे गाव दरीच्या तोंडावर वसलं आहे. तेथून खंडाळा घाट आपल्याला सतत खुणावत राहतो. आजचा मुक्काम कुणे गावात खंडाळ्याच्या कुशीत.
चौथा दिवस कुणे गावातून पाच तासांचा ट्रेक करून आपण पोहोचतो राजमाचीला. राजमाचीला दोन बालेकिल्ले आहेत. पूर्वेकडला श्रीवर्धन, तर पश्‍चिमेकडला मनरंजन. ते आपण उद्या पाहणार आहोत. आज आराम करायचा. संध्याकाळी राजमाचीच्या तळ्यावरील मंदिराकडून सूर्यास्त पाहायचा. हे मंदिर अलीकडेच गावकऱ्यांनी उत्खनन करून शोधून काढलं आहे. आजचा मुक्काम राजमाचीकरांच्या घरात.
पाचवा दिवस श्रीवर्धन व मनरंजन आणि त्यामधोमध आहे बहिरोबाचं मंदिर. उठेवाडीतून सोप्या वाटेने मनरंजनवर चढायचं. इथे पाण्याची टाकी, जोत्यांचे अवशेष दिसतात. इथून कर्नाळा, प्रबळगड, इर्शाल, ठाक हे किल्ले दिसतात. मनरंजन पाहून बहिरोबाच्या मंदिराकडून श्रीवर्धन चढायचा. याची उंची मनरंजनपेक्षा जास्त आहे. शाबूत असणारी तटबंदी. टोकांकडले दुहेरी तट असणारे चिलखती बुरुज व पाण्याची असंख्य टाकी. राजमाची पाहून झाला की संध्याकाळी पुन्हा तलावाकडे यायचं ते ट्रेझर हंटसाठी. आजचा मुक्काम राजमाचीवरच.
सहावा दिवस आज सकाळीच राजमाची उतरायला लागायचं ते उल्हास व्हॅलीच्या बाजूला. खाली दिसणारी उल्हास, नदीसमोर दुसऱ्या अंगाला खंडाळा घाटातलं ठाकूरवाडी स्टेशन. तीन तासांत आपण पोहचतो ते कोंडाणा लेण्यांकडे. आठ चैत्यविहार असणारी कोंडाणे लेणी इतकी सुबक आहेत की लाकडात कोरीव काम केल्याप्रमाणे भासतात. पिंपळपानाच्या आकाराची लेण्याची कमान खूपच सुंदर आहे. लेण्यांकडून तासाभरात कोंदीवडे गावात पोहचायचं. तिथे आपला पदभ्रमणाचा कार्यक्रम संपतो. तिथून रिक्षाने कर्जत स्टेशन गाठायचं
मधुकर धुरी, YHAI मालाड युनिट
yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

महाराष्ट्रातील आद्य लेणी

महाराष्ट्रातील आद्य लेणी

लोणावळ्याच्या पुढच्या स्टेशनावर, मळवलीला उतरलात, तर एक वेगळाच ट्रेक अनुभवायला मिळतो... हा आहे लोहगड-विसापूर-कार्ले-भाजे ट्रेक... मळवलीच्या एका अंगाला आहेत कार्ल्याची लेणी, तर दुसऱ्या अंगाला भाज्याची लेणी आणि लोहगड-विसापूरची जोडगोळी...

मुंबईहून पुण्याला आपण अनेक वेळा जातो. लोणावळा हे तर पावसाळ्यातलं आपलं आवडतं ठिकाण असतं. पण लोणावळ्याच्या पुढच्या स्टेशनावर, मळवलीला उतरलात, तर एक वेगळाच ट्रेक अनुभवायला मिळतो... हा आहे लोहगड-विसापूर-कार्ले-भाजे ट्रेक... मळवलीच्या एका अंगाला आहेत कार्ल्याची लेणी, तर दुसऱ्या अंगाला भाज्याची लेणी आणि लोहगड-विसापूरची जोडगोळी. हिनयान पंथाची सर्वोत्कृष्ट लेणी म्हणून कार्ल्याच्या लेण्यांचा उल्लेख करावा लागेल. या लेण्यांमध्ये मुळात चैत्यगृहाच्या समोर दोन सोळा कोनांचे स्तंभ होते. त्यापैकी एक स्तंभ संपूर्ण तुटला आहे, नाहीसा झाला आहे. हे दोन्ही स्तंभ सारखे होते. जो एक स्तंभ आता तिथे शिल्लक आहे, त्या स्तंभाच्या वर चार सिंहांचं शिल्प आहे. लेण्यांमध्ये जिवंत वाटतील अशी हत्तींची पूर्णाकृती शिल्पं आहेत. अनेक दानशूर, युगुलांची शिल्पं लेण्यात कोरली आहेत. चैत्यावर दोन हजार वर्षांपूर्वीची लाकडाची छत्रावली आहे. लेण्यात प्रवेश करण्यापूर्वी प्रसिद्ध एकवीरा देवीचं मंदिर आहे. नवस करण्यासाठी व फेडण्यासाठी आगरी-कोळ्यांची व भक्तांची तिथे सतत रीघ लागलेली असते. कार्ले लेण्याच्या समोर विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी भाज्याची लेणी आहेत. ही लेणीसुद्धा हिनयान पंथी आहेत. महाराष्ट्रातली आद्य लेणी म्हणून भाज्याच्या लेण्यांचा गौरव होतो. इसवीसनापूर्वी 240मध्ये ही लेणी खोदली असावीत. चैत्यगृहाचे कलते खांब व लाकडी फासळ्या येथे पहावयास मिळतात. ऐरावतावरील इंद्र व चार घोड्यांच्या रथावरील सूर्य यांच्या प्रतिमा लेण्यात कोरल्या आहेत. लेण्याजवळ व लेण्याला जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात अनेक धबधबे असतात. पुणेरी पर्यटक या धबधब्यांवर गर्दी करतात. भाजे गावातून गाय खिंडीपर्यंत चढावाची बैलगाडीची वाट आहे. गायखिंडीतून उजवीकडे लोहगड, तर डावीकडे विसापूर किल्ल्यावर जाता येतं. डावीकडच्या वाटेने पंधरा मिनिटं चाललं की सरळ जाणारी मोठी वाट सोडून द्यायची. सरळ वाट बोडसे लेण्याकडे जाते. वरती डावीकडे विसापूरची तटबंदी दिसत असते. वाहणाऱ्या पाण्यातून पुढे सरकणारी घसरड्या दगडांची ही वाट वर चढते. चढायला साधारण अर्धा तास पुरे... विसापूरच्या माथ्यावर प्रचंड, विस्तीर्ण पठार आहे. लांबच लांब सरळ गेलेली तटबंदी, जागोजागी तटावर कोरलेले संरक्षक मारुती हे या गडाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. गडावर एक गोलाकार बुरुज आहे. त्यावर पूर्वी तोफ असावी. वर उल्लेख केलेल्या वाटेव्यतिरिक्त मळवलीकडून दोन वाटा गडावर चढून येतात. आल्या वाटेने विसापूर उतरून लोहगड वाडीत यायचं. लोहगडपर्यंत अलीकडे डांबरी सडक आली आहे. लोहगडवाडीतून पायऱ्यांच्या वाटेने लोहगड चढू लागलो की गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि शेवटी महादरवाजा असे आखीव-रेखीव दरवाजे आपल्याला लागतात. गडाचं मुख्य आकर्षण त्याचा विंचुकाटा आहे. दुहेरी तटबंदी असलेली ही माची उतरत जाते. माचीच्या टोकाकडल्या बुरुजाकडून विहंगम दृश्‍य दिसतं. माचीच्या तटावरून चालताना खालची दाट झाडी आपली साथ करते. सुरतेच्या पहिल्या लुटेच्या वेळी आणलेला खजिना लोहगडावरील लक्ष्मी कोठीत आला होता. इथल्या लोमेश ऋषींच्या गुहेत मुक्काम करण्याची मजा काही औरच आहे. कोकणावर विजय मिळवू इच्छिणाऱ्या मुघलांच्या सैन्याला, कारतलबखानाला लोहगडापाशी उंबरखिंडीत गाठून महाराजांनी खानाचा सपशेल पराभव केला होता. मळवलीहून लोहगडाच्या बाजूने मोठ्या मिजाशीने खानाचं सैन्य गेलं होतं कोकण जिंकायला. चारीमुंड्या चीत होऊन नामुष्कीचा पराभव कारतलबखानाच्या नशिबी आला. या पराक्रमाची गाथा कल्पनेत अनुभवण्यासाठी हा ट्रेक करायला हवा.
- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल, मालाड युनिट
yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

नाच रे मोरा...!!

नाच रे मोरा...!!
"नाचरे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच!' लहानपणापासून कित्येक वेळा आपण हे गाणं ऐकलेलं असतं। मग कधीमधी राणीच्या बागेत आपण त्याला प्रत्यक्ष पाहिलेलं असतं. तेव्हापासून मोर आपल्या मनामध्ये घर करून बसलेला असतो. पूर्वी गावागावांत माळरानावर हमखास दिसणारा मोर अलीकडे मात्र सहज दिसेनासा झाला. गावाकडे मोराला हमखास बघायचं असेल, तर तुम्हाला यावं लागेल ते पुणे जिल्ह्यातल्या मोराच्या चिंचोलीला. पुण्याच्या ईशान्येला 50 कि.मी. अंतरावर एक अनोखं गाव वसलंय, ज्याचं नाव आहे मोराची चिंचोली. पुणे-नाशिक रस्त्याच्या राजगुरुनगर वा पुणे-नगर रस्त्यावरच्या शिक्रापूर इथून मोराच्या चिंचोलीला जाता येतं. मोराचं संरक्षण व संवर्धन करण्याचं काम या परिसरातल्या गावकऱ्यांनी मनापासून केलं. त्यामुळे या परिसरात मोरांची संख्या एवढी वाढली, की एका माणसामागे एक मोर, अशी परिस्थिती झाली. शेकडोने मोर पाहायला मिळत असल्याने पर्यटनाच्या नकाशावर मोराची चिंचोली प्रसिद्ध पावते आहे. चिंचोलीमध्ये चिंचेची भरपूर झाडं आहेत. सकाळी जरा उजाडलं, काळोख सरून दिसायला लागलं, की झाडांच्या शेंड्यावरून मोर खाली उतरतात. सकाळी सहा ते आठ हा मोर बघायला सर्वोत्तम काळ. शिवारात जिथे नजर टाकाल तिथे मोर आणि लांडोर दिसतात. पर्यटकांच्या सोयीसाठी "जय मल्हार कृषी विकास प्रतिष्ठान' यांनी विशेष सोय केली आहे. एका मोठ्या चौथऱ्यावर मोरांसाठी दाणे टाकलेले असतात. तिथे एकाच जागेवर अनेक मोर आपल्याला पाहायला मिळतात. शिवारात सर्वत्र मोर फिरत असतात; मात्र त्यांच्या फार जवळ जाता कामा नये, नाहीतर ते पळून जातात. साधारण 40 ते 50 फुटांवरून तुम्ही त्यांचं निरीक्षण करू शकता. एवढ्या अंतरावरून फोटो काढण्यासाठीचा कॅमेरा तुमच्याकडे हवा. उन्हं वर चढू लागली, की मोर पुन्हा दिसेनासे होतात. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी मोराच्या चिंचोलीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये ग्रामीण जीवनाचा अनुभव शहरी पर्यटकांना घेता यावा यादृष्टीने विविध देखावे आणि वस्तू मांडल्या आहेत. चिंचोलीच्या ओढ्याकाठच्या उद्यानात झोपाळ्यावर तुम्ही उंचच उंच झोके घेऊ शकता. बमी ब्रीजवर चालू शकता, बैलगाडीतून रपेट मारू शकता. पुन्हा संध्याकाळी चिंचोलीतल्या तळ्यावर मोरांच्या पाठी हिंडू शकता. मोराच्या चिंचोलीहून परत आल्यावर मात्र इतर चार लोकांना त्याबाबत सांगा, त्यामुळे इथल्या पर्यटनाला चालना मिळेल. मोराच्या चिंचोलीइतकंच अनोखं अजून एक अप्रूप इथून जवळच आहे. कुकडी नदीच्या पात्रातील रांजणकुंड. कुकडी नदी ही पुणे व नगर जिल्ह्याची सीमा आहे. नगर जिल्ह्यांत निघोज व पुणे जिल्ह्यातलं टाकळीहाजी या नदीच्या तीरावरील गावांदरम्यान नदी पात्रात अनेक रांजणकुंडं निर्माण झाली आहेत. नदीच्या पाण्याबरोबर गोल गोल फिरून छोटे छोटे दगड मोठ-मोठ्या रांजणाच्या आकाराचे खळगे तयार करतात. त्यात पाणी घुसळून घुसळून त्याचा आकार मोठा होत जातो. मग दोन बाजूबाजूचे रांजण खड्डे एकमेकांना छेदतात व मोठा रांजण तयार होतो. त्यातून वाहणारं निळंशार पाणी व किनाऱ्यावरील मंदिर आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातं. मुद्दाम पाहावं असं हे ठिकाण आहे. मोराची चिंचोली व रांजणकुंडं बघून झाली, की रांजणगावचा गणपती जवळच आहे. गणरायाचं दर्शन करायचं आणि सरत्या दिवसाच्या स्मृती जागवत आपापल्या गावी प्रस्थान करायचं.
- मधुकर धुरी युथ हॉस्टेल मालाड yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

मालवण

मालवण
माझा जन्म कुडाळचा. त्यामुळे कोकणाबद्दल, त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल मला विशेष प्रेम. युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या गोवा राज्य शाखेने आयोजित केलेल्या फॅमिली कॅम्पिंगसाठी चार दिवस गोव्यात होतो. येताना चार दिवस मालवणला मुक्काम केला. मालवणात राहून पाहता येतील अशा ठिकाणांची ही तुमच्यासाठी ओळख...
मालवणची भौगोलिक रचना खास आहे. पश्‍चिमेला अथांग अरबी समुद्र. पूर्वेला कासारटाक्‍याची घाटी. उत्तरेला गड नदीची खाडी, तर दक्षिणेला कर्ली नदीची खाडी. या दोन्ही नद्या समुद्राला मिळण्याआधी समुद्राला समांतर वाहतात. त्यातून जमिनीची एक चिंचोळी पट्टी तयार झाली आहे. शंभरएक मीटर रुंदीची. या चिंचोळ्या पट्टीच्या पश्‍चिमेला आहे समुद्रकिनारा, तर पूर्वेला नदी किनारा. एका बाजूला समुद्राची गाज, तर दुसऱ्या बाजूला माडांच्या बनातून वाहणारी शांत नदी. कर्ली नदीच्या चिंचोळ्या पट्टीत तारकर्ली वसलंय. नदीच्या मुखाजवळ आहे देवबाग, तर समोरच्या किनाऱ्यावर आहे भोगवे. गडनदीच्या पट्टीतलं गाव तोंडवळी, मुखाजवळ आहे तळाशील आणि दुसऱ्या किनाऱ्यावर वसलंय रेवंडी. मालवणच्या दक्षिणेला सात किलोमीटरवर आहे तारकर्ली. लांबच लांब विस्तीर्ण समुद्रकिनारा तारकर्लीला लाभलेला आहे. एमआयडीसीने तारकर्लीला प्रसिद्धी मिळवून देण्यात विशेष हातभार लावलाय. तारकर्लीपासून पाच किलोमीटर दक्षिणेला असणाऱ्या देवबागपर्यंत कर्ली नदी समुद्राला भेटायला वाहत येते. तारकर्ली ते देवबाग गाडीरस्ता उपलब्ध आहे. देवबागला बोटीत बसायचं आणि कर्ली नदी समुद्राला मिळते त्याच्या दुसऱ्या किनाऱ्यावर असणाऱ्या भोगवे बीचवर उतरायचं. देवबाग भोगवे सफरीदरम्यान शेकडो सीगल पक्षी तुम्हाला पाहायला मिळतात. भोगवे किनारा पाहून झाला, की पुन्हा बोटीत बसायचं, निघायचं निवतीकडे. समुद्रकिनारी टेकडीवर निवतीचा किल्ला आहे बीचला लागूनच. निवती, भोगवे दोन्ही समुद्रकिनारे अतिशय रमणीय व सुंदर आहेत. देवबागहून बोटीने या किनाऱ्यांना भेट देण्यात विशेष मजा आहे. या बोट सफरीचं अजून एक आकर्षण आहे, ते म्हणजे डॉल्फिन. निवतीजवळच्या समुद्रात डॉल्फिन हमखास बघायला मिळतात आणि देवबागचे बोटवाले तुम्हाला डॉल्फिन दाखविल्याशिवाय हार मानत नाहीत. मात्र तुम्ही नेमकी वेळ गाठायला हवी आणि थोडीफार नशिबाने साथ द्यायला हवी. तीन-चार तासांच्या या सफरीचं 10 जणांचं मिळून 800 रु. भाडं आहे. तुमचे स्वतःचे 10 जण नसतील, तर मात्र दरडोई अधिक खर्च सोसायची तयारी हवी. देवबाग, तारकर्ली करीत कर्ली नदीतून लक्ष्मीनारायणाचं सुप्रसिद्ध मंदिर असणाऱ्या वालावलपर्यंत जर तुम्हाला बोटिंग करण्याची संधी मिळाली, तर मात्र सोन्याहून पिवळं; पण त्यासाठी योग्य ती किंमत मोजायची तयारी हवी. देवबागची नदी व समुद्रकिनारा दृष्ट लागण्याइतका स्वच्छ व नितळ पाण्याचा आहे. देवबाग कर्ली नदीइतकाच सुंदर किनारा आहे तळाशील गड नदीचा. गड नदी समुद्राला भेटायला येते ती तोंडवलीपासून. तळाशीलपर्यंत समुद्राला समांतर वाहते. मालवण, हडी, तोंडवली, तळाशील असा गाडीरस्ता उपलब्ध आहे. नदीच्या एका बाजूला तोंडवली, तळाशील, तर दुसऱ्या बाजूला ओझर, रेवंडी, कोळंब आहे. ओझरची ब्रह्मानंद स्वामींची असणारी गुहा व पाण्याचा झरा बघण्यासारखा आहे. ओझरजवळ आहे रेवंडी. मालवणचा सुपुत्र "वस्त्रहरण'कार मच्छिंद्र कांबळींचं गाव. गावात भद्रकालीचं मंदिर आहे. रेवंडीतल्या तरीवरून तळाशीलला बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तळाशीलची मच्छिमारांची वस्ती संपली, की बांद्याच्या पुढे ओसाड बेट आहे. त्यावरून गड नदीच्या मुखाचं सुंदर दर्शन होतं. रेवंडीतूनसुद्धा गड नदी समुद्राला मिळते ती जागा बघण्यासारखी आहे. तोंडवळीचा सुरूचा किनारा, तळाशीलचा माडांच्या चिंचोळ्या पट्टीचा किनारा खास बघण्यासारखा. खुद्द मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्याबरोबरच बघण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. तिथला मासळीबाजार, अनेक मंदिरं, रॉक गार्डन, चिवळा आणि त्याला लागून असलेला कोळंबचा समुद्रकिनारा अशा ठिकाणी सहज जाता येतं. महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेलं मालवण गाव. इथे येऊन सिंधुदुर्ग किल्ला न पाहिला तर काय पाहिलं? मालवणच्या जेटीवरून किल्ल्यात जायला बोटी उपलब्ध आहेत. राजाराम महाराजांनी स्थापन केलेलं महाराजांचं मंदिर, फांदी असणारं माडाचं झाड, दुधबाव, दहीबाव, महाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा, राणीची वेळा इत्यादी पाहताना वेळ कसा पटकन निघून जातो. मालवणला रेल्वे स्टेशन नाही. रेल्वे पकडण्यासाठी कुडाळला जावं लागतं. मालवणहून कुडाळला जाताना रस्त्यात धामापूर लागतं. धामापूरचा तलाव मन प्रसन्न करणारा आहे. तलावात बोटिंगची सोय आहे. झाडीभरला हा तलाव नुसत्या दर्शनानेच तुम्हाला ताजतवानं करतो. आठवडाभराची सुट्टी असेल, तर मालवणनंतरचा मुक्काम करायचा सावंतवाडी अथवा वेंगुर्ल्याला. त्याशिवाय देवगड अथवा कणकवली असासुद्धा पर्याय आहे. आठवड्याची सुट्टी नसली, तर कोकण रेल्वे आहेच तुम्हाला झटपट मालवणला पोहोचायला. मगे येतालास ना? येवा, कोकण आपलाच आसा!
- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल, मालाड युनिट. yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)

"राना'तली "सई'

"राना'तली "सई'
मुंबईच्या जवळ असणाऱ्या उरणला पाणी कोठून येतं ठाऊक आहे? उत्तर आहे रानसई. पण पोहोचायचे कसे तिथे...? मुंबई-पनवेल मार्गे सकाळीच कर्नाळ्याच्या अभयारण्यात यायचं. इथल्या फॉरेस्ट चौकीवर प्रवेश फी भरून रानसईला जाणारी वाट विचारून घ्यायची आणि पुढे चालायचं. अभयारण्याच्या बसस्टॉपवर कर्नाळा किल्ल्याच्या विरुद्ध दिशेला रस्ता ओलांडायचा. तिथल्या वननिवासाजवळच्या विहिरीशेजारून एक वाट जाताना दिसते. पाचेक मिनिटांत ओढा पार करून ही वाट पठारावर चढू लागते. पठारावर पोहोचल्यावर गोवा हायवेला समांतर चालत राहायचं. अर्ध्या तासाने उजवीकडे रानसई गावाकडे जाणारी वाट पकडायची. कर्नाळ्याहून दोनेक तासात आपण रानसई गावात पोहोचतो. गावातल्या घरात जेवण बनवून देण्याची विनंती करायची आणि निघायचं धरणाकडे. या छोटेखानी धरणाच्या दोन्ही तिन्ही काठांवर पडवळाची व्यापारी पद्धतीने शेती केलेली आढळते. बघावं तिकडे नुसते पडवळाचे मळेच मळे. वाकडे वाटणारे पडवळ सुतळीने दगड बांधून सरळ करायला ठेवलेले दिसतात. शेतकरी होड्या भरून भरून पडवळ धरणाच्या भिंतीकडे घेऊन जात असतात. तिथून ते मुंबई, पनवेलच्या बाजारात जातात. तलावाच्या काठाशी पोहोचल्यावर पोहणे, गळ टाकून तासन तास मासे पकडणे असे उद्योग आपण करू शकतो. दोनेक तासांनी परत जेवण सांगितलेल्या घरात जायचं. सपाटून भूक लागलेली असते. चमचमीत जेवणावर आडवा हात मारायचा. डबे आणले असतील तर संपवून टाकायचे. हलक्‍याशा वामकुक्षीनंतर परतीच्या प्रवासाला निघायचं. कर्नाळा स्टॉपच्या पुढे गोवा हायवेवर कल्हे नावाचं गाव आहे. या कल्ह्यातून रानसईपर्यंत चांगली वाट आहे. थोडासा चढ उतार आणि बहुतांशी पठारावरून जाणारी ही वाट दमछाक करणारी अजिबात नाही. कर्नाळा अभयारण्याची शांतता. एकाकी अनपेक्षित रानसई धरण. चोहोबाजूचे पडवळाचे मळे. रानसई धरणाच्या बॅकड्रॉपवर दिसणारा कर्नाळ्याचा सुळका. कल्ल्याच्या पठारावरची वाट. वन डे आऊटिंगसाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे रानसई. कल्हे रानसई वाटेवरून आम्ही बाइक घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. पाऊण रस्ता आम्ही गेलो सुद्धा. पण ते एक दिव्य आहे आणि ते करण्यास मी तुम्हाला सांगणार नाही. पनवेल-उरण रस्त्यावरच्या जासईकडून चिरनेर दिघोडे आणि तिथून रानसई असा प्रवाससुद्धा करता येतो. तर अशी ही रानातली सई, जरूर भेट द्यावी अशी...
- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट।
(साभार ः सकाळ)

गंगाद्वारावरचा "ब्रह्मगिरी'

गंगाद्वारावरचा "ब्रह्मगिरी'
अंजनेरी, ब्रह्मगिरी पर्वतरांग दोन मोठ्या नद्यांना जन्म देते... वैतरणा आणि गोदावरी. कोकणात वाहत जाणारी वैतरणा नळाद्वारे मुंबईतल्या घराघरापर्यंत पोचते. पवित्र गोदावरी तर दक्षिणेतील फार प्रसिद्ध नदी. नाशिक, पैठण, नांदेड यांसारखी अनेक पुण्यक्षेत्रं तिच्या काठावर वसली आहेत. पहाटे लवकर त्र्यंबकेश्‍वरला यायचं. त्र्यंबकेश्‍वरला यायला नाशिक आणि जव्हारकडून उत्तम रस्ता आहे. कुंभमेळा लागणाऱ्या त्र्यंबकेश्‍वराच्या पवित्र कुशावर्त तीर्थात स्नान करायचं. ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्‍वर महादेवाचं दर्शन करायचं आणि गावापाठी उभ्या असणाऱ्या ब्रह्मगिरीकडे कूच करायची. त्र्यबंकेश्‍वराहून ब्रह्मगिरीकडे जायला प्रशस्त वाट आहे. रस्त्यात मध्येमध्ये लिंबू सरबतवाल्यांची दुकानं आहेत. ब्रह्मगिरीचा शेवटचा कातळ चढण्यासाठी रेलिंग लावलेल्या पायऱ्या आहेत. चढताना माकडांना खायला न दिलेलंच बरं, नाही तर माकडं तुम्हाला चढताना अक्षरशः खिंडीत गाठतात. तुमची झडती घेऊन खाण्याच्या वस्तू लंपास करतात. एखादी काठी सोबत ठेवलेली बरी. ब्रह्मगिरीवरून त्र्यंबकेश्‍वराचं सुरेख दर्शन होतं. ब्रह्मगिरीच्या माथ्यावर एका टोकाला आहे गोवातीर्थ. तिथे गोदामाईची मूर्ती असणारं मंदिर आहे. मंदिराच्या समोर एका कुंडामध्ये गोमुखातून पाणी पडत असतं. हे मंदिर म्हणजे गोदावरी नदीचा मूळ उगम आहे, असा समज आहे. माथ्याच्या वरच्या दुसऱ्या टोकाला आहे शंकराचं मंदिर. शंकराने गुडघे टेकवून इथे जरा आपटले होते म्हणे. गुडघ्याचे दोन खड्डे व जरा आपटल्याच्या दगडावरील खुणा पाहण्यासारख्या आहेत. 4200 फुटांहून अधिक उंच असणाऱ्या या गडावरून हरिहर, बसगड, वाघेरा, अंजनेरी सहज दिसून येतात. याशिवाय ठळकपणे नजरेत भरतो तो अप्पर वैतरणा तलाव. आल्या वाटेने त्र्यंबकेश्‍वरकडे उतरताना डावीकडे गंगाद्वार आहे, ते जरूर पाहण्यासारखं. श्रावणातल्या सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालणाऱ्या भक्तांची रीघ लागलेली असते. संत ज्ञानेश्‍वरांचे गुरू व बंधू निवृत्तीनाथांनी त्र्यबंकेश्‍वरलाच समाधी घेतली. ब्रह्मगिरीच्या जवळच असणारा अंजनीपुत्र हनुमानाचा जन्म झालेला अंजनेरी, अप्पर वैतरणा काठचा श्रीघाट तसेच नाशिकची पांडव लेणी इथून जवळच आहेत व मुद्दाम पाहण्यासारखी ही स्थळं आहेत. अंजनेरी, ब्रह्मगिरी, हरिहर, बसगड असा ट्रेकसुद्धा करण्यासारखा आहे.
मधुकर धुरी
युथ हॉस्टेल, मालाड
yhai-malad@redeffmail.com
(साभार ः सकाळ)

कोकणची पंचनदी

पंचनदी या गावाच्या जेवढा गोडवा आहे तेवढेच हे गाव देखणेही आहे. चारी बाजूंनी हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या बेचक्‍यात वसलेल्या हे शांत, निरागस गाव आपल्याला थेट गो. नी. दांडेकरांच्या, मधू मंगेश कर्णिकांच्या कादंबऱ्यांच्या जगात घेऊन जाते. इथे "अय्या', "इश्‍श' म्हणत झक्क लाजणाऱ्या बायका अजून अस्तित्वात आहेत. बोलण्याच्या ओघात मध्ये मध्ये अस्सल कोकणी भाषा बोलणारे टिपिकल पुरुष आहेत. कॉम्प्युटर, टीव्ही, असल्या वस्तूंचे फारसे कौतुक कोणालाच नाही. इथे दिवेलागणीच्या वेळी अजूनही देवघरातून निरांजने लागतात. मग घरोघरी "शुभंकरोति' खणखणीत आवाजात म्हटले जाते. भजन, कीर्तन, पारावरच्या गप्पा ही अजूनही विरंगुळ्याची साधने आहेत. गावचे प्रशस्त, रमणीय सप्तेश्वराचे मंदिर हे इथले जणू सांस्कृतिक केंद्र आहे. प्रत्येक दिवशी सायंकाळी तिथे सनई लावली जाते. त्याचे मंगल सूर ऐकताना अलौकिक शांतीचा अनुभव येतो. स्वप्नवत वाटते ना हे सारे? पण हे खरे आहे. ज्यांनी नुकतीच पन्नाशी-साठी पार पाडली आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी इथले वास्तव्य हा एक छानसा नॉस्टॉलजिक अनुभव देऊन जाईल आणि मुला-बाळांसाठी हे बनेल एक मामाचे गाव- ज्याची संकल्पनाच हल्ली मोडीत निघाली आहे. पण त्यातली मजा, त्यातला आनंद तुम्ही तुमच्या मुला-नातवंडांसकट येथे अनुभवू शकाल. इथून जेमतेम दोन किलोमीटर अंतरावर कोळथऱ्याचा स्वच्छ, शांत समुद्रकिनारा आहे. अगदी चालत जायचे ठरवले तरी थकवा येणार नाही. कारण गावातले सर्वच रस्ते झाडीचे आहेत. तेही नको असेल तर इथल्या नारळ, सुपारीच्या दाट वाड्यांमध्ये फिरावे, पाटाच्या पाण्याशी खेळावे. त्यातही मज्जा आहे. संध्याकाळी डोंगरावरील झाडीत जाऊन मनसोक्त काळी करवंदे खावीत; काजू, जांभळे, कैऱ्या हा रानमेवाही लुटावा आणि धरणाची वाट धरावी. हे धरणही प्रेक्षणीयच आहे. या धरणाच्या पाण्यामुळे गाव अधिकाधिक सुजलाम्‌ सुफलाम्‌ बनलेले आहे. त्यामुळे भाज्यांचे मळेही नेहमीप्रमाणे तरारले असतात. उन्हाळ्यातही या गावाला भरपूर पाणी असते. या गावच्या नदीचे नावही पंचनदी असेच आहे. कधी या नदीत जाऊन मनसोक्त डुबक्‍या माराव्यात. सर्व हिलस्टेशनवर असलेल्या गर्दीचाच एक भाग बनून तिथल्या वेगवेगळ्या पॉईंट्‌सवर झुंबड उडवणे, वातानुकूलित हॉटेलात लोळत टीव्ही पाहणे आणि त्याच त्याच तेलकट पदार्थांवर ताव मारणे, या नेहमीच्या सुट्टी घालविण्याच्या सरळधोपट कार्यक्रमांना कंटाळला असाल, तर जरूर या गावाला भेट द्या. तेथे श्री. पद्माकर (भाऊ) वैशंपायन यांचा "प्रियश्री अभ्यागताश्रम' आहे. इथे टीव्ही, ए.सी. नाहीत, पण नैसर्गिक गारवा आणि निवांतपणा आहे. इथल्या प्रसन्न वातावरणात भरपूर आराम करून इथला रसरसलेला निसर्ग अनुभवावा. अजूनही इथल्या माणसांमध्ये असलेली घट्ट नात्यांची वीण, त्यातला उबदारपणा तुम्हाला नक्कीच सुखावून जाईल. "प्रियश्री'मध्ये शुद्ध शाकाहारी रुचकर जेवणाची उत्कृष्ट सोय आहे. उकडीचे मोदक, पानग्या, डाळिंब्याची उसळ, केळफुलाची, फणसाची भाजी असले अस्सल कोकणी पदार्थ येथे उदंड; तर बटाटेवडे, कांदा भजी असले झणझणीत पदार्थही मिळतात. तुम्ही फक्त फर्माईश करायची, तुमच्या जिभेचे चोचले इथे तत्परतेने पुरविले जातील. इथून जवळच दाभोळ हे ऐतिहासिक बंदर आहे. गुहेमधील चंडिकामंदिर, दाट सुरूचे बन आणि स्वच्छ समुद्रकिनारा ही येथली वैशिष्ट्ये आहेत. डॉ. भाई मोकल यांनी या बंदरावर सुरू केलेल्या फेरीबोटीच्या फेरीमुळे वेळणेश्‍वर, हेदवी, गुहागर ही ठिकाणेसुद्धा तुम्ही एका दिवसात बघून येऊ शकता. याच बंदरावर डॉ. मोकल यांच्यातर्फे भाड्याने खासगी लॉंच दिली जाते. त्यामुळे समुद्रसफरीचा रोमांचक अनुभवही इथे तुम्हाला मिळू शकतो. इथे घालविलेली आगळीवेगळी सुट्टी तुमच्या नेहमीच आठवणीत राहील. पंचनदी हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्‍यात आहे. दापोलीला आल्यावर दापोली-दाभोळमार्गे जाता येते किंवा दापोली-बुरोडी- पंचनदी या मार्गेही जाता येते. दोन्ही बाजूंनी एसटीच्या गाड्या दर दोन तासांनी आहेत.
डॉ. वैशाली उमेश वैशंपायन दापोली, जि. रत्नागिरी
(साभार ः सकाळ)

निसर्गरम्य तळजाई दर्शन

पुणे शहरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. परंतु त्याचप्रमाणे शहराच्या उपनगरांतही काही मंदिरे आहेत. सातारा रस्त्यावर असणारे तळजाई मातेचे मंदिर अशापैकीच एक; परंतु या मंदिराचा सातारा रस्त्यापेक्षाही जास्त जवळचा संबंध आहे तो "सिंहगड रस्त्याशी.' कारण सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द गावात कॅनॉललगत असणाऱ्या टेकड्यांवरून हे मंदिर सहज गाठता येते. या भागात घनदाट जंगल पसरले असून, या जंगलातून सफर करणे अप्रतिम अनुभव देते. वन विभागाने जाहीर केलेले हे संरक्षित वनक्षेत्र व पर्यटनस्थळ अजूनही सिंहगड रस्त्यावरील असंख्य पर्यटकांना माहिती नाही. सिं हगड, पानशेत, खडकवासला, यांसारखी अनेक पर्यटन स्थळे पुणेकरांच्या चांगलीच परिचयाची आहेत. परंतु घनदाट जंगलराजीत वसलेले व शहरापासून अगदीच जवळ असणारे प्राचीन तळजाई मातेचे मंदिर फारसे परिचयाचे नसावे. पुणेकरांना हे जवळचे आहेच आणि त्यातही सिंहगड रस्तावासीयांसाठी "रोजच्या मॉर्निंग वॉक'चे एक प्रशस्त व निसर्गरम्य स्थानही आहे. सिंहगड रस्त्यावरील हिंगणे गावातील कॅनॉल पार करून गेले की दृष्टीस पडते ती पर्वती पाचगाव वनक्षेत्राची अफाट डोंगररांग, हिरवे गालिचे पांघरलेली ही डोंगररांग मन मोहून टाकते. या डोंगरांपैकी कुठलाही डोंगर चढून गेले, की सुरू होते हिरवीगर्द वनराई. या वनराईतून मार्गक्रमण करताना विविध दुर्मिळ वृक्षांचेही दर्शन होते. करवंदांच्या जाळ्या मध्येच डोकावत असतात. उन्हाळ्यात बहरलेला गुलमोहर लक्ष वेधून घेतो. याशिवाय विविध वृक्षांच्या असंख्य प्रजाती या वनक्षेत्रात वन विभागाने जाणीवपूर्वक वाढवलेल्या आहेत. आपल्यासारख्या सामान्य पर्यटकाला त्या वृक्षांची माहिती नसते इतकंच. रानफुलांच्या असंख्य प्रजाती, निलगिरीचे उंचच्या उंच झुळके, कडुलिंबाची शीतल छाया, कांचनवृक्ष असे कितीतरी वृक्षप्रकार येथे पाहावयास मिळतात. वृक्षप्रेमींना संशोधनासाठी हेही एक चांगले ठिकाण असू शकते. डोंगर चढून गेल्यावर नजर पोचेल तिथपर्यंत दिसणाऱ्या पुणे शहराच्या पश्‍चिम उपनगरांतील उंच इमारती ठेंगण्या दिसतात आणि वाढत्या शहरीकरणाचे चित्र उभे करतात. परंतु याचबरोबर डोंगराच्या मागे वसलेली पर्वती पाचगावची वनराई निसर्गाचे खरे चित्र उभे करते आणि ते या इमारतींच्या चित्रापेक्षा कितीतरी आल्हाददायक वाटते. सिंहगड रस्तावासीयांना हे ठिकाण तर रोजच्या मॉर्निंग वॉकसाठी अगदी जवळचे आहे. या ठिकाणी अनेक लोक सकाळच्या मोकळ्या प्रसन्न हवेत प्रभातफेरीला येतात, मनसोक्त विहार करतात, व्यायाम करतात व "फ्रेश' होऊन दिवसभराच्या "रुटीनशी' झुंजण्यास सज्ज होतात. सकाळी सात वाजता जरी डोंगर चढायला सुरवात केली, तर पाऊण तासात तळजाईपर्यंत पोचता येते व परतीला तेवढाच वेळ लागतो. पक्ष्यांचा राजा "मोर' हे या वनक्षेत्राचे खास आकर्षण आहे. वनविहार करताना मोरांचे दर्शन हमखास होतेच. मोरांसाठी ठिकठिकाणी धान्य पाणी यांची व्यवस्था आहे. जंगलात थोडेसे आतमध्ये गेल्यास क्वचित "ससे'ही दिसतात. याशिवाय असंख्य पक्ष्यांच्या प्रजाती येथे नजरेस पडतात. वन्यप्राणी मात्र अद्याप तरी येथे दिसलेला नाही. वनक्षेत्रातून फिरत फिरत केव्हा तळजाईचे मंदिर येते कळतही नाही. निसर्गाच्या हिरव्या कुशीत वसलेले तळजाई मातेचे हे मंदिर एक अद्‌भुत अनुभव देते. पालिकेने तळजाई पठारावर क्रीडा संकुलही बांधले आहे. तळजाई मंदिराच्या मागे पवित्र "तळे' असून, त्यावरूनच या देवीला तळजाई असे संबोधले जाते. मंदिराचे व्यवस्थापन थोरात कुटुंबीयांमार्फत पाहिले जाते. तळजाई, वाघजाई आणि पर्वतीपर्यंत पसरलेली ही हिरवीगार वनराई आपल्याला निसर्गाच्या अगदी जवळ नेऊन ठेवते. आपली नेहमीची पर्यटनस्थळे बाजूला ठेवून थोडीशी वाट वाकडी केली, तर तळजाईची वनराई आपल्याला अविस्मरणीय अनुभव देईल हे नक्की.

कोकणातील गरम पाण्याचे झरे

- प्रा. संजीव नलावडे

पृ थ्वीतलावर आढळून येणाऱ्या भूशास्त्रीय चमत्कारांपैकी एक म्हणजे गरम पाण्याचे झरे वा उन्हेरे (याला कुणी उन्हवरे, उन्हाळे, गरम कुंडे असेही म्हणतात) होत. पृथ्वीच्या पोटातील नैसर्गिक प्रक्रियांमुळे गरम होऊन झऱ्यांद्वारे भूपृष्ठावर अवतीर्ण होणाऱ्या उष्ण पाण्याच्या उगमस्थानासही विविध नावे दिलेली आहेत. इंग्रजीत यालाच "हॉट स्प्रिंग' वा "थर्मल स्प्रिंग' असे म्हणतात. पावसाच्या जमिनीत खोलवर मुरणाऱ्या पाण्यापासून उन्हेऱ्याची निर्मिती होत असते. अनेक उन्हेरे ज्वालामुखी प्रदेशात आढळतात. अशा प्रदेशात शिलारसाचे वास्तव्य भूपृष्ठालगत खोलीवर, परंतु जमिनीच्या वरच्या थरालगत असते. भूपृष्ठावरील पाणी खडकांच्या फटींमधून खाली झिरपते. असे झिरपणारे पाणी शिलारसाच्या सान्निध्यात येताच तापते, प्रसरण पावते; त्याच्या काही भागाची वाफ होते. हे तापलेले पाणी खडकांमधील नाळींतून भूपृष्ठाकडे ढकलले जाते व उन्हेऱ्याच्या रूपाने बाहेर पडते. बऱ्याचदा अशा पाण्यात खडकांमधील गंधक वगैरेसारखे द्रवपदार्थ विरघळतात. काही उन्हेऱ्यांतून असे गंधकयुक्त पाणी बाहेर येत असते. अशा पाण्यात स्नान केल्याने काही त्वचारोग बरे होऊ शकतात. बहुतेक उन्हेऱ्यांजवळ माणसाने मंदिरे बांधली आहेत. उन्हेऱ्यांना भोवताली भिंत बांधून कुंड स्वरूपात बंदिस्त केले आहे. अशा जागा यथावकाश जत्रा-यात्रांची ठिकाणे व आता पर्यटनस्थळे बनल्या आहेत. महाराष्ट्रात विविध भागांत शोध घेता आतापर्यंत 32 उन्हेऱ्यांच्या जागा आढळून आल्या आहेत. त्यांपैकी जेमतेम आठ उन्हेरे राज्याच्या पठारी भागात आहेत (नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि नांदेड इ. जिल्ह्यांत), बाकी उरलेले सर्व उन्हेरे कोकणात आढळतात. कोकणची वैशिष्ट्यपूर्ण भूशास्त्रीय रचना व इतिहास यास कारणीभूत आहे. कोकणातील उन्हेरे नकाशावर पाहिल्यास ते एका जवळपास सरळरेषेत उत्तर-दक्षिण असल्याचे दिसते. कारण उत्तर-दक्षिण असलेल्या भ्रंश रेषेला धरून हे उन्हाळे आहेत. यातील काही प्रमुख उन्हेऱ्यांचा हा परिचय. गणेशपुरी ः ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्‍यात तानसा नदीच्या पात्रात व काठाने किमान 60 ठिकाणी उष्णोदकाचे उमाळे आहेत. खुद्द गणेशपुरीला श्री नित्यानंद महाराजांचे समाधिस्थानाजवळ व्यवस्थित बांधून काढलेले व लोकमान्यता पावलेले गरम जलकुंड आहे. या परिसराच्या मागच्या बाजूला तानसा नदीचे पात्र आहे. तानसा नदीवरच्या पुलावरून उत्तरेकडे पाहिले असता नदीच्या मध्यातील बेटवजा भाग दिसतो. इथे वडांच्या वृक्षांनी वेष्टित श्री पातालबाबाचे समाधिमंदिर आहे. या बेटावर काही गरम पाण्याची कुंडे आहेत. इथे नदीपात्र उत्तर-दक्षिण आहे. बेटाच्या पल्याड नदीपात्रात उतरून उत्तरेकडे चालत गेल्यास नदीपात्रातच गरम पाण्याचे अनेक झरे आढळून येतात. सगळे मिळून इथे डझनभर तरी झरे असावेत. यापैकी नदीपात्राच्या ऐन मध्यावर एक मोठे कुंड आहे. आसपासच्या सर्व कुंडांमध्ये या कुंडाचे तापमान सर्वाधिक, म्हणजे सुमारे 55 अंश ते 58 अंश सें.ग्रे. असते. त्यामुळे या कुंडास "अग्निकुंड' असे योग्य नाव दिलेले आहे. या कुंडात तांदूळ टाकल्यास भात शिजतो, अशी समजूत असल्याने जागोजागी गरम पाण्याच्या प्रवाहात तांदूळ टाकलेले दिसून येतात. उत्तर दिशा धरून चालत राहिल्यास तानसा नदीच्या पलीकडल्या काठावर आपण पोचतो. इथे रस्त्याच्या पल्याड शिवअनूसया मंदिर आहे. इथे दोन गरम पाण्याची कुंडे असून, त्यापैकी एकाला "अनसूया कुंड' असेच नाव आहे. इथूनच निंबवली- गोरूड रस्त्याने वज्रेश्‍वरीकडे जाणारा रस्ता आहे. मात्र हा रस्ता खराब असल्याने गणेशपुरीला जाऊन मोठ्या चांगल्या रस्त्याने वज्रेश्‍वरीला जावे हे बरे. वज्रेश्‍वरी-भिवंडी रस्ता आणि तानसा नदीच्या दरम्यान अनेक मंदिरे व गरम पाण्याची कुंडे आहेत. वज्रेश्‍वरी बस स्थानकालगत श्री रामेश्‍वर महादेवाचे मंदिर आणि कुंड आहे. जवळच नदीपात्रात चार-पाच कुंडे आहेत. यांना "अकलोली कुंडे' असे म्हणत ात. त्यापैकी सूर्यकुंड आणि चंद्रकुंड प्रसिद्ध आहेत. सातवली ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्‍यात टिकालाजवळ हे विशेष प्रसिद्ध नसलेले उन्हाळे आहे. महामार्गावरूनच डावीकडे (पश्‍चिमेकडे) हिरवागार वृक्षाच्छादित परिसर आणि मंदिरांचे कळस दिसतात. मंदिरे शंकर आणि हनुमानाची आहेत. वांद्री या छोट्या नदीच्या डाव्या तीरावर ही मंदिरे आणि लहान-मोठी डझनभर गरम पाण्याची कुंडे आहेत. यातील तीर्थकुंड सर्वांत उष्ण व महत्त्वाचे आहे. जवळच अगदी साधी धर्मशाळा आहे. अहमदाबाद रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर अंतरावर मुंबईच्या दिशेकडे हाय-वे ढाबा आहे. भोजनाची सध्या तरी ही एकमेव व्यवस्था आहे. उन्हेरे पाली (गणपती) ः खोपोलीजवळचे गणपतीचे पाली हे अष्टविनायकांपैकी एक. खोपोलीकडून पलीकडे जाताना पालीच्या अगदी जवळ पोचलो, की उजवीकडे उन्हेऱ्याची पाटी दिसते. उन्हेरे मुख्य रस्त्यापासून जेमतेम एक किलोमीटर आत आहे. हा परिसर अंबा नदीच्या काठावर आहे. पार्किंगसाठी मोठी विस्तीर्ण जागा आहे. विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराजवळच दोन कुंडे- एक मोठे, एक छोटे- आहेत. जवळच भक्तनिवास आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्नानाची स्वतंत्र सोय असणारा कायमस्वरूपी मंडप आहे. पार्किंग जागेजवळ चहा-नाश्‍त्याच्या टपऱ्या आहेत. जेवणसुद्धा आगाऊ कल्पना दिल्यास तयार करून देतात. पालीला मुक्कामास राहूनही हे ठिकाण साधता येते. सव ः मुंबई-गोवा महामार्ग महाडजवळ जिथे सावित्री नदीला खेटून जातो तिथे नदीपल्याड जो हिरवागार देवराईसारखा परिसर दिसतो तिथे सवची गरम पाण्याची कुंडे आहेत. इथे होडीने नदी ओलांडून पलीकडे जावे लागते. झाडीतून गेलेली पायवाट आपल्याला कुंडापाशी आणून सोडते. कुंडांना लागूनच शाह शैलानी यांचा दर्गा आहे. दर्ग्यातील स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. इथे जानेवारी-फेब्रुवारीत उरूस भरतो. कुंडाचा तळ नारळाच्या खोडांपासून बनवला असून, त्यामुळे कुंडाची खोली कमी झाली आहे. परिणामी, डुंबणे सुरक्षित झाले आहे. आसपास बरीच घरे असून, बहुतेक वस्ती मुसलमान बांधवांचीच आहे. इथे यायला आणखी एक वाट आहे, पण ती लांबची आहे. महाड-आंबेत रस्त्यावरून शेतातून/ बांधावरून गेलेल्या वाटेने सुमारे 15 मिनिटे पायपीट केली की आपण या कुंडाशी येतो. दोन उन्हवरे ः 1) उन्हवरे (व्हाया पालवणी) ः मंडणगडकडून आतल्या रस्त्याने (पालवणी मार्गाने) दापोलीकडे जाताना जिथे भारजा नदी रस्त्याशी लगट करू पाहते तिथे नदीच्या डाव्या तीरावर चंडकाई, मुकाई आणि वळजाईची एकाकी मंदिरे व जवळच नदीकाठाने उन्हाळे आहेत. नदीकाठाने व लगतच्या डोंगरी भागात भरपूर झाडी असून, नदीच्या काठाने "महाराष्ट्र वृक्ष' म्हणून प्रसिद्ध पावलेल्या तामणाची असंख्य झाडे आहेत. उन्हाळ्यात भेट दिल्यास सुंदर जांभळ्या फुलांची उधळण बघून डोळे सुखावतात. ज्यांना पक्षिनिरीक्षणाची आवड आहे त्यांच्यासाठी ही जागा आदर्श आहे. मुख्य रस्त्याकडून मंदिराकडे जाणारा कच्चा रस्ता (जो थोडा उतरून यावा लागतो) सहजी लक्षात येत नाही. त्यामुळे जरा लक्ष ठेवावे लागते. चंडिकादेवी मंदिराभोवती आसपास बांबूची दाट बने आहेत. कुंड जांभा दगडाने बांधलेले भरभक्कम असून, जवळच ओबडधोबड पिंडी व शेजारी सावली देण्यास सदैव सज्ज असलेला महाकाय आम्रवृक्ष आहे. सर्वांत निसर्गरम्य उन्हेरे, असे याचे वर्णन करता येईल. 2) उन्हवरे (दापोली) ः खेड-दापोली रस्त्यावर पन्हाळे काजी लेण्याकडे जाणारा रस्ता धरावा. पुढे या रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडील फाटा पन्हाळेकाजी लेण्याकडे जातो. डावीकडला उन्हवऱ्याकडे जातो. रस्ता पुढे पुढे उतरत जातो. हा रस्ता आपल्याला थेट फरारीच्या खाडीवर घेऊन जातो. एसटी स्थानकाजवळील मोकळ्या जागेत गाडी लावता येते. दुरूनच जमिनीतून वाफा बाहेर पडत असल्याचे अपूर्व दृश्‍य दिसते. मूळ स्रोत असणारे कुंड डाव्या बाजूला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचे कुंड, असा याचा लौकिक आहे. (तापमान 70 अंश सें.ग्रे.! अबब!!) त्यामुळे या कुंडाकडे सावधतेने जायला हवे. लहान मुलांना (व स्वतःलाही) दूर ठेवावे. पाण्याची (वाफेची धग दुरूनही जाणवते. याच कुंडातले पाणी एका चरातून दुसऱ्या कुंडात नेले आहे. तापमान कमी असल्याने तेथे स्नानाचा आनंद उपभोगता येतो. महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी सोय आहे. समोरच्या डोंगरउतारावरील मदरशाची आधुनिक पद्धतीची इमारत पाहून थक्क व्हायला होते. शाळेची इतकी सुंदर इमारत पुण्यालाही नसेल. मुख्य कुंडातून स्रवणारे गरम पाणी आसपासच्या सुमारे एक एकर परिसरात पसरत असल्याने गरम चिखलयुक्त पट्टा तयार झाला आहे. या चिखलात अधूनमधून गाई-गुरे रुतून बसतात व मृत्यूला सामोरी जातात. गरम कुंडाचे पाणी फरारीच्या खाडीला जेथे मिळते तेथे पाण्याचे तापमान 40 अंश सें.ग्रे. आहे. त्याच्या थोड्या वरच्या अंगाला पाण्याचे तापमान 35 अंश सें.ग्रे. आहे. अशा ऊन पाण्यातही शंख-शिंपले, मासे, फिरताना पाहून आश्‍चर्य वाटते. "मुख्य कुंडात अंडी उकडतात, मेलेली कोंबडी सोलण्यापूर्वी या पाण्यात बुडवून ठेवतात, नंतर ती सोलायला सोपी जाते,' इ. माहिती चहावाल्याने पुरवली. या परिसरात सर्व हिंदू व मुसलमान कुंडावर लग्नाचा नारळ फोडतात. तशी प्रथाच या पंचक्रोशीत आहे. या परिसराचा अधिक नियोजनपूर्वक विकास होणे गरजेचे आहे. खाण्याची सुविधा नीटशी उपलब्ध नाही. मुक्कामाचीही सोय नाही. अर्थात खेड वा दापोलीला मुक्काम करून इथे येणे सोपे आहे. (राजापूर) ः राजापूरची गंगा प्रसिद्ध आहे. या गंगातीर्थाच्या रस्त्यावर उन्हाळे आहेत. अर्जुना नदीच्या काठाने ही उन्हाळे आहेत. जवळच श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे. कुंड बंदिस्त आहे. फाट्यापासून 1.5 किलोमीटरवर आहे. तुरळ ः मुंबई-गोवा मुख्य महामार्गावर संगमेश्‍वर तालुक्‍यात राजवाडीजवळ हे कुंड आहे. रस्त्यावर "हॉट स्प्रिंग' नावाचेच हॉटेल आहे. या हॉटेलच्या शेजारून मागे गेलेली पायवाट उन्हाळ्याकडे जाते. जवळ राजगंगा नदी व हॉटेलला लागून वाघजाई चंडिकामाता मंदिरे आहेत. राजवाडी ः चिपळूणकडून गोव्याकडे जाताना सुमारे 40 किलोमीटर अंतरावर डावीकडे राजवाडी फाटा आहे. आत वळताच सुरवातीला राजगंगा नदीवरचा पूल व लगेचच कोकण रेल्वेच्या रुळाखालून पलीकडे राजवाडी आहे. गाव छोटे व टुमदार आहे. गावात गाडी लावून साईबाबांच्या मंदिराजवळून पायऱ्यांची वाट कुंडाकडे जाते. शंकराच्या मंदिराला लागून आमराई व त्याला लागून गरम पाण्याची दोन कुंडे आहेत. शंकराच्या मंदिरातील लाकडी खांब, कमानी व तुळ्यांवरील कोरीव काम बघण्यासारखे आहे. पाच तोंडांची गाय, गंडभेरुंड व हत्ती, वाघाशी तलवारीने लढणारा योद्धा, उंट, दौडणारा घोडेस्वार, आठ मोरांचे गोलाकार अष्टमंडळ, फेर धरून नाचणाऱ्या नर्तिका, कमलपुष्प, डुकराच्या शिकारीचे दृश्‍य, राम-सीता, हनुमान अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. दुर्दैवाने कोरीव कामाला जागोजागी भुंगे लागले आहेत, भोके पडली आहेत. मंदिराचा परिसर निसर्गरम्य, मात्र राहण्या-जेवणाची सोय नाही. अरवली ः गोवा महामार्गावरील गड नदीचा पूल ओलांडला (गोव्याकडे जाताना) की लगेचच डावीकडे हे कुंड आहे. जवळच वरदाई, कालिमाता, केदारनाथाची मंदिरे आहेत. कुंडाचे पाणी फारसे स्वच्छ नाही. कोकणातील सर्वच्या सर्व 22 कुंडे चार दिवसांत पाहणे शक्‍य आहे. मात्र त्यासाठी स्वतःचे वा भाड्याचे वाहन हवे. त्याचा कार्यक्रम असा ः दिवस पहिला ः मुंबईतून प्रवासास सुरवात करावी. अहमदाबाद महामार्गाने पालघर तालुक्‍यातील दहिसर (तर्फे मनोर) गाठावे. हमरस्त्याला लागूनच हलोली येथील पाटीलपाडा आणि पाडोसपाडा कुंडांना भेट देणे. तेथून मुंबईच्या वाटेवर टिकालाजवळ सातवलीला यावे. त्यानंतर मनोरमार्गे पालघरच्या वाटेवरील कोकनेर पाहावे. परत येऊन मनोरला हमरस्ता सोडून वाड्याचा रस्ता पकडावा. वाटेत थोडी वाकडी वाट करून खारिवलीजवळ पिंगेमान येथे वैतरणेच्या पाण्यात बुडलेली कुंडे लांबूनच पाहावीत. पुन्हा हमरस्ता गाठून मांडवी फाट्यावरून गणेशपुरी- वज्रेश्‍वरी जवळ करावे- अर्थात रात्रीच्या मुक्कामासाठी. दिवस दुसरा ः पहाटे लवकर उठून गणेशपुरी, निंबवली, गोराड, अकळोली- वज्रेश्‍वरी परिसरातील गरम पाण्याची कुंडे स्नानकर्मासह व्यवस्थित पाहून घ्यावीत. आसपासची मंदिरे व समाविष्ट स्थाने पाहून होईपर्यंत दुपार उजाडते. इथेच जेवण करून अंबाडीमार्गे टिटवाळ्याला गणेशदर्शन करावे. तेथून मधल्या घाटमार्गाने अंबरनाथ जवळ करून बदलापूर- कर्जतमार्गे खोपोली फाट्यावरून गणपती पालीकडे प्रयाण. उन्हेऱ्याची कुंडे पाहून मुक्कामासाठी पालीस जावे. दिवस तिसरा ः पालीवरून गोवा महामार्गास लागावे व थेट महाड गाठावे. महाड परिसरातील कोंडिवते व सवची कुंडे पाहून महामार्ग सोडून उजवीकडे मंडणगड गाठावे. (दुपारचे जेवण,) उन्हवरे (पालवणी) करून उन्हवरे (दापोली) ला जावे. तेथून खेडला मुक्कामासाठी यावे. गावाबाहेरील मरू घातलेले उन्हवरे पट्टीचे उन्हाळे पाहून गावातच मुक्काम करावा. दिवस चौथा ः पहाटे खेड सोडावे. चिपळूण मार्गाने प्रथम अरवली, नंतर तुरळ, राजवाडी, फणसावणे, मठ (पाण्याखाली) इथली कुंडे पाहून राजापुरास (हॉटेल राजापूर) दुपारचे जेवण घ्यावे. नंतर राजापूर कुंडास भेट द्यावी, की संपला प्रवास।
(साभार सकाळ)

शिवथर घळ

रामदासस्वामींच्या अनेक घळींपैकी ही सर्वांत महत्त्वाची, भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोक्‍याच्या जागी वसलेल्या या घळीची महती काय वर्णावी? रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवरील घळ, रायगड, राजगड, प्रतापगड, तोरणा (प्रचंडगड) अशा दुर्गश्रेष्ठांच्या सान्निध्यात समान अंतर राखून असलेली. शिवकालीन महाराष्ट्राच्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणे येथून श्री समर्थांना अतिशय सोपे होते. सध्याच्या रायगड जिल्ह्याच्या महाड या मुख्य ठिकाणापासून जेमतेम 25 किलोमीटर अंतरावर, डोंगराच्या बेचक्‍यात वसलेली ही घळ. घळीच्या डोक्‍यावरूनच शिवथर नदीचा प्रवाह अनामिक आतुरतेने कड्यावरून खाली झेप घेतोय, आजूबाजूला सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील जावळीच्या प्रसिद्ध खोऱ्यातील निबीड अरण्य... दिवसा भरदुपारी ज्या भागात सूर्याचे हात पोचत नाहीत त्याबद्दल रात्रीची केवळ कल्पनाच बरी! घळीपासून वरती डोंगरावर एखादा तास पायपीट केल्यावर डोळ्यांसमोर एक सुंदर पठार येते. यावरच जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या वाड्याचे पडीक अवशेषही आहेत. थोडे उजवीकडे शेतांच्या पलीकडे असलेल्या डोंगरावर नजर जाताच शिवथर नदीचा सुरवातीचा प्रवाह धबधब्याच्या रूपात नजरेला सुखावून जातो. घळ खऱ्या स्वरूपात अनुभवण्याचा उत्तम कालावधी पावसाळ्याचा. जुलै ते सप्टेंबर हा. कारण यादरम्यान निसर्ग ऐन भरात असतो. चहूकडे हिरवळ, जलप्रपाताची आसमंतात गर्जून, उरात धडकी भरवणारी गर्जना, अधूनमधून चालू असणारी पावसाची रिपरिप, डोंगरांच्या बेचक्‍यात अडकून पडलेला नाठाळ वारा... माणूस "स्वत्व' हरवून जातो. शिवथर घळीला जाण्यासाठी महाड सर्वांत सोईचे ठिकाण आहे. एसटी महामंडळातर्फे घळीकरता दिवसातून तीन-चार वेळा गाड्या सोडल्या जातात. महाड आगाराची सर्वांत शेवटची एसटी घळीला मुक्कामालाच जाते. सकाळी सात वाजता ती परत महाडला येते. स्वतःचे वाहन असणाऱ्यांसाठी महाडजवळच्या बिरवाडी फाट्यावरून आत वळल्यावर स्थानिक लोकांना विचारल्यास लोक त्वरित मदत करतात. जवळच तीन-चार किलोमीटरवर कुंभे शिवथर नावाचे गाव आहे. घळीची सर्व व्यवस्था "श्री सुंदरमठ सेवा समिती' बघते. समितीच्या वतीने राहण्याची व जेवणाची व्यवस्था विनामूल्य केली जाते. निवासाकरिता कमीत कमी सात दिवस अगोदर पत्रव्यवहार करावा. अन्यथा भाविकांना गैरसोईला तोंड द्यावे लागते. त्यासाठी पत्ता असा- श्री सुंदरमठ सेवा समिती, मु. शिवथर घळ, पो. कुंभेशिवथर, ता. महाड, जि. रायगड. वातावरणाचे आणि स्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी पर्यटकांना समितीतर्फे आवाहन करण्यात येते, की केवळ पर्यटनाच्या दृष्टीने न बघता परिस्थितीनुरूप वागावे. स्थळाची शांतता व पावित्र्य अबाधित राखावे. दर वर्षी दासनवमीला येथे मोठा उत्सव करण्यात येतो. मुख्य घळीत, रामदासस्वामी, शिष्य कल्याण व राम-लक्ष्मण-सीता यांच्या मनोहारी मूर्ती आहेत. रामदासस्वामींनी "दासबोध' येथेच पूर्ण केला. अशी ही शिवथर घळ प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी. कसे जाल? जवळचे बस स्थानक महाड- 25 किलोमीटर. महाड-पोलादपूर रस्त्यावर बिरवाडी फाट्यावर डावीकडे वळून आतमध्ये. कालावधी ः पावसाळा (जून ते सप्टेंबर) (उन्हाळा-हिवाळ्यात निसर्गसौंदर्याचा अनुभव कमी.) निवासाकरता अगोदर पत्रव्यवहार आवश्‍यक। - डॉ. मोहित विजय रोजेकर

रुपेरी समुद्रकिनाऱ्यावरील केळशी

दोन दिवसांच्या सहलीसाठी रत्नागिरी जिल्हा व दापोली तालुक्‍यात केळशी नावाचे गाव. नितांतसुंदर, निवांत, खऱ्या रुपेरी वाळूचा समुद्रकिनारा, पुरातन मंदिरे, पेशवेकालीन गावाची रचना, नारळी-पोफळीच्या बागा, सर्वत्र बारमाही हिरवा गालिचा असलेले कोकणातील केळशी हे अत्यंत रमणीय व निवांत आहे. गाव तसे लहान आहे, पण त्या गावाला इतिहास आहे. या गावात छत्रपती श्री शिवाजीमहाराजाच्या चौदा गुरूंपैकी एक गुरू बाबा याकूत यांची श्री संभाजीराजांनी बांधलेली समाधी आहे. पेशवेकालीन श्रीराम मंदिर गावात आहे. गावाच्या दक्षिणेस श्री लक्ष्मीमातेचे जागृत पुरातन मंदिर आहे. गाव टुमदार आहे. मोठमोठ्या दगडी चिरा रचून रस्ते व पावसाच्या पाण्यासाठी नाले तयार केले आहेत. एका बाजूस घरे, बंगले, वाड्या व समुद्राच्या बाजूस पश्‍चिमेस नारळी-पोफळीच्या, फुलांच्या बागा आहेत. गावात हॉटेल, लॉज नाहीत; पण गावातील सधन लोकांनी उत्पन्नाचे साधन म्हणून आपल्या प्रशस्त जागांत खोल्या बांधून पर्यटकांसाठी छान सोय केली आहे. गावात दहा-बारा ठिकाणी घरगुती सामुदायिक व वैयक्तिक राहण्याच्या सोई आहेत. मुबलक पाणी, त्यामुळे स्वच्छता, टापटीप वाखाणण्यासारखी. स्वच्छ परिसर, भरपूर झाडी, फुलझाडे, वेली सर्वत्र, त्यामुळे आपण अनोख्या जगात आल्यासारखे वाटते. प्रदूषणमुक्त वातावरण, सुखद हवा, मंद पानाफुलांचा वास, यामुळे तेथे पोचल्यावर थोड्या वेळातच आपण ताजेतवाने होतो. महत्त्वाचे म्हणजे, राहण्याची व भोजनाची अत्यंत किफायतशीर सोय होते. एका पर्यटकासाठी एक दिवसासाठी राहणे, नाष्टा, दोन वेळा चहा व दोन वेळा जेवण यासाठी 200 रुपये घेतले जातात. ज्येष्ठांना सवलत मिळते. दहा लोकांचा गट असेल तर एका व्यक्तीस सर्व मोफत मिळते. भरपूर गरम पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे व खोल्याही स्वच्छ असतात. प्रत्येक ठिकाणी आपुलकीने लक्ष दिले जाते. गडबडगोंधळ अजिबात नसतो. चहा, नाष्टा दर्जेदार, चविष्ट असतो. भोजन तर खास कोकणी पद्धतीचे असते. वरण, भात, तूप, गरम पोळ्या, उसळ, रस्सा भाजी, पापड, चटणी, लोणचे, कोशिंबीर याचा समावेश असतो. सर्व सात्त्विक आहार असतो. त्यामुळे खरे उदभरण होते. तृप्ती होते. अगदी गोड बोलून आग्रहाने जेवण वाढले जाते. अगदी घरच्यासारखा पाहुणचार होतो. शिवाय आगाऊ सांगितल्यास उकडीचे मोदक दिले जातात. जादा पैसे घेऊन सगळ्या ठिकाणी शाकाहारी जेवण मिळते. नशापाणी करण्यास बंदी असते. मागणी केल्यास मांसाहारी जेवण दिले जाते. त्याची वेगळी सोय केली जाते. अशी गावात दहा-बारा ठिकाणी सोय आहे. गाड्या पार्किंगची सोय आहे. आजूबाजूच्या चांगल्या स्थळांबद्दल माहिती दिली जाते. मार्गदर्शन केले जाते. तेथेच घरगुती कोकणी मेवा विकत मिळतो. ... फणसपोळी, पोह्याचे पापड, आंबापोळी, आंबा पल्प, लोणची इत्यादी. त्यामुळे केळशीच्या सहलीत सर्व गोष्टी मुक्तपणे अनुभवता येतात. सर्व कोकणाची वैशिष्ट्ये अनुभवता येतात. मुंबईहून आपल्या वाहनाने चार तासांचे अंतर. पुण्यातून पाच तासांचे अंतर. स्वतःच्या गाडीने सहल करण्यासाठी सहल नियोजन- मुंबईकडून सहल काढायची असेल तर सकाळी निघून 11 वाजेपर्यंत रायगड दर्शन, जेवण करून चार वाजता निघून सातपर्यंत केळशीस मुक्काम. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील श्रीराम मंदिर दर्शन, नंतर सुंदर समुद्रकिनारा, नंतर श्री शिवाजी महाराजांचे गुरू बाबा याकूत यांच्या समाधीचे (दर्गा) दर्शन. शेवटी श्री लक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन गावातील बाजारपेठेतून एकपर्यंत मुक्कामी परत. जेवण करून विश्रांती घेऊन साडेतीन वाजता चहा घेऊन परतीचा प्रवास. जाता जाता वाळूच्या टेकड्या पाहून परत मुंबईस प्रयाण. पुण्याहून सहल ः पुण्याहून दोन मार्ग आहेत- एक ः सकाळी निघून भोर (वरंधा घाटमार्गे), शिवथर घळ (श्री रामदास स्वामीचे ध्यानस्थळ) पाहून रायगड दर्शन, जेवण करून संध्याकाळी सातपर्यंत केळशी मुक्काम. विश्रांती, जेवण. दुसऱ्या दिवशी केळशी स्थळदर्शन, समुद्रस्नान व जेवण, विश्रांती. दुपारी साडेतीन वाजता निघून वाळूच्या टेकड्या पाहून, लोणेर फाटा, निजामपूर, मानगावमार्गे ताम्हिणी घाटातून मुळशीमार्गे आठ वाजता पुण्यात परत. दुसरा मार्ग ः सकाळी सात वाजता पुण्यातून निघून पौडमार्गे मुळशी धरण पाहून नाष्टा करून पुणे-ताम्हिणी घाटातून प्रवास. ताम्हिणी घाट फारच सुंदर, रमणीय. हिरवी वनश्री, विविध पक्षी, झाडे आहेत. पुढे मुंबई-गोवा मार्गावर येऊन नंतर मानगाववरून पुढे निजामपूर व नंतर लोणेर फाट्यावरून आपण केळशीला दुपारी एक वाजेपर्यंत पोचतो. नंतर जेवण व विश्रांती घेऊन दुपारी साडेतीन वाजता चहा घेऊन स्थळदर्शन. प्रथम श्रीराम मंदिर दर्शन, नंतर बाजारपेठमार्गे श्री लक्ष्मीदेवी दर्शन. तेथून पुढे थोड्या अंतरावर श्री गुरू याकूतबाबा समाधी (दर्गा) दर्शन, तसेच पुढे समुद्रदर्शन. खेळणे, सूर्यास्त पाहणे. नंतर वाड्या-बागांतून मुक्कामी परत येणे. सकाळी लवकर उठून सर्व उरकून तेथून 15 किलोमीटर असलेला कड्यावरच्या गणपती दर्शनास जाणे. जाताना कोकण परिसर, खाडी, टुमदार घरे, पुरातन मंदिरे, मासे बाजार पाहून श्री गणपती दर्शन घेणे. गणपती टेकडीवर आहे. गाडी वरपर्यंत जाते. मंदिर अकराशे वर्षांपूर्वीचे आहे. सुंदर, सुबक मूर्ती असलेले मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. वरून सागराचे, आसमंताचे विहगंम दृश्‍य दिसते. परत येताना निवांत समुद्रकिनारा पाहता येतो. बारा वाजेपर्यंत परत येऊन जेवण, विश्रांती घेऊन दुपारी साडेतीन वाजता निघून वाळूच्या टेकड्या पाहून त्याच मार्गाने पुण्याकडे परत येणे. पुण्यापासून साधारण 200 किलोमीटर अंतर आहे. पावसाळा सोडून सर्व हंगाम (सीझन) सहलीस चांगले असतात.
- शि. बा. गोसावी
साभार ः सकाळ

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे, पावस, गणेशगुळे, माचाळ, मार्लेश्‍वर, काळबादेवी, पालगड, मुरूड, मंडणगड, आयनी-मेटे अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोव्यातून राष्ट्रीय महामार्गमार्गे सिंधुदुर्ग जिल्हा ओलांडला की खारेपाटणपासून रत्नागिरी जिल्ह्यास सुरवात होते. पहिले गाव लागते राजापूर. एकेकाळचे प्रसिद्ध बंदर, राजापूरहून तीस किलोमीटरवर डावीकडे आडिवरे येथे श्री महाकालीचे पुरातन मंदिर आहे. आडिवरे येथे शिलाहार राजाची सत्ता असताना भरभराटीस आलेली बाजारपेठ होती. राजापूरजवळ श्री धूतपापेश्वराचे मंदिर नदीकिनारी आहे. राजापूरपासून पाच किलोमीटरवर गंगातीर्थ आहे. राजापूरची गंगा म्हणून ते ठिकाण प्रसिद्ध असले तरी तेथे पाणी असल्याची खात्री करूनच भेट द्यावी. पुढे गेल्यावर हातखंबा येथून डावीकडे वळल्यावर रत्नागिरी लागते. रेल्वेने रत्नागिरीस जावयाचे असल्यास रेल्वेस्थानक शहराबाहेर 13 किलोमीटरवर आहे हे आधी लक्षात घ्यावे. तेथून रिक्षा करून रत्नागिरी गाठावी लागते. रत्नागिरीपासून 15 किलोमीटरवर पावस आहे. हे गाव स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्याने पुनीत होऊन तीर्थक्षेत्र बनले आहे. तेथे स्वामींची समाधी व सुंदर मंदिर आहे. पावसला जाताना भाट्याच्या खाडीवरील राजिवडा बंदर ओलांडून जावे लागते. भाटये येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे नारळ संशोधन केंद्र आहे. तेथे नारळाची रोपेही विकत मिळतात. शिवरायांच्या आरमारातील शूर सेनानी मामाजी भाटकर भाट्ये येथीलच. त्यांची समाधी तेथे आहे. पावसला जाण्यासाठी लांजा येथूनही मार्ग आहे, पण तो अरुंद. रत्नागिरीत लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आहे. हे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्यात आले आहे. श्रीमती इंदिराबाई गोरे यांचा हा वाडा आता टिळक स्मारक म्हणून ओळखला जातो. रत्नागिरीतच प्रसिद्ध थिबा पॅलेसही आहे. ब्रिटिशांनी 1910-11 मध्ये ही वास्तू उभारली. तेथे आता वस्तूसंग्रहालय आहे, तसेच बाजूला असलेला थिबा पॉइंटही चांगला आहे. रत्नागिरीच्या भगवती किल्ल्यावर जाता येते, तेथे दिवसा जाणे कधीही चांगले. किल्ल्यात शिवकालीन भगवतीचे मंदिर आहे. रत्नदुर्गाच्या पायथ्याशी दक्षिणेला किनारा काळ्या वाळूचा असल्याने त्याला काळा समुद्र तर उत्तरेकडील समुद्राला पांढरा समुद्र असे म्हणतात. या किल्ल्याच्या पायथ्याशी भागोजीशेठ कीर यांनी बांधलेले श्री भागेश्वर मंदिर आहे. या शिवमंदिरातील खांबांवर पशुपक्ष्यांची सुंदर निसर्गचित्रे कोरलेली आहेत. अथांग समुद्रकिनारा, निसर्गसंपन्न परिसर आणि प्राचीन गणेशमंदिर. पावसजवळचे गणेशगुळे आकर्षक आहे. रत्नागिरीहून पन्नास किलोमीटरवर गणपतीपुळे आहे, रत्नागिरीहून झाडगावमार्गे गणपतीपुळे येथे जाताना वाटेत मत्स्य महाविद्यालय लागते. गणपतीपुळेला गणपतीचे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी असून समोर अथांग सागर व पांढऱ्या वाळूचा विस्तीर्ण किनारा पसरलेला आहे. या देवस्थानचा इतिहास 1600 पासूनचा आहे. सांगलीच्या पटवर्धन संस्थानिकांचे हे कुलदैवत. छत्रपती शिवाजी महाराज ते पेशवाईपर्यंतचा इतिहास या मंदिराशी निगडित आहे. देवालयाचा गाभारा छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सचिव अण्णाजी दत्तो यांनी, सभामंडप व मंदिराभोवतालची दगडी पाखाडी सरदार गोविंदपंत बुंदेले यांनी तर आवारातील धर्मशाळा रमाबाई पेशवे यांनी बांधलेली आहे. नंदादीप नानासाहेब पेशवे यांनी तर नगारखाना चिमाजी अप्पा यांनी बांधला आहे. गणपतीपुळेला जाण्यासाठी पणजीहून कदंब व एसटीच्या बसेस आहेत. गणपतीपुळेच्या शेजारी मालगुंड असून ते कवी केशवसुतांचे गाव. त्यांचे वस्तुसंग्रहालय वजा स्मारक पाहण्यासारखे आहे. पुढे चिपळूणच्या दिशेने जाताना वाटेत संगमेश्वर लागते. त्याच रस्त्यावर आरवली व तुरळ येथे गरम पाण्याचे झरे रस्त्यालगतच आहेत. या पाण्याला गंधकाचा वास येतो. त्वचारोग बरे करण्यासाठी तेथे स्नान करण्यासाठी अनेकजण थांबत असतात. संगमेश्वरजवळील कसबा येथे चालुक्‍य घराण्यातील कर्ण राजाने बांधलेले श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी पुरातन मंदिर आहे. तेथे सरदेसायांचा मोठा वाडा असून या वाड्यात छत्रपती संभाजीराजे असताना त्यांच्यावर औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने अचानक हल्ला करून अटक केली होती. या ठिकाणी संभाजी राजांचा स्मारक स्तंभ आहे. संगमेश्वरहून चिपळूणकडे जाताना डावीकडे श्री क्षेत्र मार्लेश्वर आहे. देवरूखपासून 15 किलोमीटरवर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात निसर्गरम्य ठिकाणी वसलेले शंकराचे हे देवस्थान पाहण्याजोगे आहे. उंच डोंगराला वळसा घालून गेल्यावर एका गुहेत हे स्वयंभू देवस्थान आहे. या डोंगरावर मोठा धबधबा आहे. देवस्थानपर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. कशेळीचा कनकादित्य रत्नागिरी, पावस, गणपतीपुळे ही सारी ठिकाणं पर्यटकांच्या परिचयाची. पण इथून जवळच आहे, एक आगळं-वेगळं ठिकाण. त्याचं नाव आहे कशेळी. (मंडणगड जवळचं केळशी नव्हे) महाराष्ट्रात एकेकाळी सौरसंप्रदाय पसरला होता. परंतु सूर्याची फारशी मंदिरं आजमितीस अस्तित्वात नाहीत. पण कोकणात काही सूर्यमंदिरे आहेत. आरवली, आंबव, नेवरे, कशेळी अशा काही गावांमध्ये ही सूर्यमंदिरे आहेत. कशेळीचा कनकादित्य हे आवर्जून भेट देण्याजोगं ठिकाण निश्‍चित आहे. रत्नागिरीपासून 22 कि.मी. आणि राजापूरपासूनही 22 कि.मी. अंतरावर कशेळी हे छोटं गाव आहे. रत्नागिरी-भाट्ये-पावस-पूर्णगड-कशेळी असा हा उत्तम रस्ता आहे. या टुमदार गावाला विस्तीर्ण असा सागरकिनारा लाभला आहे. तिथला डोंगरकडा अन्‌ केवड्याचं बन केवळ अनुभवण्याजोगं. सुमारे 800 वर्षे नांदतं, असं श्री कनकादित्याचं मंदिर गावात उभं आहे. चहूबाजूंना आंबा-फणस-नारळी-पोफळीची दाटी आहे. त्यातच धनेश म्हणजे हॉर्नबिल हा पक्षी हमखास पाहायला मिळतो. मंदिराच्या आवारातच श्री गणपती, श्री शंकर, श्री आर्यादुर्गादेवी, श्री विष्णू अशी चार मंदिरे आहेत. म्हणजे हे सूर्यपंचायतन आहे. शिवाय एक मारुती मंदिरही आहे. पन्हाळगडच्या शिलाहार राजाने आषाढ शुद्ध चतुर्थी शके 1113 म्हणजे 27 जून 1191 रोजी गोविंदभट्ट भागवत यांना कशेळी गाव इनाम दिला. तसा ताम्रपट करून दिला. आजही हा तीन ताम्रपृष्ठांचा काही किलो वजनाचा ताम्रपट मंदिरात उपलब्ध आहे. मुंबईच्या नाना शंकरशेठ यांनी मंदिराचा सभामंडप बांधून दिला आहे. प्रख्यात इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर, थोर साहित्यिक वि. सी. गुर्जर, थिऑसॉफीचे भाष्यकार राजाराम सखाराम भागवत आदी अनेक मंडळींचं कशेळी हे जन्मस्थान. इथे मुक्काम करण्यासंदर्भात भास्कर नारायण भागवत, मुख्य विश्‍वस्त श्री कनकादित्य मंदिर, कशेळी यांच्याशी संपर्क साधावा, दूरध ्वनी- 02353- 226317 किंवा रमेश पांडुरंग ओळकर 02353-226323 हे दूरध्वनी क्रमांक त्यासाठी उपयुक्त ठरतील. कशेळी गावातच श्री लक्ष्मी केशवाचे मंदिर आवर्जून भेट देण्याजोगे आहे. इथून जवळच वेत्ये गावचा विलोभनीय समुद्रकिनारा डोळ्यांचे पारणेच फेडतो. आडिवरे येथील देवीच्या महाकालीची मूर्ती येथेच सापडली. कशेळीच्याच भेटीत राजापूरमधील अनेक ठिकाणांनाही भेट देता येते. चिपळूणहून खेडला जाताना परशुराम हे गाव लागते. सहाशे वर्षांपूर्वीच्या श्री परशुराम मंदिराची, आदिलशाही विजापूरकर वैभवाची वास्तू तेथे आहे. परशुराम, काम व काळ या अनुक्रमे विष्णू, ब्रह्मदेव व शंकराचा अवतार असलेल्या काळ्या पाषाणाच्या मूर्ती मंदिरात आहेत. परशुरामात प्राचीनकाळी घरोघरी पाणी पोचविण्याची पाटवजा व्यवस्था होती. तिचे अवशेष आजही पाहायला मिळतात. परशुराम घाटात पावसाळ्यात सवत कडा हा धबधबाही दिसतो. खेडहून पुढे दापोलीला जाता येते. दापोलीत पाहण्यासाठी जवळपास 62 पर्यटनस्थळे आहेत. आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती आणि दुर्गादेवीचं मंदिर अनेकांच्या परिचयाचं. बकुळ वृक्षांच्या गराड्यात असलेलं श्री गणेश मंदिर आणि तेथून हर्णे-मुरूडच्या किनाऱ्यावरील सुवर्णदुर्ग-कनकदुर्ग-फत्तेगड आणि गोवा किल्ला ही दुर्गचौकडी व्यवस्थित न्याहाळता येते. आंजर्ले येथील मुक्कामासाठी माधव हरी साठ्ये, श्री स्वामी समर्थ निवास, उभाघर आंजर्ले, ता. दापोली, जि. रत्नागिरी यांच्याशी 02358 - 234229 यांच्याशी संपर्क साधावा. आंजर्ले-केळशी रस्त्यावर आडे-पडले गाव आहे. इथे पुलाजवळ श्रीभार्गवरामाचं म्हणजे श्री परशुरामाचं देखणं मंदिर आहे. शिवाय श्री बेलेश्‍वराचंही मंदिर आहे. आंजर्ले इथे मुक्काम करून हर्णे - मुरूड (अण्णासाहेब ऊर्फ भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव) आसूदचा श्री व्याघ्रेश्‍वर आणि श्री केशवराज, दापोली- लोकमान्य टिळकांचं मूळ गाव, चिखलगाव दाभोळ-कोळथरे-पंचनदी- पन्हाळे लेणी अशी अनेक ठिकाणं पाहून दिवसभरात परत येता येतं. मंडणगड येथील अप्पा घैसासांच्या संतोष हॉटेलमधील (02350-225207) थालिपीठ, अळिवाचे लाडू आणि अप्रतिम कोकम सरबत चाखून पाहायला विसरू नकाच. दापोलीपासून नऊ किलोमीटरवर मुरूड हे महर्षी कर्वे यांचे जन्मगाव. नारळ-पोफळीच्या बागा, कौलारू घरे, सारवलेली अंगणे पाहत पाहत आपण स रळ समुद्रावरच पोचतो व तो विशाल सागर आपल्याला खिळवूनच ठेवतो. याच सागराच्या सान्निध्यात व अगदी नारळाच्या बागेत एक साधे पण सुंदर रिसॉर्ट आहे... श्री. सुरेश बाळ यांचे "मुरूड बीच रिसॉर्ट'. येथे गरमागरम उकडीचे मोदक, आंबोळी, थालीपीठ यासारखे कोकणी पदार्थ आधी कळवल्यास बनवतात. तसेच त्यांच्याकडे पोहा पापड, आमसुले, आंबापोळी, फणसपोळी इ. पदार्थ मागणीनुसार उपलब्ध असतात. शिवाय त्यांच्या बागेत जायफळ, लवंगा, काळी मिरी इत्यादी झाडेही पाहायला मिळतात. मुरूडच्या किनाऱ्यावरून सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग व हर्णैचा दीपस्तंभही दिसून येतो. मुरूड गावात दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या खांबांवर नक्षीकाम केलेले आहे, तर पुढील बाजूस नगारखाना व दगडी दीपमाळ आहे. दाभोळहून होडीने किंवा फेरीबोटीने खाडी पार करून गुहागर, हेदवी व वेळणेश्‍वर अशा पर्यटनस्थानांची ओळख करून घेता येते. ही फेरीबोट दुचाकी, चारचाकी वाहने व माणसे यांना वाहून नेते व ही सेवा वाजवी दरात सतत उपलब्ध असते. तसेच मुरूडच्या किनाऱ्यावर राहून पर्यटक रायगड किल्ला, चिपळूणजवळील परशुराम मंदिर, दिवेआगर येथील सोन्याचा गणपती इत्यादी ठिकाणे पाहून परत येऊ शकतो. आसूदच्या रस्त्यानेच पुढे गेल्यावर व्याघ्रेश्वर मंदिर लागते. हे मंदिर 800 वर्षे जुने आहे. आसूद गावातून वाहणाऱ्या ओढ्याच्या काठी असलेल्या या मंदिराला चारही बाजूंनी सुमारे पाच फूट उंचीची दगडी भिंत आहे. आतल्या लाकडी खांबांवर दशावतार कोरलेले आहेत. मुरुड आसूद पुलापाशी डावीकडे वळल्यानंतर मुरुड गाव लागते. इथेच दुर्गादेवीचे मंदिर आहे. या मंदिराजवळचा रस्ता थेट समुद्रकिनारी जातो. कर्देमुरुड गावाकडे जाताना डावीकडे कर्दे इथला निसर्गरम्य समुद्रकिनारा लागतो. हा समुद्रकिनारा बराच प्रसिद्ध आहे. थंडीच्या मोसमात हर्णे, मुरुड, कर्दे परिसरात बरेचसे स्थलांतरित पक्षी येतात., त्यामुळे हे ठिकाण बघण्यासारखे आहे.

राहण्याची व्यवस्था ः
1) हॉटेल सफारी एशिया- रत्नागिरी- (02352) २२१७६०
2) हॉटेल विवेक- रत्नागिरी- (02352) २२२१६२
3) हॉटेल अल्फा- रत्नागिरी- (02352) २२२३५७
4) हॉटेल प्रभा- रत्नागिरी- (02352) २२३५१५
5) स्वरूप लॉज- रत्नागिरी- (02352) २२०५८५
6) कोहिनूर बीच रिसॉर्ट- रत्नागिरी (02352) 235231, ३२
7) हॉटेल लॅण्डमार्क- रत्नागिरी - (02352) २२०१२०
8) मातृछाया निवास- गणपतीपुळे- (02357) २३५२९१
9) अभिषेक बीच रिसॉर्ट- गणपतीपुळे- (02357) २३५३२७
10) गोकूळ लॉज- गणपतीपुळे- (02357) २३५०३१
11) हॉटेल श्रीसागर- गणपतीपुळे- (02357) २३५१४५
12) किस्मत रेसिडेन्सी बीच रिसॉर्ट- गुहागर- (02359)
13) हॉटेल कौटिल्य लॉज- गुहागर- (02359)
14) कुंटे हिल रिसॉर्ट ऍण्ड फार्म हाउस- कोळंबे, संगमेश्‍वर-
15) हॉटेल पार्वती पॅलेस- देवरुख- (02354)
16) बीच रिसॉर्ट सिल्व्हर सॅण्ड- दापोली- (02358)
17) रूपा लॉज- खेड- (02356)
18) सीता- चिपळूण- (02355) 252244,

अंतर ः
पणजी ते रत्नागिरी 240 कि.मी।
लांजा ते रत्नागिरी 70ं कि.मी
लांजा ते रत्नागिरी आडिवरेमार्गे 64 कि. मी
हातखंबा गणपतीपुळे नेवरेमार्गे 37 कि. मी
हातखंबा गणपतीपुळे निवळीमार्गे 47 कि. मी
रत्नागिरी संगमेश्वर 45 कि. मी
संगमेश्वर देवरूख 15 कि. मी
साखरपा देवरूख 15 कि. मी
साखरपा कोल्हापूर 80 कि. मी
संगमेश्वर चिपळूण 45 कि. मी
चिपळूण दापोली 72 कि. मी
चिपळूण गुहागर 45 कि. मी
चिपळूण खेड 36 कि. मी
दापोली मंगणगड 42 कि. मी
रत्नागिरी ते पावस 15 कि.मी
देवरूख ते मार्लेश्वर 15 कि.मी
रत्नागिरी ते कशेळी 22 कि.मी
मुरूड ते आंजर्ले 5 कि.मी.

उटी

थंड हवेचे ठिकाण म्हणून "उटी'चा लौकिक साऱ्या देशभर आहे. आजच्या अधिकृत भाषेत या ठिकाणाचे नाव "उधगमंडलम' असे आहे. मध्यंतरी त्याला उटकमंड असेही म्हटले गेले. सुमारे दीड पावणेदोनशे वर्षांपूर्वी जॉन सुलीवॉननामक ब्रिटिश अधिकाऱ्याने विकसित केलेल्या दक्षिण भारतातील या ठिकाणास "क्वीन ऑफ हिलस्टेशन्स' असे म्हटले जाते. हिंदीसह अन्य भारतीय भाषांतील चित्रपटांचे या परिसरात शूटिंग केवळ पावसाळ्याचे काही दिवस वगळता इथे वर्षभर चालू असते. अत्यंत समृद्ध अशी वनसंपदा, वन्यप्राणिसंपदा लाभलेले हे ठिकाण निलगिरी पर्वतशृंखलेत आहे आणि ते आजच्या प्रशासकीय पद्धतीनुसार तमिळनाडू राज्यात असले, तरी इथून केरळ आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमाही लागूनच आहेत. इथे उटीच्या पर्यटकीय वैशिष्ट्यांऐवजी तेथील भाजीपाला शेतीबाबत माहिती देत आहे. समुद्रसपाटीपासून उटी सुमारे अडीच हजार मीटर्स उंचीवर आहे. येथील हवामान तापमान बाराही महिने विलक्षण आल्हाददायक, सुखद असते. वार्षिक पर्जन्यमान सुमारे 200 सेंटिमीटर पाऊस एवढे आहे. थोडक्‍यात भूमी अर्थात जमीन, पाणी, तापमान हे सगळे भाजीपाला शेतीसाठी अत्यंत पोषक, अनुकूल असे आहे. त्यामुळे या सगळ्या परिसरात ज्याला निलगिरी जिल्हा म्हणतात आणि ज्याचे मुख्यालय उटी शहर आहे तिथे वर्षभर भाजीपाला पिकवला जातो.

भीमाशंकर!

निसर्गसौंदर्याने नटलेले भीमाशंकर! सदाहरित जंगलामुळे या परिसरात पदभ्रमण करणे हा वेगळाच सुखद अनुभव आहे. पावसाळ्यात तर त्याचे सौंदर्य अधिकच खुलते. हिरव्याकंच पर्णभाराने लगडलेल्या वृक्षांवर गोड कूजन करणारे बुलबुल, फुलाफुलांवर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, आकर्षक रंगांनी मन आकर्षित करून घेणारे तऱ्हेतऱ्हेचे कीटक, या सर्वांचे निरीक्षण करणे हा अद्‌भुत अनुभव असतो. रोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचा उबग आलेल्यांना तर हा परिसर म्हणजे नंदनवनच वाटावा, यात काहीच आश्‍चर्य नाही. पावसाळ्यात धुक्‍याच्या तरल पडद्याआडून हळूच डोकावणारी वृक्षवल्लरी क्षणार्धात शहरी शीण आणि ताणतणाव घालवून टाकते. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच महाराष्ट्रात आहेत. भीमाशंकर त्यापैकीच एक. या संपूर्ण परिसराला लाभलेल्या हिरव्या कोंदणामुळे या पवित्र भूमीला भाविकांबरोबरच निसर्गप्रेमींचाही स्वर्ग म्हणायला हरकत नाही. नागफणी या उंच शिखरावरून आसपासच्या दऱ्याखोऱ्यंचे विहंगम दृश्‍य मनाला भुरळ पाडते. याच क्षेत्रातून भीमा नदीचा उगम होतो आणि आग्नेय दिशेने वाहत ती पुढे कर्नाटकातील रायचूरजवळ कृष्णा नदीत विलीन होते. ही पवित्र देवभूमी आहे आणि भगवान शंकराचा या परिसराला परीसस्पर्श झाला आहे. भीमाशंकराचे मंदिर नगारा शैलीत अठराव्या शतकात बांधण्यात आले आहे. त्याच्या बांधकामावर आर्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. येथे महादेवाचे स्वयंभू लिंग आहे. पेशव्यांचे कारभारी नाना फडणीस यांनी मंदिराचे शिखर बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही या मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी मदत दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. मंदिराच्या कोरीव दगडी खांबांवर पौराणिक देखावे खोदण्यात आले आहेत. मंदिराच्या आवारात शनिमंदिरही आहे. या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख सापडतो. एक आख्यायिका अशी सांगतात, की सह्याद्रीच्या या परिसरात एक दुष्ट राक्षस राहत होता. त्रिपुरासुर किंवा भीम असे त्याचे नाव. त्याच्या मातेचे नाव करकती. भीम आपल्या जीवनातील काही रहस्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता. आपला पिता कोण आणि त्याने आपल्याला वाऱ्यावर का सोडून दिले, असा प्रश्‍न त्याने आपल्या मातेला केला. तेव्हा त्याला समजले की तो कुंभकर्णाचा पुत्र आहे. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या प्रभू रामाने त्याचा वध केला होता. हे रहस्य समजल्यानंतर भीमाने विष्णूचा सूड उगविण्याचा निर्धार केला. त्याने ब्रह्मदेवाच्या प्राप्तीसाठी याच परिसरात तपश्‍चर्या केली. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्याला एका वराद्वारे अमर्याद सामर्थ्य प्रदान केले. मात्र, त्याचा दुष्टपणा एवढा वाढला, की त्याने देवांचा राजा इंद्राचाही पराभव केला. महादेवाचा उपासक कामरूपेश्‍वराचाही त्यानं पराभव करून त्याला पाताळात धाडून दिले. भीमाचा दुष्टपणा वाढत चालल्यामुळे ब्रह्मदेव भगवान शंकराला शरण गेले आणि त्या दुष्टाचा नायनाट करण्याची विनंती केली. भीमाने कामरूपेश्‍वराला शंकराची भक्ती सोडून आपले गुणगान करण्याचा आदेश दिला; परंतु कामरूपेश्‍वराने त्याला तसे करण्यास नकार दिला; त्यामुळे भीमाने शिवलिंग भग्न करण्याच्या उद्देशाने तलवार उपसली. त्याच वेळी भगवान शंकर तेथे प्रकट झाले. त्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. या युद्धामुळे तिन्ही लोक भयभीत झाले. ते पाहून नारदाने युद्ध थांबविण्याची दोघांना विनंती केली. त्यानंतर भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून भीमाची राख केली. त्यानंतर भगवान शंकर त्याच स्वयंभू लिंगात विलीन झाले आणि हे क्षेत्र ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले. पश्‍चिम घाटाच्या पूर्व-पश्‍चिम पसरलेल्या एका रांगेपैकी भीमाशंकरची रांग आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची तीन हजार 250 फूट आहे. येथील जंगलात आंबा, हिरडा, बेहडा, बांबू, औषधी वनस्पती आहेत. घनदाट अरण्यामुळे या प्रदेशात विविध प्रकारचे वन्य जीव वास्तव्यास असतात. बिबट्यांचा येथे मुक्त संचार आहे. त्याचबरोबर रानडुक्कर, भेकर, सांबर, तरस आणि शेकरू (जायंट इंडियन स्क्विरल) ही मोठी खार या अरण्याचे वैशिष्ट्य आहे. मोरांची संख्याही येथे विपुल आहे. पदभ्रमण व गिरिभ्रमण करणाऱ्यांचा तर हा स्वर्गच आहे. या परिसरात तयार झालेल्या पाऊलवाटांनी फिरण्यातच खरी मजा आहे. भाकादेवीचा बंधारा, नागफणीच्या रस्त्यावरील हनुमान तळे, सीतारामबाबांचा मठ आणि हनुमान मंदिर, तेथून काहीशा अवघड वाटेने चढून गेल्यास नागफणी हे भीमाशंकरचे सर्वोच्च शिखर लागते. त्याशिवाय जिल्हा परिषदेचे दोन तलाव येथे आहेत. मुंबई पॉईंट, साक्षी विनायक, कमळजा मंदिर ही आणखी काही रम्य स्थळे. दोन दिवसांच्या सहलीचे नियोजन करून भीमाशंकरला जाता येते. कोकणातून कल्याणमार्गे आणि पुण्याहून मंचरमार्गे येथे पोचता येते. पुण्याहून भीमाशंकर 110 किलोमीटर आहे. बस किंवा मोटारीने येथे येणे सोपे आहे. पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातून नियमितपणे एसटीच्या बस सुटतात. नारायणगाव किंवा मंचरपर्यंत येऊनही तेथे दुसरी बस मिळू शकते. पुणे हा जवळचा विमानतळ आहे. मुंबईहूनही तेथे जाता येते. मुंबईहून बस किंवा लोकलने कर्जतपर्यंत यावे व तेथून खांडसची (सुमारे 40 किलोमीटर) बस पकडावी. सुमारे चार ते साडेचार तासांच्या प्रवासानंतर भीमाशंकरला पोचता येते. भीमाशंकरला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासस्थान आहे. त्याचे आरक्षण मुंबई किंवा पुण्यातून करता येते. भीमाशंकरच्या अलीकडे ब्लू मॉरमॉन आणि अन्य काही हॉटेलेही आहेत. तेथेही दूरध्वनी करून आरक्षण करता येते. सुटीच्या आणि महाशिवरात्रीसारख्या सणांच्या दिवशी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे सुटी व सणाचे दिवस वगळून येथे आल्यास येथील निसर्गसौंदर्याचा लाभ घेता येईल. येथील किंवा अन्य कोणत्याही जंगलात काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा येथे वापर टाळावा. वापरल्यास कोठेही फेकून देऊ नयेत. मोठ्या आवाजात बोलू नये, रेडिओ, टेप बंद ठेवावेत, चालताना झाडांच्या फांद्या तोडू नयेत, बिळांमध्ये काठ्या खुपसून आतील वन्य जीवांना त्रास देऊ नये. कोणत्याही ऋतूमध्ये येथे येता येईल.